आटपाडी (जिल्हा सांगली) येथील धर्मांतराच्या प्रकाराचे सखोल अन्वेषण करून त्यावर योग्य ती कार्यवाही होईल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केले आटपाडी (जिल्हा सांगली) येथील धर्मांतराचे सूत्र

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर – राज्यात लालूच देऊन, तसेच तंत्र-मंत्र म्हणून धर्मांतर करण्यास बंदी आहे. या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी (जिल्हा सांगली) येथील प्रकरणाच्या संदर्भात जी सूत्रे उपस्थित केली आहेत, त्या प्रत्येक सूत्राचे सखोल अन्वेषण होऊन त्यावर योग्य ती कार्यवाही होईल, असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या सूत्रावर त्यांनी हे आश्वासन दिले.

आमदार श्री. गोपीचंद पडळकर

या संदर्भात बोलतांना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले,

‘‘आटपाडी येथील वरद रुग्णालय येथे धर्मांतराचा गंभीर प्रकार घडला असून त्याचे ‘सीसीटीव्ही’ फूटेज उपलब्ध आहे ! संजय गेळे आणि त्याची पत्नी अश्विनी गेळे हे गेली अनेक वर्षे आटपाडी येथे गरीब लोकांच्या अज्ञानाचा अपलाभ उठवत, तसेच आमीष दाखवून धर्मांतर घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वरद रुग्णालयात एक महिला रुग्ण भरती असतांना गेळे दांपत्याने तेथे जाऊन त्या महिला रुग्णाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तेथील महिला डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर गेळे दांपत्याने त्यांच्याशी हुज्जत घातली. या दांपत्याने आटपाडी येथे एक अवैध चर्च बांधले असून त्याची कोणतीही अनुमती घेतलेली नाही. या प्रकरणी सरकारने हस्तक्षेप न केल्यास जनउद्रेक होऊ शकतो आणि कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. या दांपत्याने उपाहारगृह, तसेच मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली असून त्याचेही सखोल अन्वेषण व्हावे.’’