मी असे शिक्षण स्वीकारू शकत नाही, जिथे माझी आई आणि मुलगी शिकू शकत नाही !

काबुलमधील प्राध्यापकाने तालिबानच्या महिलाविरोधी धोरणांवर ओढले आसूड !

काबुलमधील प्राध्यापकाने तालिबानच्या महिलाविरोधी धोरणांवर तेथील वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चासत्रातच ओढले आसूड

लंडन (युनायटेड किंगडम) – अफगाणिस्तानच्या काबुल विश्वविद्यालयातील एका प्राध्यापकाने तेथील वृत्तवाहिनीवर झालेल्या चर्चासत्रातच तेथे उपस्थित प्रशासकीय अधिकार्‍यांना धारेवर धरले. तालिबानच्या महिलाविरोधी धोरणांवर आसूड ओढत हे प्राध्यापक म्हणाले, ‘‘अफगाणिस्तान हे शिक्षणाचे स्थान असू शकत नाही. त्यामुळे मी येथे उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांचा निषेध करतो. आम्हाला त्यांची आवश्यकता नाही. मी असे शिक्षण स्वीकारू शकत नाही, जिथे माझी आई आणि मुलगी शिकू शकत नाहीत !’’ याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून लंडन येथील ‘कन्झर्वेटिव्ह फ्रेंड्स ऑफ अफगाणिस्तान’ या संस्थेच्या कार्यकारी संचालिका शबनम नासिमी यांनीही हा व्हिडिओ ट्वीट केला.

तालिबान सरकारने महिलांवर कठोर नियम लागू केले आहेत. गेल्याच आठवड्यात तालिबानने महिलांनी विद्यापिठात उच्चशिक्षण घेण्यावर बंदी लादली आहे.

संपादकीय भूमिका

भारतातील महाविद्यालयांत मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालण्याचे समर्थन करत अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी अफगाणिस्तानातील तालिबानच्या महिलाविरोधी जाचक नियमांवर मात्र चकार शब्दही काढत नाहीत !