थोडक्यात महत्त्वाचे : कर थकवणार्‍या मालमत्ता ‘सील’ करण्यास प्रारंभ !….

कर थकवणार्‍या मालमत्ता ‘सील’ करण्यास प्रारंभ !

सातारा, २० डिसेंबर (वार्ता.) – थकीत करवसुलीच्या अनुषंगाने सातारा नगरपालिकेच्या वसुली विभागाने कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. १९ डिसेंबर या दिवशी सातारा नगरपालिकेच्या वसुली विभागाने सुधाकर शानभाग यांचे हॉटेल गुलबहार २९ लाख रुपये थकवल्याच्या प्रकरणी ‘सील’ केले. १ डिसेंबर या दिवशी हॉटेल गुलबहार प्रशासनाला सातारा नगरपालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आली होती; मात्र याला कोणताही प्रतिसाद न दिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.


लाचप्रकरणी २ संशयितांचे न्यायालयासमोर आत्मसमर्पण !

सातारा, २० डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या न्यायाधीश धनंजय निकम लाचप्रकरणी २ संशयितांनी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आहे. न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.


राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्वाधिक प्रकरणे निकाली !

पुणे – जिल्ह्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला. लोकअदालतीमध्ये ८७ सहस्र ४८६ प्रकरणे निकाली काढली. त्यातून ३६६ कोटींहून अधिक रकमेची तडजोड झाली आहे. लोकअदालतीमध्ये एकूण १ लाख ८७ सहस्र ६३ प्रकरणे तडजोडीसाठी प्रविष्ट केली होती. त्यापैकी ८७ सहस्र ४८६ प्रकरणे निकाली काढली आहेत.


येरवडा कारागृहात बंदीवानांमध्ये हाणामारी !

पुणे – किरकोळ वादातून येरवडा कारागृहातील बंदीवानाला दोघांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी कारागृहातील बंदीवान विकी उपाख्य विवेक खराडे, अली अदम शेख यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सुधीर थोरात असे घायाळ झालेल्याचे नाव आहे. याविषयी कारागृहातील रक्षक विश्वास वाकडे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.


पी.एम्.पी.च्या प्रवासीसंख्येत आणि उत्पन्नात घसरण !

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (‘पी.एम्.पी.’च्या) उत्पन्न आणि प्रवासी संख्येत गतवर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरअखेर २३ कोटी ४० लाख इतके उत्पन्न अल्प झाले आहे. परिणामी यंदा संचलन तूट वाढण्याची शक्यता आहे.


पुणे पोलिसाची डिजिटल व्यवहारात फसवणूक !

पुणे – सासवड येथील पोलीस कर्मचार्‍याची २ लाख ३ सहस्र रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलीस कर्मचार्‍याने बेकरीच्या दुकानातून घेतलेल्या वस्तूचे पैसे देण्यासाठी क्यू.आर्. कोड स्कॅन केला असता त्यांना बँक खात्यातून पैसे निघाल्याचा संदेश आला. त्यांनी निश्चिती करण्यासाठी पडताळले असता बँक खात्यात केवळ ५० रुपये शिल्लक राहिले होते. (पोलीस सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या कधी आवळणार ? – संपादक)