महिला कर्मचार्‍यांशी गैरवर्तन आणि वैद्यकीय साहित्यात भ्रष्टाचार प्रकरणी जालनामधील जिल्हा वैद्यकीय अधिकारी निलंबित !


नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – वैद्यकीय महिला कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि कोरोनाच्या काळात वैद्यकीय साहित्यात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जालना तालुक्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांना निलंबित केल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली. सचिवांद्वारे त्यांची चौकशी करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी या वेळी सांगितले. २७ डिसेंबर या दिवशी आमदार नारायण कुचे यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली. त्यावर मंत्र्यांनी वरील घोषणा केली. विवेक खतगावकर महिलांशी गैरवर्तन करतात. त्यांच्याशी अयोग्य पद्धतीने बोलतात. खतगावकर यांच्याविरोधात माझ्याकडे ७ महिलांनी तक्रारी केल्या आहेत.

कोरोनाच्या काळात आवश्यकता नसतांना जिल्ह्यात वैद्यकीय साहित्याची खरेदी करण्यात आली. हे साहित्य जनतेपर्यंत पोचलेच नाही. साहित्याची केवळ कागदोपत्री खरेदी करण्यात आली. आरोग्य विभागातील सतीश पवार आणि अर्चना पाटील या निवृत्ती झालेल्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना विज्ञापन काढून १५ दिवसांत पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. त्यांना कामावरून कमी करण्यात येणार का ? असे प्रश्न नारायण कुचे यांनी सभागृहात उपस्थित केले.

डॉ. तानाजी सावंत

यावर डॉ. तानाजी सावंत यांनी वर्ष २०२०-२१ आणि वर्ष २०२१ आणि २२ या कोरोनाच्या कालावधीत आरोग्यक्षेत्रात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी चालू आहे. तात्कालीन सरकारने भ्रष्टाचार करणार्‍यांना पाठीशी घालण्याचे कारण काय ? सतीश पवार आणि अर्चना पाटील यांची नियुक्ती रहित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.