शेतकरी उघड्यावर असतांना मुख्यमंत्र्यांच्या देहलीच्या वार्‍या चालू आहेत ! – उद्धव ठाकरे, ठाकरे गटप्रमुख

पत्रकारांशी संवाद साधत असतांना उद्धव ठाकरे

नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील शेतकर्‍याला उघड्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देहलीच्या वार्‍या चालू आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २६ डिसेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केली. बर्‍याच दिवसानंतर विधीमंडळ अधिवेशनाला उपस्थिती लावून ठाकरे यांनी कामकाजात सहभाग घेतला. विधान परिषदेत सीमाप्रश्नी मत मांडल्यानंतर त्यांनी बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला.

(सौजन्य : Loksatta)

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री हिंदुत्व मानणारे आहेत. यासाठी ते वारंवार देवदर्शनाला जात असतात. नवस बोलणे आणि नवस फेडणे यासाठी वारंवार त्यांना देहली येथे जावे लागते. आजचा दिवस गेला आहे म्हणून नवस फेडतो. उद्याचा दिवस नीट जावा म्हणून नवस करतो. यासाठीच त्यांच्या देहली येथे वार्‍या चालू आहेत; पण यात महाराष्ट्राचे भले कुठे आहे ? देहली येथील इतक्या वार्‍यांत त्यांनी महाराष्ट्राचा सीमाप्रश्न मांडला का नाही ? शेतकर्‍यांना साहाय्य देण्याचा विषय का मांडला नाही ?’’

ते म्हणाले, ‘‘सध्या आमच्यासाठी कर्नाटकमधील काही लाख मराठी माणसांचा विषय महत्त्वाचा आहे. सीमाभागातील मराठी माणसाचा अनेक वर्षांपासून पिढ्यानपिढ्या संघर्ष चालू आहे. सीमाभागातील जनतेचा प्रश्न विधीमंडळात मांडल्यानंतर काही जण मला प्रश्न विचारत आहेत की, तुम्ही कधी लाठ्या काठ्या खाल्ल्या ? कधी कारागृहात गेला होता का ? मला वाटते, या गोष्टीला काही अर्थ नाही. तुम्ही जेव्हा (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) लाठ्या काठ्या खाल्ल्यात, तेव्हा तुम्ही आमच्यात होता. याचा अर्थ असा नाही की, आता तुम्ही गप्प बसायचे. गप्प बसू नका.’’