लव्ह जिहाद रोखण्यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना करा ! – कर्नाटकात हिंदूंची एकमुखी मागणी

  • कर्नाटक विधान सौधसमोर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

  • ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्याचीही मागणी

कर्नाटकचे गृहमंत्री अरगज्ञानेंद्र (पांढरा सदरा घातलेले) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, तसेच अन्य

बेळगाव (कर्नाटक) – राज्यात वाढणार्‍या ‘लव्ह जिहाद’च्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर उत्तरप्रदेशच्या धर्तीवर ‘लव्ह जिहाद’ विरोधी विशेष पोलीस पथकाची स्थापना करावी, अशी मागणी येथे विधान सौधसमोर आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात करण्यात आली. यासह ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्याचीही मागणी या वेळी करण्यात आली. आंदोलनानंतर कर्नाटकचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांना निवेदन देण्यात आले.

५ वर्षांत कर्नाटक राज्यात २१ सहस्र युवती बेपत्ता ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात बोलतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ

या वेळी श्री. मोहन गौडा म्हणाले, ‘‘देहलीचा जिहादी आफताबने श्रद्धाची हत्या करून तिचे ३५ तुकडे केले. असेच प्रकार राज्यात घडत आहेत. कर्नाटकात धर्मांतरविरोधी कायदा असूनही त्याचा विशेष उपयोग होत नाही. लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतर वाढले आहे. वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत एकट्या कर्नाटक राज्यात २१ सहस्र युवती बेपत्ता झाल्या आहेत. अनेक मौलवी आणि मदरसे हे धर्मांतराच्या कुकृत्यांत गुंतले आहेत. हे रोखण्यासाठी उत्तरप्रदेशाच्या धर्तीवर लव्ह जिहादविरोधी विशेष पोलीस पथकाची स्थापना करावी. राज्यात उत्पादनांवर अनधिकृतपणे ‘हलाल लोगो’ असलेले प्रमाणपत्र छापून त्याद्वारे सहस्रो कोटी रुपये मिळवून धर्मांध संघटना त्याचा देशविरोधी कारवायांसाठी वापर करत आहेत. तरी याविषयी अन्वेषण करून हलाल प्रमाणपत्र रहित करणारा कायदा हिवाळी अधिवेशनात पारित करावा.’’
या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात सहभागी विविध हिंदुत्वनिष्ठ

या आंदोलनात श्रीराम सेना जिल्हा कार्याध्यक्ष श्री. विनय अंगरोळी, श्रीराम सेना उत्तर कर्नाटक जिल्हाध्यक्ष श्री. रवी कोकीतकर, भाजप ग्रामीण सचिव श्री. पंकज घाडी, हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. बाळू कुरबर, भाजपच्या सविता हेब्बार, ‘हमारा देश संघटने’च्या मिना काकतकर, ‘एंजेल फाऊंडेशन’च्या अनुष्का पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आकांक्षा मागणावर, ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या आकांक्षा कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ श्री. मारुति सुतार, कर्तव्य महिला मंडळाच्या सौ. अक्काताई सुतार आणि सौ. मीलन पवार, यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि महिला मंडळ याचे कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी अशा १५५ हून अधिक जणांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

लव्ह जिहादच्या संदर्भात अपेक्षित कारवाई दायित्व घेऊन करीन ! – कर्नाटकचे गृहमंत्री

निवेदन स्वीकारल्यावर गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले, ‘‘तुमचे निवेदन स्वीकारून त्यावर लव्ह जिहादविषयी जी कारवाई करणे अपेक्षित आहे, ती मी पूर्ण दायित्व घेऊन करीन. यासह हलाल प्रमाणपत्राच्या संदर्भात अन्वेषण करून या संदर्भातही आवश्यक ती कृती करीन.’’

 विशेष

गृहमंत्र्यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.
आंदोलनास प्रसिद्धीमाध्यमांचा चांगला प्रतिसाद लाभला.