पेण येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या पार्श्वभूमीवर भव्य वाहनफेरी !

पेण (रायगड) २३ डिसेंबर (वार्ता.) – २५ डिसेंबर या दिवशी येथील वाल्मिक निवास मैदान येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त २३ डिसेंबर या दिवशी पेण येथे भव्य वाहनफेरी काढण्यात आली होती. या फेरीमध्ये ३०० दुचाकी वाहनांसह पेण परिसरातील धर्मप्रेमी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. वाहनांवर भगवे ध्वज आणि प्रबोधनपर फलक लावण्यात आले होते. फेरीमध्ये सहभागी हिंदु ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ अशा घोषणा उत्स्फूर्तपणे देत होते.

या फेरीत वारकरी संप्रदाय, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, जगद्गुरु नरेंद्र महाराज संप्रदाय, सह्याद्री प्रतिष्ठान, पेण कोळी समाज, पेण जैन समाज, सकल हिंदु समाज, शिवज्योत मित्र मंडळ, कमांडो करिअर ॲकॅडमी, स्वराज्य प्रतिष्ठान, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.

वारकरी संप्रदायचे ह.भ.प. चंदन महाराज यांच्या हस्ते हिंदु धर्माचे प्रतीक असणार्‍या धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. या वेळी जैन समाजाचे श्री. पंकज जैन यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सह्याद्री प्रतिष्ठानचे श्री. मंगेश दळवी आणि श्री. समीर म्हात्रे यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला. ह.भ.प. भूपतराव महाराज यांनी पुतळ्यावर पुष्प अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ झाला. हुतात्मा कोतवाल चौक येथे फेरीची सांगता झाली.

या वेळी करण्यात आलेल्या मार्गदर्शनातील सूत्रे

१. हलाल जिहाद हा विषय सर्वांनी समजून घेतला पाहिजे. ‘हलाल प्रमाणपत्र’ बंद झाले पाहिजे. हा विषय अतिशय गंभीर आहे. ते समजून घेण्यासाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित रहावे. – श्री. माणिक पवार, सदस्य, हलाल सक्ती विरोधी कृती समिती

२. आम्ही छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन काम करत आहोत. धर्मासाठी जे जे करायचे ते आपण करणार ! प्रत्येक हिंदूने ते करायला हवे. त्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहूया ! – श्री. मंगेश दळवी, सह्याद्री प्रतिष्ठान

३. धर्मांतर रोखण्यासाठी आपल्याला एक व्हायला हवे. लव्ह जिहाद पूर्णपणे थांबायला हवा. – श्री. मोहन पारटे, सकल हिंदु समाज

४. सर्व प्रकारचे जिहाद आणि धर्मांतर आदी हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी आपल्याला पद, पक्ष, संप्रदाय, जात-पात हे बाजूला ठेवून ‘एक हिंदु’ म्हणून हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून संघटित व्हायला हवे ! – श्री. राजेंद्र पावसकर, हिंदु जनजागृती समिती