आज, २४ डिसेंबर २०२२ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘मृत्युंजयदिन’ आहे. त्या निमित्ताने…

मृत्युंजय स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर

१. वीर सावरकर यांना एका लेखामुळे शिक्षा होणे

ब्रिटीश सैन्याचे फिल्ड मार्शल माँटगॉमेरी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संबंध वर्ष १९१० मध्ये आला होता. त्यांच्या मनावर सावरकर यांच्या व्यक्तीमत्त्वाचा आणि त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टांचा मोठा प्रभाव पडला होता.

श्री. दुर्गेश परुळकर

२७ डिसेंबर १९२३ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एक लेख लिहिला होता. त्या लेखामुळे सावरकर यांना शिक्षाही झाली होती. आधीच्या आयुष्यातील ज्या मार्गावरून त्यांनी वाटचाल केली, त्याविषयीचा उद्वेग व्यक्त केला होता. ‘‘अस्तित्वात असलेली विधी संस्था माझ्या शक्तीप्रमाणे उचलून धरणे, हे माझे कर्तव्य आहे’’, असे त्या वेळी सावरकर म्हणाले होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ५ वर्ष स्थलबद्धता आणि ‘प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेणार नाही, याची हमी सावरकरांनी द्यावी’, अशी अट त्यांना घालण्यात आली होती. या अटीचा सावरकर यांनी स्वीकार केला होता.

२. गव्हर्नर कार्यकारी मंडळाने ठराव पारित करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेचा आदेश देणे

या घटनेनंतर गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळात ४ जानेवारी १९२४ या दिवशी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (‘क्रिमिनल प्रोसिजर कोड’च्या) कलम ४०१ ला अनुसरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांनी न बोललेल्या शिक्षेत सशर्त सूट देण्यात आली. त्यानंतर त्यांची सुटका करण्यास संमती देणारा ठराव पारित करण्यात आला. येरवडा कारागृहाच्या अधीक्षकाला नंतर तसा आदेशही दिला गेला.

कारागृहातील शेवटच्या रात्री सावरकर यांच्या मनात विचार आले, ‘आपली ही कारागृहातील शेवटची रात्र आहे. या जन्मठेपेच्या शिक्षेतील ही शेवटची रात्र असेल, तर… उद्या या वेळेस माझ्या झोपेवर वॉर्डनचा पहारा असणार नाही. ती माझी स्वतंत्र झोप असेल. खोलीतील खिडक्या मोकळ्या उघडलेल्या असतील आणि त्या खोलीत चांदणे अंथरलेले असेल.’ या विचार सावरकरांचा उत्साह वाढला. सरकारच्या आदेशाप्रमाणे सावरकर यांची येरवड्याच्या कारागृहातून ६ जानेवारी १९२४ या दिवशी दुपारी सुटका झाली.

३. सावरकर यांचा जन्मठेपेच्या शिक्षेतून लवकर मुक्त होण्याचा दिवस म्हणजे ‘मृत्युंजयदिन’ !

त्यानंतर पुढची १३ वर्षे म्हणजे वर्ष १९३७ पर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेत रहावे लागले. वर्ष २४ डिसेंबर १९३७ मध्ये त्यांची स्थानबद्धतेतून सुटका झाली. सावरकर यांना संपूर्ण ५० वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली असती, तर २४ डिसेंबर १९६० या दिवशी त्यांची मुक्तता झाली असती. अनंत यातना सहन केल्यानंतरही सावरकर जिवंत राहिले. त्यांनी मृत्यूवर मात केली. त्यांच्यावर मृत्यू पाळत ठेवून राहिला होता. त्यांचा पाठलाग करत होता. त्या मृत्यूला सावरकर यांनी आपल्या धाकात ठेवले; म्हणून मृत्यू त्यांच्या आसपासही फिरकला नाही. म्हणून त्यांचा हा दिवस (२४ डिसेंबर १९३७) एक प्रकारे वाढदिवस तथा ‘मृत्युंजयदिन’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने साजरा केला.

४. सावरकरांनी तरुणांना दिलेला संदेश आणि ‘मृत्युंजयदिना’च्या निमित्ताने केलेले विविध कार्यक्रम

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रकृती त्या वेळेला अत्यंत क्षीण झाली होती. त्यांना कुणालाही भेटता येत नव्हते. त्यांच्या या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी त्यांनी तरुणांना संदेश दिला, ‘‘तरुणांनो, देशाचे सैनिकी सामर्थ्य वाढवा.’’ त्याच वेळी अंदमानमध्ये सावरकर यांना ज्या कोठडीत ठेवले होते, तिथे त्यांचे चित्र लावण्यात आले. सावरकर यांचा हा वाढदिवस तिथे साजरा करण्यासाठी अंदमानमधील आयुक्त एम्.व्ही. राजवाडे यांनी पुढाकार घेतला. सावरकरांचे भक्त रा.के. नगरकर हिंदुस्थानचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सावरकरांचे सर्व ग्रंथ भेट म्हणून दिले.

संपूर्ण देशात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘मृत्युंजयदिन’ उत्साहात साजरा करण्यात आला, तसेच ‘सरकारने सावरकर यांना ‘भारतरत्न’ ही पदवी द्यावी’, अशी सूचना करण्यात आली; पण सरकारने ती मान्य केली नाही. सावरकर यांच्या मृत्युंजयदिनाच्या निमित्ताने कोलकातामध्ये मनूजचंद्र सर्वाधिकारी लिखित ‘सावरकर-ज्वालामुखी’ हे बंगाली नाटक सादर करण्यात आले.२४ डिसेंबर १९३७ या दिवशी दादर येथील सावरकर सदनासमोर प्रचंड जनसमुदाय जमला होता. त्या वेळी ‘मृत्युंजय सावरकर की जय’, अशी गगनभेदी घोषणा देण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी व्हरांड्यात येऊन लोकांना दर्शन दिले. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मोठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेत आचार्य दोंदे आणि आचार्य प्र.के. अत्रे यांची भाषणे झाली.

५. महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात आमदार वा.ब. गोगटे यांनी सावरकरांच्या जप्त मालमत्तेसंबंधी प्रश्न विचारला. त्या वेळी सरकारच्या वतीने उत्तर देण्यात आले, ‘‘त्यांची मालकी लिलावात अन्य माणसाकडे गेली असल्यामुळे त्यांना आता त्यांची मालमत्ता परत करता येणार नाही.’’

६. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘नेहरूंनीच देशाची हानी केली आहे’, असे परखडपणे सांगणे

या मृत्युंजय दिनानिमित्त अनेक वृत्तपत्रांनी विशेषांक प्रसिद्ध केले. त्या वेळी सावरकर एका मुलाखतीत म्हणाले, ‘‘नेहरूंच्या नंतर कोण ? हा प्रश्न मुळातच वेडेपणाचा आहे. ‘नेहरूंच्या नंतर देश रसातळाला जाईल’, असे समजणे शुद्ध खुळेपणा आहे. या देशाने एकापेक्षा एक असे श्रेष्ठ पुरुष निर्माण केले आहेत. नेहरूंनीच देशाची हानी केली आहे.’’

मृत्यूवर विजय संपादन करून भारतमातेला पारतंत्र्याच्या बेड्यातून मुक्त करणार्‍या ‘मृत्युंजय वीर सावरकर’ यांना विनम्र प्रणिपात !

– श्री. दुर्गेश परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (२०.१२.२०२२)