भोळ्या भावाने केलेल्या साधनेद्वारे संतपद गाठून भक्तीचे रहस्य उलगडणारे ईश्वरपूर (सांगली) येथील संत पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) !

आपल्यातील आत्म्याची सेवा केल्यावर शीघ्र गतीने आत्मशांती मिळेल ! – पू. राजाराम नरूटे

१४.३.२०२२ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांना संत घोषित करण्यात आले. त्या वेळी पू. राजाराम नरुटेआजोबा यांनी उपस्थितांना केलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन त्यांच्याच शब्दात येथे दिले आहे.

पू. राजाराम नरुटे

१. संघटितपणे धर्मकार्य केल्यामुळे कार्य वृद्धींगत होणे

‘सनातनचे कार्य हे धर्मकार्यच आहे. एवढेच वाटते की, ‘इथे एकी आहे. धर्मकार्यात सनातन धर्माची एकी आणि एकीचेच बळ असते. दुसरे काय असते ?’ संतांनी एकी केली, त्यांचे भले झाले. सनातन संस्थेच्या साधकांनी एकी केली; म्हणून हे एवढे ऐश्वर्य झाले. पहिल्यापेक्षा कार्य आता किती झालेय ! गोव्याला पहिल्यांदा एकच छोटासा आश्रम होता. आता सनातन संस्था पुष्कळ वाढली आहे. आरंभीपेक्षा आता साधकसंख्या अनेक पटींनी वाढली आहे. सनातन संस्थेचे महत्त्व सर्वत्र वाढणार आहे. मग आम्हाला तिची (संस्था आणि साधना यांची) गोडी लागणारच !

२. आत्मशांती ही आपल्या प्रत्येक साधकाच्या जवळ आहे. त्याच्यामुळे प्रगती होत असते.

३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, असा भाव साधकांच्या मनात असणे आवश्यक !

आत्माच साधकांना सांगतो, ‘तू पुढे चल. मी तुझ्या मागे आहे.’ परम पूज्यच म्हणतात, ‘‘मी तुझ्या समवेत आहे. तू पुढची वाट चाल. कोण शत्रू येतोय, ते मी बघतो !’’ साधकांच्या मनात ‘परम पूज्य डॉक्टर समवेत आहेत’, असा भाव निर्माण झाल्यामुळे संस्थेचा विस्तार झाला आहे.

४. परमेश्वर कर्ता असल्याची जाणीव झाल्यामुळे साधकांची आध्यात्मिक प्रगती होत आहे !

आपल्या हातात काय आहे ? सद्गुरुसारिखा असता पाठिराखा । इतरांचा लेखा कोण नव्हे (करी) । ‘तो परमेश्वर सगळे करतोय. आपण नाही किंवा मीही नाही.’ साधनेमुळे साधकांना आत्मज्ञान होते आणि त्या बळावरच ते आध्यात्मिक प्रगती करतात. परमेश्वर, म्हणजेच आपल्यातील आत्माच आपल्याला बोलण्यासाठी ज्ञान देतो; म्हणून आपण बोलू शकतो. नाहीतर आपण काहीही बोलू शकत नाही.

५. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगामुळेच मला मार्गदर्शन करता येणे आणि त्यासाठी ज्ञानही मिळणे’, असा माझा भाव असणे

मला भाषण करायला सांगितले, तर माझे हातपाय लटपटत होते. मी जात नव्हतो. माझे अंग कापत होते; पण सनातनमध्ये आल्यापासून मी बोलायला शिकलो. परम पूज्यांच्या कृपेने हे झाले आहे. त्या दिवशी ‘परम पूज्यांसह बोलणे झाल्यावर त्यांच्या कृपेमुळे मला ज्ञान मिळाले’, असेच आता माझ्या मनात येत आहे.

६. सगळीकडे भक्तीमार्गानेच साधना केली जात असणे आणि ती श्रेष्ठ असणे

भक्तीच श्रेष्ठ आहे. भक्तीमुळेच मी बोलू शकत आहे. इकडे बघितले, तर तेच (भक्ती) आहे. देवतांचे अवतारी कार्य बघितले, तर तेच आहे आणि सनातनमध्ये बघितले, तरी तेच आहे. त्यात दुसरे काही नाही.

७. गुरूंमुळेच ईश्वरप्राप्ती होत असणे

गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर मला आनंद वाटला. गुरुच सगळे सांगतात, म्हणजे गुरूंविना सगळे व्यर्थ आहे. गुरूंविना ईश्वरप्राप्ती कशी होईल ? गुरु पाहिजेत. देव हा गुरु आहे का ? नव्हे, तो तर परमेश्वर आहे ! त्याने अनेक संत निर्माण केले आहेत.

८. प्रत्येक कार्य करतांना त्यात शिस्त आणि आनंद असायला हवा !

प्रपंच, राजकारण आणि साधना हे देवकार्य असून सगळीकडे समान दृष्टीने पाहिले पाहिजे. इथे आश्रमात जशी शिस्त आहे, तीच शिस्त प्रपंचातही पाहिजे, म्हणजे सगळ्यांना आनंद वाटेल. असे सगळीकडे असेल, तर राज्य चांगले चालते.

९. भक्त आणि संत यांचे रूप एकच असून सर्वांमध्येच देव असणे

मला प.पू. डॉक्टरांनी संत घोषित केले. मी त्यांचेच रूप आहे आणि माझे रूपही तेच आहेत. संत आणि भक्त एकच असतात. आपल्याला शिकण्यासाठीच त्यांचे प्रयोजन असते. त्यांचे गुण पाहून आपण ते आत्मसात करायचे. देव कुठे आहे ? देव विठ्ठल आणि राम यांच्या मूर्तीत आहे का ? देव म्हणतो, ‘तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी ।’ तू तुझ्यापाशी असलेल्या आत्म्याची सेवा कर आणि शीघ्र गतीने आत्मशांती मिळव. आत्मशांतीतच भक्ती आहे.’ (१४.३.२०२२)