सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘साधनेच्या आरंभीच्या काळात विविध प्रसंगांतून कसे घडवले ?’, याविषयी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी वेचलेले क्षणमोती !

‘७.१२.२०२२ या दत्तजयंतीच्या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म  डॉ. जयंत आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात भावसोहळा झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे कुटुंबीय आणि काही साधक यांच्या उपस्थितीत हा भावसोहळा पार पडला. या भावसोहळ्यात श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे पाहुया.

मी (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) साधनेला आरंभ केला. तेव्हा परात्पर गुरुदेवांचा प्रत्यक्ष सहवास अनुभवला. ‘त्या काळात त्यांनी मला कसे घडवले ?’, त्यातील काही निवडक प्रसंग सांगते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘दीपावलीच्या काळात घरी जाण्याने साधनेतील एकेक क्षण वाया जातो’, याची परात्पर गुरुदेवांनी जाणीव करून देणे

१ अ. ‘दीपावलीच्या काळात घरी सेवा करण्यासाठी सौ. गाडगीळ यांना भ्रमणसंगणक देऊ नये’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे : आरंभी मला मायेचे आकर्षण पुष्कळ होते. आश्रमात पूर्णवेळ साधना करायला आरंभ केल्यानंतर मी दीपावलीच्या कालावधीत सासरी आणि माहेरी जात असे. तिथे मी १ मास रहात असे. त्या वेळी मला वाटायचे, ‘दीपावलीला घरी जाऊन त्यांना वेळ देणे’, हे माझे कर्तव्य आहे. मी गेलेच पाहिजे.’ तेव्हा घरी राहिलेल्या वेळेत सेवा करता यावी; म्हणून मी भ्रमणसंगणक (लॅपटॉप) घेऊन जात असे. एका वर्षी मी उत्तरदायी साधकांना ‘मला घरी जातांना भ्रमणसंगणक हवा’, असे सांगितले. हे गुरुदेवांना कळल्यावर त्यांनी एका साधकाकडे निरोप दिला, ‘‘सौ. गाडगीळ यांना यंदा घरी सेवेसाठी भ्रमणसंगणक देऊ नये. त्यांची फलनिष्पत्ती अल्प आहे. त्या भ्रमणसंगणकाचा आश्रमातील समष्टी सेवेसाठी अधिक चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो.’’

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी सौ. गाडगीळ यांच्यातील मायेचे आकर्षण आणि ईश्वरप्राप्तीची तळमळ यांची टक्केवारी काढून त्यांना जाणीव करून देणे : दुसर्‍या दिवशी मी एका विषयाचे परीक्षण सांगण्यासाठी गुरुदेवांच्या कक्षात गेल्यावर त्यांना सांगितले की, यंदा मी भ्रमणसंगणक घेऊन जाऊ शकत नाही. त्या वेळी गुरुदेवांनी मला एका चिठ्ठीवर माझे परीक्षण लिहून दिले. माझ्यात मायेचे आकर्षण किती आहे ?’, ‘ईश्वरप्राप्तीची तळमळ किती आहे ?’ अशी एक सारणीच करून त्यांनी मला दिली. त्यात मी, माझे पती श्री. मुकुल गाडगीळ (आताचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ) आणि श्री. संदीप आळशी (आताचे पू. संदीप आळशी) यांच्यातील या घटकांच्या नोंदी होत्या. गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुमच्यात ईश्वरप्राप्तीची तळमळ किती अल्प आहे आणि मायेचे आकर्षण किती अधिक आहे पहा ! संदीपची ईश्वरप्राप्तीची तळमळ केवढी आहे ना ?’’

त्या वेळी मला असे वाटले की, जसे शालेय जीवनात परीक्षेनंतर निकाल असतो, तसा देवाने माझ्या साधनेचा निकालच दिला आहे !

१ इ. साधनेतील वेळ मायेतील गोष्टींसाठी व्यर्थ घालवू नये, याची जाणीव झाल्यानंतर सौ. गाडगीळ यांना ‘घरी जाऊ शकता’, असे सांगणे : ‘आपण मायेत जातो, तेव्हा साधनेचा एकेक क्षण व्यर्थ जातो’, याची मला त्या प्रसंगातून जाणीव झाली. दुसर्‍या दिवशी मी गुरुदेवांकडे जाऊन त्यांना सांगितले, ‘‘तेथे जाऊन माझी साधना होत नाही. त्यामुळे यंदा मी दीपावलीसाठी घरी जाणार नाही.’’ त्या वेळी ते म्हणाले, ‘‘आता ठरवले आहे, तर जाऊ शकता.’’ यातून ‘मायेचे आकर्षण न्यून होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, हे मी शिकले; म्हणून त्या वर्षी त्यांनी मला जाऊ दिले. त्या वेळी गुरुदेवांनी लिहून दिलेला परीक्षणाचा कागद मी अजून माझ्याकडे जपून ठेवला आहे.

२. लहान मुलीसाठी (सायलीसाठी) भोजनाचा डबा घरून आणण्याऐवजी आश्रमात भोजन करण्यास सांगणे

सायली लहान असतांना आम्ही फोंडा येथील आमच्या घरी रहात होतो. त्या वेळी मी सायलीसाठी घरून डबा बनवून आणत असे. त्या वेळी ‘तिला चांगली पोळी-भाजी मिळावी’, असा माझा विचार असायचा. तेव्हा गुरुदेवांनी एका साधकाकडे चौकशी केली की, सायलीला डबा कुठून येतो ? तेव्हा मी सांगितले की, मी घरून तिच्यासाठी डबा आणते. त्या वेळी गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘आश्रमात साधकांसाठी स्वयंपाक केला जातो. तेच सायली खाऊ शकते. सर्वांमध्ये मिळून मिसळून रहाण्याचे संस्कार तिच्यावर करायचे आहेत.’’

३. आसक्ती अल्प करण्याचे विविध टप्पे प्रसंगांतून शिकवणे

३ अ. मुलीसाठी फ्रॉक घेण्याचा विचार आल्यावर अन्य साधकाने तसाच फ्रॉक भेट म्हणून देणे, त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर मनातील प्रत्येक विचार जाणून तो पूर्ण करतात’, याची जाणीव होणे : मी एकदा एका लहान मुलीचा सुंदर फ्रॉक पाहिला. ‘सायलीसाठी तसा फ्रॉक घ्यावा’, असा विचार माझ्या मनात आला. सेवांच्या घाईत मी तो विचार विसरले. दुसर्‍या दिवशी एक साधक माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘मला सायलीला एक ‘फ्रॉक’ द्यायचा आहे.’’ तो फ्रॉक पाहिला, तर लक्षात आले की, मला आधी जो फ्रॉक आवडला होता, अगदी तसाच तो फ्रॉक होता. तेव्हा माझ्या लक्षात आले की, गुरुदेव माझ्या मनातील प्रत्येक विचार जाणतात. त्यानंतर लगेचच जाणीव झाली की, माझ्या मनात मायेची आसक्ती आहे. देवाला ती अशा माध्यमातून पूर्ण करावी लागते; म्हणून मला खंत वाटली.

३ आ. आसक्ती अल्प करण्यासाठी साधकाने भेट दिलेले पोशाख नाकारणे; मात्र ‘ते स्वीकारायला हवे होते’, याची जाणीव परात्पर गुरु डॉक्टरांनी करून देणे : पुढच्या वर्षी एका साधकाने माझ्यासाठी आणि सायलीसाठी पोशाख आणले होते. तेव्हा मला लक्षात आले की, कपड्यांप्रती आता आसक्ती ठेवायची नाही. त्यामुळे मी त्यांना सांगितले, ‘‘हे पोशाख मी घेऊ शकत नाही.’’ हा प्रसंग गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तो साधक एवढ्या आनंदाने द्यायला आला होता ना, तर पोशाख घ्यायला हवे होते.’’

या प्रसंगांनंतर मी शिकले की, आपली साधना वाढली की, गुरुदेव पुढच्या टप्प्याचे शिकवतात. कपड्यांविषयीची आसक्ती न्यून झाली, तरी ‘कपडे घेऊनही त्यात अडकायचे नाही’, ही माझ्यासाठी त्या वेळी पुढच्या टप्प्याची शिकवण होती.

४. ईश्वराला सर्वच येत असल्याने मुलीवर मायेचे संस्कार न करता ‘तिची आध्यात्मिक आई’ बनण्यास परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे

माझी मुलगी सायली लहान असतांनाच आम्ही रामनाथी आश्रमात रहायला आलो. आम्ही पूर्णवेळ आश्रमातच रहात असल्यामुळे तिला व्यवहारज्ञान शिकता यावे, यासाठी ‘तिला १५ दिवसांतून एकदा बाहेर घेऊन जाऊ का ?’, ‘तिला कधीतरी समुद्रकिनारी नेऊन भेळपुरी असे वेगवेगळे पदार्थ खायला घालू का ?’, असे मी गुरुदेवांना विचारले. त्या वेळी त्यांनी मला विचारले, ‘‘तिला मायेचे जग का दाखवता ? ईश्वराला सर्व येते. त्याला माया आणि व्यवहारही येतो. आश्रमात राहून ती आवश्यक ते सर्व शिकेल. आता तुम्ही ‘आध्यात्मिक आई’ बना.’’

‘एक आई’ म्हणून माझा तो पुनर्जन्म होता. त्यानंतर मी सायलीचे पालनपोषण आध्यात्मिक स्तरावर राहून करण्यास शिकले.

५. परात्पर गुरु डॉक्टरांनी अहंभाव असल्याची जाणीव करून देऊन श्री. मुकुल गाडगीळ यांच्याप्रमाणे चेहर्‍यावर चैतन्य येण्यासाठी स्वयंपाकघरात सेवा करण्यात सांगणे

एकदा एका विषयाचे परीक्षण सांगण्यासाठी मी गुरुदेवांकडे गेले होते. तेव्हा त्यांनी मला आरशासमोर उभे रहायला सांगितले. मी आरशासमोर उभी राहिले; पण ‘काय करायचे’, ते मला काहीच कळत नव्हते. गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘आरशात स्वतःला पहा.’’ मी ‘काय पहायचे ?’, असे त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तुमच्या पतीचे स्मरण करा. त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर आणा. पतीचा चेहरा आठवून काय वाटते ते सांगा.’’ तेव्हा मला लक्षात आले की, श्री. गाडगीळ यांच्या चेहर्‍यावर चैतन्य आहे. मी तसे सांगितल्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘तुमच्यात अहंभाव आहे; म्हणून तुमच्या चेहर्‍यावर चैतन्य अल्प आहे. त्यामुळे तुम्ही स्वयंपाकघरात सेवा करा. मग तुमचा चेहरा श्री. गाडगीळ यांच्यासारखा होईल.’’

६. ‘स्वयंपाकघरात सेवा करावी’, असे वाटू लागल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘स्वेच्छा न ठेवता ईश्वरेच्छेने संगीत साधना करायची आहे’, याची आठवण करून देणे

गुरुदेवांनी सांगितल्यावर मी २ मास स्वयंपाकघरात सेवा केली. मला त्या सेवेतून पुष्कळ आनंद मिळू लागला. त्या आनंदात मला आधी करत असलेल्या संगीत साधनेचाही विसर पडला. त्या वेळी गुरुदेवांनी मला पुन्हा बोलावले आणि विचारले, ‘‘संगीत साधनेची पुढील सेवा करायची आहे ना ?’’ मी त्यांना विचारले, ‘‘मला आता स्वयंपाकघरात छान वाटत आहे, तर मी तिथेच सेवा करू का ?’’ त्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘संगीतातील पुढची साधना करायची आहे. आता स्वेच्छा नको. ईश्वरेच्छेने वागायचे.’’

७. उत्तरदायी साधकांचे न ऐकता परात्पर गुरु डॉक्टरांच्या भोजनाच्या ताटात लिंबाची फोड ठेवणे आणि गुरुदेवांनी लिंबाची फोड ताटात तशीच ठेवल्याचे पाहून स्वेच्छेने वागल्याची जाणीव होणे :

मी स्वयंपाकघरात सेवा करत असतांना गुरुदेवांनी मला ‘कु. रेखा काणकोणकर (आताच्या सनातनच्या संत पू. रेखा काणकोणकर) यांचे ऐकावे’, असे सांगितले. मी त्यांना म्हटले, ‘‘हो. मी त्यांना विचारूनच करते.’’ स्वयंपाकघरात १ मास सेवा झाल्यानंतर एक दिवस मला गुरुदेवांसाठी स्वयंपाक करण्याची संधी मिळाली. मला ती संधी मिळाली; म्हणून मी दिवसभर पुष्कळ प्रार्थना केल्या. त्यांच्यासाठी आवश्यक ते सर्व पदार्थ बनवून मी ते एका ताटात वाढले आणि ‘नीट वाढले आहे ना ?’, हे दाखवण्यासाठी मी रेखाताईकडे गेले. रेखाताई म्हणाली, ‘‘काकू, बाकी सर्व ठीक आहे. केवळ ती लिंबाची फोड तेवढी काढा.’’ मला वाटले, ‘वरण-भात आहे, तर लिंबू तर हवेच.’ त्यामुळे मी रेखाताईला म्हटले, ‘‘लिंबाची फोड असू दे. ते खातील.’’

त्यानंतर ते ताट मी गुरुदेव ज्या ठिकाणी भोजन करायचे, त्या पटलावर ठेवून आले. परत आल्यानंतर शाळेचा १० वीचा निकाल असतांना पोटात जसा गोळा येतो, तसेच मला झाले. मी गुरुदेवांचे भोजन होण्याची वाट पहात राहिले. त्यांनी भोजन करून ताट परत पाठवले. तेव्हा वर झाकलेले ताट उघडून मी पाहिले, तर त्यांनी केवळ लिंबाची ती फोड बाजूला काढून ठेवली होती. रेखाताईने सांगूनही मी तिचे न ऐकता स्वेच्छेने ती लिंबाची फोड गुरुदेवांच्या ताटात ठेवली होती. माझ्या अहंकाराचे ते लिंबू गुरुदेवांनी परत पाठवून मला शिकवले की, ‘स्वेच्छेने काहीच करायचे नाही !’

८. सूक्ष्म परीक्षण करतांना ‘सहज जाऊ शकतो, अशा ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सूक्ष्मातील घडामोडी जाणून घ्याव्यात, त्यासाठी साधनेची ऊर्जा खर्च करू नये’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे

फोंडा येथे एक उद्यान आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला त्या उद्यानाचे सूक्ष्म परीक्षण करायला सांगितले. मी परीक्षण केले आणि ते त्यांना सांगायला गेले. त्या वेळी गुरुदेव म्हणाले, ‘‘एवढ्या लवकर जाऊन आलात ?’’ मी त्यांना म्हटले, ‘‘मी उद्यानात गेलेच नाही. मी इथे बसूनच परीक्षण केले.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘अशाने साधना खर्च होते. उद्यान जवळच आहे ना, तर प्रत्यक्ष जाऊ शकतो. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष जाणे शक्य होत नाही, त्या प्रसंगात दूरचे जाणून घेण्यासाठी साधना खर्च करावी.’’

९. एका साधिकेच्या मृत्यूनंतर परात्पर गुरु डॉक्टरांनी तिच्या लिंगदेहाचे सूक्ष्म परीक्षण करण्यास शिकवणे

स्थुलातून घडणार्‍या कृतींचे सूक्ष्म परीक्षण करायला शिकवल्यानंतर एक दिवस गुरुदेव मला म्हणाले, ‘‘आता मृत्यूनंतर लिंगदेहाचा प्रवास कसा होतो’, त्याचे परीक्षण करायचे.’’ त्या वेळी एक साधिका कर्करोगाच्या वेदनांमुळे पुष्कळ कण्हायची. गुरुदेवांनी तिच्या मृत्यूनंतर तिच्या लिंगदेहाचे परीक्षण मला करायला सांगितले. सूक्ष्म परीक्षण करतांना मला तिच्या कण्हण्याचा आवाज येत असे. ‘मृत्यूनंतरही तिचा कण्हण्याचा आवाज का येतो ?’, असे मी गुरुदेवांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘तिला मृत्यूपूर्वी वेदना होत असतांना तिच्या चित्तावर वेदनांचा आणि कण्हण्याचा संस्कार झाला आहे. त्यामुळे तुम्हाला तिच्या कण्हण्याचा आवाज येत आहे. त्या साधिकेला तुम्ही सूक्ष्मातून सांगा की, तिच्या मृत्यूमुळे स्थूलदेहाच्या समवेत वेदनाही गेल्या आहेत.’’

अशा प्रकारे गुरुदेवांनी मला ‘मृत्यूनंतरचे विश्व कसे असते’, तेही शिकवले.

१०. ‘सत्संग कसा घ्यायचा’, यातील बारकावे प्रसंगांतून शिकवणे

एक दिवस गुरुदेवांनी मला अहं निर्मूलनासाठी साधकांची बैठक घ्यायला सांगितले. त्या वेळी मी बैठक घेऊन साधकांतील अहंभावाची लक्षणे सांगितली. नंतर गुरुदेवांनी विचारले, ‘‘बैठक कशी झाली ?’’ मी म्हटले, ‘‘छान झाली.’’ त्यांनी विचारले, ‘‘तुम्हीच बोलत राहिलात का ?’’ मी ‘हो’ म्हटल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘असे नको. प्रत्येकाला विचारा, त्याच्यात अहंची लक्षणे कोणत्या प्रकारे दिसून येतात. प्रत्येकाचा अहंकार कसा आहे, ते शोधा.’’

अशा प्रकारे ‘सत्संग कसा घ्यायचा’, ‘सर्वांशी कसे बोलायचे’, हे गुरुदेवांनीच मला शिकवले आहे.

११. ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील चित्रातून ‘गुरुदेवच सर्वस्व आहेत’, हे शिकवणे  

साधनेच्या आरंभीच्या काळातही माझा कुलदेवीचा नामजप होत नव्हता. हे एक दिवस मी गुरुदेवांना सांगितले. तेव्हा त्यांनी एका साधिकेला सनातनचा एक ग्रंथ आणण्यास सांगितला. ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर तेव्हा ‘कुलदेवी साधकाला गुरूंकडे घेऊन जात आहे’, अशा आशयाचे चित्र होते. ग्रंथावरील ते चित्र दाखवून गुरुदेव मला म्हणाले, ‘‘आता तुम्ही माझ्याकडे आला आहात ना, तर आता तुमचा कुलदेवीचा नामजप कसा होईल ?’’

अशा प्रकारे त्यांनी ‘गुरुदेवच माझ्यासाठी सर्वस्व आहेत’, ते चित्रातून शिकवले.

साधक गुरूंच्या कृपेविना ईश्वरप्राप्ती करू शकत नाही. अशाच प्रकारे गुरुदेव मला अजूनही अनेक प्रसंगांतून शिकवत आहेत. त्यांच्याकडून अखंड शिकत रहाण्यासाठी मला प्रत्येक क्षण ‘शिष्य’ बनून रहायचे आहे !’

– श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (७.१२.२०२२)

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (या अवतारी जिवाच्या) यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या आईंना (पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना) झालेले त्रास आणि त्या कालावधीत त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

पू. (सौ.) शैलजा परांजपे

१. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा जन्म झाल्यानंतर आधुनिक वैद्यांनी ‘बाळाच्या आईला रक्त देण्याची आवश्यकता आहे’, असे सांगणे

‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा जन्म झाल्यानंतर मी (श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची आई (पू.) सौ. शैलजा परांजपे) बेशुद्धावस्थेत होते. आधुनिक वैद्य श्रीकृष्ण वाटवे यांनी माझ्या यजमानांना (पू. सदाशिव परांजपे यांना) सांगितले, ‘‘बाळाच्या आईला रक्त देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही ताबडतोब रक्ताची व्यवस्था करा.’’

२. यजमान रात्री एका रक्तपेढीत गेल्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी त्यांना ‘‘आता रक्त उपलब्ध नाही, तुम्ही उद्या या’’, असे सांगणे  

ती रात्रीची वेळ असल्यामुळे ‘आता रक्त कुठे मिळणार ?’, अशी त्यांना काळजी वाटू लागली. यजमान रात्रीच रक्तपेढीत गेले. त्या वेळी रक्ताची एवढी उपलब्धता होत नसे; कारण रक्तदानाचे महत्त्व कोणाला ठाऊक नव्हते. यजमान रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना तेथील आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘आता रक्त उपलब्ध नाही. तुम्ही उद्या या.’’

३. दुसर्‍या दिवशी आठवड्याचा बाजार असल्याने त्या दिवशीही रक्त उपलब्ध न होणे

दुसर्‍या दिवशी यजमान पुन्हा रुग्णालयात गेले. रुग्णालय असलेल्या ठिकाणी आठवड्याचा बाजार भरत असल्यामुळे रुग्णालय अधिक वेळ चालू ठेवत नसत. त्यामुळे तो दिवस तसाच गेला. मी शुद्धीवर नव्हते. मला ‘सलाईन’ लावून ठेवले होते. त्या वेळी माझ्या पहिल्या बाळाचा (मुलीचा) मृत्यू झाल्यामुळे सगळे दुःखात होते. अंजलीताई जुळ्या मुलींतील दुसरी मुलगी आहे. सर्वांना माझी काळजी वाटत होती.

४. परमेश्वरी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने तिसर्‍या दिवशी रक्ताची बाटली ४५० रुपयांना उपलब्ध होणे

पूर्वी रक्तदान करण्याची पद्धत नसल्याने आधुनिक वैद्यांचा नाईलाज होत असे. रक्त लगेच उपलब्ध होत नसे. माझी ज्या रुग्णालयात प्रसुती झाली, ते रुग्णालय ‘होलसेल’ व्यापारी पेठेत होते. तेथे मालाची चढ-उतार करण्यासाठी गरीब मजूर असत. त्यांना पैशाची नड भासत असे. आधुनिक वैद्य या गरजू कामगारांना अधिक पैसे देऊन त्यांचे रक्त घेत असत.

तिसर्‍या दिवशी यजमान पुन्हा रुग्णालयात गेले. तेव्हा त्यांना परमेश्वरी कृपेने रक्त मिळाले. त्या वेळी ती एक रक्ताची बाटली ४५० रुपयांना मिळाली. ‘त्याचे आताच्या दराने किती मूल्य झाले असते’, याचा विचारच करवत नाही. गुरुकृपेने रक्ताची सोय होऊन माझा जीव वाचला; कारण परमात्मा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) माझ्या पाठीशी होता. देवाच्या कृपेने मी जिवंत राहिले; कारण माझ्या हातून सौ. अंजलीताईसारख्या दैवी बालकाचे पालन-पोषण होणार होते.

५. कृतज्ञता

यातून लक्षात येते, ‘एखाद्या व्यक्तीच्या पोटी उन्नत जीव जन्माला येणार असला की, अनंत अडचणी येतात. तो जीव जिवंत राहू नये, यासाठी अनिष्ट शक्ती त्याच्यावर आक्रमणे करतात.’ त्या वेळी मला ज्ञात नसलेले माझे गुरुदेव माझ्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी मला संकटमुक्त केले. गुरुदेवा, मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– (पू.) सौ. शैलजा परांजपे, ढवळी, फोंडा, गोवा. (११.१२.२०२२)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक