धर्मरथ आणि शक्तीरथ (सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने वाहून नेणारी मोठी वहाने) चालवण्याची सेवा करणार्या साधकांना काही वेळा रात्री-अपरात्री प्रवास करावा लागतो. ही सेवा करणार्या एका साधकाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. देवद आश्रमातून सोलापूर जिल्ह्यातील श्रीपूर येथे जात असतांना मार्ग न सापडणे आणि मध्यरात्री एका व्यक्तीने साहाय्य करणे
१ अ. ‘श्रीपूर येथे जाण्यासाठी नेमके वळण कुठे घ्यावे ?’, हे लक्षात न येणे, त्या मार्गावर एक बाई ३ वेळा दिसणे आणि तिच्याजवळ पोचताच ती नाहीशी होणे : ‘१६.५.२०२० या दिवशी आम्ही देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातून शक्तीरथ घेऊन सोलापूर जिल्ह्यातील ‘श्रीपूर’ या गावी जाण्यासाठी निघालो होतो. तेव्हा आम्ही भ्रमणभाषवर प.पू. भक्तराज महाराज यांची (प.पू. बाबांची) भजने लावली होती. श्रीपूर येथील साधकांचा भ्रमणभाष आल्यावर भजने बंद झाली. ते साधक आम्हाला ‘गावात कसे यायचे ?’, याविषयी सांगत होते. त्यांनी ‘वेळापूर चौक’ ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला एक पत्र्याची शेड दिसल्यावर उजवीकडे वळा’, असे सांगितले. त्यानुसार तो चौक ओलांडल्यावर मला एक विचित्र दिसणारी बाई दिसली. ती बाई दिसल्यानंतर मला घाबरल्यासारखे झाले. ‘मी का घाबरलो आहे ?’, हे माझ्या लक्षात आले नाही. माझा ‘परम पूज्य, परम पूज्य’, असा जप चालू झाला. त्यानंतर मला ती बाई पुन्हा दिसली.
‘ज्या ठिकाणी वळायचे होते, ते वळण ओलांडून मी पुढे गेलो होतो’, हे श्रीपूरच्या साधकांचा भ्रमणभाष आल्यावर मला समजले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही पुढे गेला आहात. आता मागे या.’’ माझ्या समवेत असलेले साधक झोपले होते. मी त्यांना उठवले आणि शक्तीरथ वळवून आम्ही परतलो. पुढे जात असतांना मला ती बाई तिसर्यांदा दिसली. तेव्हा ‘श्रीपूरला कसे जायचे ?’, हे तिला विचारूया’, असा विचार सहसाधकाच्या मनात आला. तेव्हा मी म्हणालो, ‘‘दादा, मला ही बाई तिसर्यांदा दिसत आहे.’’ आम्ही तिच्याजवळ जाताच ती बाई तेथून नाहीशी झाली. तेव्हा आम्ही भ्रमणभाषवर प.पू. बाबांची भजने लावली आणि पुढच्या मार्गाला लागलो.
१ आ. प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केल्यावर एक व्यक्ती विजेरी (बॅटरी) घेऊन येणे आणि तिने मार्ग दाखवणे : आम्ही तेथे थांबून श्रीपूरच्या साधकांना भ्रमणभाष करून मार्ग विचारला. त्या वेळी ते साधक ‘सरळ या’ असेच सांगत होते; परंतु आम्हाला सरळ मार्ग दिसत नव्हता. त्या वेळी आम्ही प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना केली, ‘बाबा, आमच्या काही लक्षात येत नाही. तुम्हीच मार्ग दाखवा.’ त्यानंतर रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास एक व्यक्ती विजेरी (बॅटरी) घेऊन आमच्या दिशेने आली. तिने आम्हाला विचारले, ‘‘कुठून आला आहात ? कुठे जाणार आहात ?’’ आम्ही त्यांना ‘श्रीपूरला जाणार’, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हा मार्ग नाही. डाव्या बाजूचा मार्ग आहे. तिकडून जा.’’
१ इ. आम्ही तेथून निघालो असता शक्तीरथासमोर एक पक्षी उडत आला. ‘आम्ही श्रीपूर येथे पोचेपर्यंत तो पक्षी आमच्या शक्तीरथाच्या समोरच होता’, असे आमच्या लक्षात आले.
२. गोवा येथून कर्नाटक येथे जातांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देण्याची साडी समवेत असल्याने ‘त्या समवेत आहेत’, असे वाटणे आणि संपूर्ण प्रवासात स्थिरता अन् आनंद अनुभवणे
७.७.२०२० या दिवशी आम्ही गोवा येथून कर्नाटक राज्यात जाण्यासाठी निघालो. त्या वेळी माझ्याकडे रामनाथी आश्रमातून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळकाकू यांना देण्यासाठी साडी दिली होती. मी ती साडी माझ्या आसनाच्या मागे ठेवली होती. त्यामुळे प्रवासाला आरंभ केल्यापासून ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ माझ्या समवेतच आहेत’, या विचाराने संपूर्ण प्रवासात मला पुष्कळ आनंद होत होता.
त्या वेळी आम्हाला कर्नाटकच्या सीमेवर परवाना मिळाला नाही; म्हणून एक दिवस थांबावे लागले होते. असे झाल्यावर माझी नेहमी चिडचिड होत असते; पण या वेळी त्या संपूर्ण प्रसंगात मला स्थिर रहाता आले. ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ समवेत आहेत आणि त्याच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहेत’, असा विचार माझ्या मनात होता. त्यामुळे मला स्थिर आणि आनंदी रहाता आले. त्यासाठी माझ्याकडून देवाच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
३. पनवेलहून गोव्याला जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नागोठणे (जिल्हा रायगड) येथील जन्मस्थानी जाण्याची संधी मिळणे आणि तेथे नामजप केल्याने पुढे संपूर्ण प्रवासात स्थिर अन् भावस्थितीत रहाता येणे
२१.७.२०२० या दिवशी मी धर्मरथ घेऊन पनवेलहून गोव्याला जात होतो. तेव्हा मला एका सेवेनिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मस्थानी नागोठणे (जिल्हा रायगड) येथे जाण्याची संधी मिळाली. तेथे गेल्यावर माझे मन शांत, स्थिर आणि आनंदी झाले. तेथून सेवा करून निघाल्यानंतर मला प्रवासात पुष्कळ प्रमाणात आनंद आणि उत्साह जाणवत होता. त्यानंतर आम्ही देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथे पोचल्यावर धर्मरथाची थोडीफार दुरुस्ती निघाली. त्या वेळी माझ्या मनाची स्थिती चांगली होती. वाहन दुरुस्तीसाठी ‘मेकॅनिक’ मिळत नव्हता. तेव्हा माझी चिडचिड झाली नाही. त्यानंतरही धर्मरथाच्या दुरुस्तीसाठी अनुमाने ४ – ५ घंटे लागले, तरीही माझ्या मनाची स्थिती चांगली आणि आनंदी होती.
‘परात्पर गुरुदेवांच्या जन्मस्थानी जाऊन नामजप केल्यामुळे संपूर्ण प्रवासात मला स्थिर आणि भावस्थितीत रहाता आले’, याबद्दल मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– एक साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.७.२०२०)
|