जळगाव – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल ११ डिसेंबरला घोषित झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार पॅनल आणि महायुतीचे शेतकरी विकास पॅनल यांच्यात सरळ लढत होती. सहकार पॅनलची धुरा माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्याकडे, तर शेतकरी विकास पॅनलची धुरा आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे होती. यात ग्रामविकासमंत्री श्री. गिरीश महाजन, पाणीपुरवठामंत्री तथा जळगावचे पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटील यांच्यासह आजी-माजी आमदारांचा समावेश होता. २० पैकी एक जागा बिनविरोध निवडून आल्याने १९ जागांसाठी अतिशय चुरशीच्या झालेल्या या लढतीत सहकार पॅनलला केवळ ४ जागांवर विजय मिळाला असून शेतकरी विकास पॅनलने १६ जागा प्राप्त करत निर्विवाद बहुमत सिद्ध केले. यात मंत्री ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे यांचा समावेश आहे.