रशियामध्ये ४८ सहस्र वर्षांपूर्वीचा प्राणघातक ‘झोंबी’ विषाणू सापडला !

बाबा वेंगा यांनी केली होती याविषयीची भविष्यवाणी !

मॉस्को (रशिया) – रशियातील शास्त्रज्ञांनी ४८ सहस्र ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोंबी’ विषाणू पुन्हा जिवंत झाल्याची माहिती दिली आहे. रशियातील एका गोठलेल्या तलावात हा विषाणू गाडला गेला होता.

हा संपूर्ण परिसर बर्फाच्छादित असल्यामुळे या विषाणूपासून कोणताही धोका नव्हता; मात्र हवामान पालटामुळे येथील बर्फ वितळू लागल्याने हा विषाणू जगात पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे महिला भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी ‘वर्ष २०२२ मध्ये गोठलेल्या स्वरूपातील विषाणू पुन्हा सापडेल’, असे केलेले भविष्य खरे ठरले आहे.

सध्या रशियातील शास्त्रज्ञांची एक तुकडी या प्राणघातक विषाणूचा अभ्यास करत आहे. हवेतून या विषाणूचा प्रसार झाल्यास हा जगासाठी मोठा धोका ठरू शकतो.