सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात अथर्वशीर्षावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संस्कृत प्राकृत विभागाने अथर्वशीर्ष प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू केला असून विद्यापिठाने याला मान्यता दिली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट आणि वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील संस्कृत विभाग हेही या अभ्यासक्रमातील सहयोगी आहेत. संपूर्ण अभ्यासक्रम नि:शुल्क आहे. कुणीही त्यात सहभागी होऊ शकतो. २१ दिवसांच्या २१ ‘व्हिडिओ लिंक’मध्ये त्याची रचना करण्यात आली आहे. श्‍लोकांचे निरूपण करण्यात आले असून त्यावर आधारित प्रश्‍न विचारण्यात आले आहेत. या प्रश्‍नांची उत्तरे दिल्यांनतर आकर्षक प्रमाणपत्र ‘ऑनलाइन’ मिळणार आहे. प्रश्‍नपत्रिका सोडवण्यासाठी कालमर्यादेचे कोणतेही बंधन असणार नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधीक्षक डॉ. पराग काळकर म्हणाले की, संस्कृत भाषेप्रती आत्मियता आणि जिव्हाळा निर्माण होऊन ती शिकण्याची इच्छा प्रबळ व्हावी, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. भारतीय संस्कृतीची माहिती करून देण्याच्या नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत संस्कृत प्राकृत विभागाने हा अभ्यासक्रम सिद्ध केला आहे. यात कोणताही धार्मिक दृष्टीकोन नसून भाषिक अन् त्यातही संस्कृत भाषेची माहिती व्हावी, हा उद्देश आहे.

संपादकीय भूमिका

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचा स्तुत्य उपक्रम !