‘हलाल’ला झटका !

कुठल्याही चुकीच्या गोष्टींना विरोध केल्याविना त्या गोष्टी बंद होत नाहीत, ही आपल्याकडची रीत बनली आहे. मुंबईतील मरिन लाईन्स येथील इस्लाम जिमखाना येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेला ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रमही त्यास अपवाद ठरला नाही. हलाल वस्तूंच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ब्लॉसम इंडिया’ नावाच्या संघटनेने मोठा गाजावाजा करून मुंबईत ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. याचा हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, व्यापारी संघटना, अखिल भारतीय खाटिक समाज आदी संघटनांनी संघटित होऊन वैध मार्गांनी निषेध नोंदवला आणि हा कार्यक्रम रहित करण्याची मागणी सरकारकडे केली. यासह या संघटनांनी मुंबई पोलिसांना निवेदन देऊन हलालद्वारे मिळालेल्या पैशांचा देशविरोधी कारवायांसाठी होत असलेल्या वापराकडे लक्ष वेधले. विविध मान्यवरांनीही या कार्यक्रमाच्या विरोधात दंड थोपटले होते. या सर्वांचा परिणाम म्हणून अंततः ‘हलाल शो इंडिया’ रहित करण्याची घोषणा आयोजकांना करावी लागली.

हलालला मिळालेला हा तगडा ‘झटका’ आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या राजधानीतच देशाच्या अर्थव्यवस्थेला आव्हान देणार्‍या समांतर आणि घटनाबाह्य अशा हलाल अर्थव्यवस्थेचा उदो उदो करणारा कार्यक्रम आयोजित करून आयोजकांना कोणता संदेश द्यायचा होता ? हा कार्यक्रम आर्थिक राजधानीत घेणे, हा खरे तर मुंबईच्या आणि पर्यायाने महाराष्ट्र अन् देशाच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचाही प्रकार होता; कारण मुंबईवरील ‘२६/११’च्या आतंकवादी आक्रमणातील आरोपींचे खटले लढण्यासाठी याच हलालद्वारे पैसा पुरवला जातो ! ‘जमियत उलेमा-ए-हिंद ट्रस्ट’ ही संघटना हलाल उत्पादनांतून मिळालेला पैसा या आरोपींना सोडवण्यासाठी वापरते. असे असतांना मुंबई पोलीस आणि प्रशासन यांनी ‘हलाल शो इंडिया’ला मुंबईतच अनुमती दिलीच कशी ?’, हा प्रश्न उपस्थित करत ‘या कार्यक्रमाला अनुमती देऊन जनतेचा रोष ओढवून घेऊ नका’, असे आवाहन ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने मुंबईच्या पोलीस आयुक्तांना केले. त्यानंतर हा कार्यक्रम रहित झाला. विशेष म्हणजे २८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी, म्हणजे ‘हलाल शो इंडिया’च्या नियोजित कार्यक्रमाच्या १५ दिवस आधी मुंबईत झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी ‘आतंकवाद्यांना होणारा अर्थपुरवठा, हेच आतंकवादी कारवायांचे मूळ आहे’, असे नमूद केले. हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून हाच प्रकार होत नसल्याचे आजच्या घडीला छातीठोकपणे कोण सांगणार ? वास्तविक ‘हा कार्यक्रम रहित करा’, अशी मागणीही हिंदुत्वनिष्ठांसह अन्य संघटनांना करावी लागायला नको होती. त्यामुळे यापुढे तरी पोलीस आणि प्रशासन यांनी अशा कार्यक्रमांना अनुमती देऊ नये.

हलालच्या या कार्यक्रमाचे मुंबईवरील संकट टळले असले, तरी देशावरील संकट कायम आहे. देशात जेथे जेथे अशा परिषदा होतील, तेथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अशीच एकजूट दाखवून अशा कार्यक्रमांना वैध मार्गांनी विरोध केला पाहिजे. हा कार्यक्रम रहित झाला, म्हणजे सगळे संपले असे नाही, जोपर्यंत भारतात हलालचे प्रमाणीकरण करणारी व्यवस्था निरस्त होत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिला पाहिजे. आवश्यकता आहे ती आपण सर्वांनी कृतीशील होण्याची !