सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांच्या निधनानंतरचा आज (९.११.२०२२) अकरावा दिवस आहे, त्या निमित्ताने…
३०.१०.२०२२ या दिवशी दुपारी ४.२७ वाजता सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांनी देहत्याग केला. देहत्यागापूर्वी ते आजारी असतांना आणि देहत्यागाच्या वेळी त्यांची मुलगी सुश्री (कु.) दीपाली होनप यांना त्यांची जाणवलेली वैशिष्ट्ये येथे देत आहोत.
गेल्या एका मासात पू. पद्माकर होनप यांच्या शारीरिक त्रासांत वाढ होणे
‘पू. बाबांची (पू. पद्माकर होनप यांची) प्रकृती मागील साधारण १ मासापासून खालावली होती. त्यांच्या शारीरिक त्रासांत दिवसेंदिवस वाढ होत होती. त्यांच्या शरिरातील प्रोटीनचे प्रमाण न्यून झाल्याने त्यांना पुष्कळ अशक्तपणा आला होता. अशक्तपणामुळे ते जवळजवळ दिवसभर गुंगीतच असायचे. पुढे पुढे त्यांना मूत्रविसर्जनाचेही भान राहिले नाही. त्यांचा आवाज पुष्कळ खोल गेला होता. त्यांना बोलायलाही त्रास होत होता. त्यांच्या जांघेत जंतूसंसर्ग (fungal infection) झाल्याने तो भाग सोलवटून लाल झाला होता. त्यामुळे त्यांना तीव्र वेदना होत होत्या. त्यांना उठणे-बसणे कठीण झाले होते. त्यांना पाठदुखीचा त्रास असल्याने पाठीवर झोपता येत नव्हते. त्यांना केवळ डाव्या कुशीवर झोपता येत होते. त्यामुळे त्यांचे अंग सतत दुखत असे. त्यांच्या खुब्याचे हाड झिजल्याने त्यांना त्या ठिकाणी पुष्कळ वेदना होत असत. पूर्वीपासून त्यांचा एक डोळा पूर्ण बंद होत नसे. पू. बाबा गुंगीत असल्याने झोपेत तो डोळा उघडा राहिल्याने लाल होऊन त्यातून पाणी यायचे.
कर्करोगावरची औषधे घेतल्याने त्यांच्या शरिरातील उष्णता वाढली होती. उष्णतेने त्यांचे तोंड आले होते. त्यांचे तोंड सोलवटून निघाले होते. त्यामुळे त्यांना काही खाताही येत नव्हते. तोंडाला चव नव्हती. पुढे पुढे त्यांचे जेवण न्यून होत गेले. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्हाला खाण्यासाठी वेगळे काही करून देऊ का ? थोडे तरी अन्न पोटात जाईल.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मला पंचपक्वान्ने जरी दिली, तरी ती कडूच लागतील. त्यामुळे वेगळे काही करू नकोस.’’ त्यानंतर एकदा त्यांना चहा दिल्यावर ते म्हणाले, ‘‘चहा तिखट लागतोय.’’ नंतर त्यांनी चहा घेणे बंद केले.
१५.१०.२०२२ पासून त्यांना ‘दिवस आहे कि रात्र ?’, हे समजत नव्हते. जेवण झाल्यानंतर ते विचारायचे, ‘‘माझे जेवण झाले आहे का ?’’
रुग्णाईत असूनही उत्साही असणे
मी त्यांना विचारायचे, ‘‘फिरायला जायचे का ?’’ तेव्हा पुष्कळ अशक्तपणा असूनही ते फिरायला जाण्यास सिद्ध असायचे. पूर्वी ते स्वतः एकटेच आश्रमातील आगाशीपर्यंत जाऊन फिरून यायचे. गेल्या मासात अशक्तपणा वाढल्याने चालतांना त्यांचा तोल जाऊ लागला. तेव्हा मी त्यांचा हात धरून त्यांना फिरायला न्यायचे.
२६.१०.२०२२ या दिवशी त्यांना पुष्कळच अशक्तपणा असल्याने मी त्यांना चाकांच्या आसंदीवर बसवून फिरवून आणले. त्या दिवशी भाऊबीज असल्याने आश्रमात सर्वत्र दिवे लावले होते. दिवे पाहून त्यांना पुष्कळ आनंद झाला.’
पू. होनपकाका यांचा साधकांविषयीचा भाव आणि अल्प अहं
१. ‘पू. बाबा (पू. पद्माकर होनप) औषधे किंवा ‘प्रोटिन पावडर’ घ्यायला सिद्ध नसायचे. त्या वेळी आम्ही त्यांना सांगायचो, ‘‘सकाळी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांनी हे औषध घ्यायला सांगितले आहे’’ किंवा ‘‘होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता यांचा आता भ्रमणभाष आला होता. त्यांनी तुम्हाला हे औषध घ्यायला सांगितले आहे.’’ हे ऐकल्यावर ते लगेच औषध किंवा ‘प्रोटिन पावडर’ घ्यायचे.
२. वर्ष २०१८ आणि वर्ष २०१९ मध्ये पुणे येथे पू. बाबांची दोन शस्त्रकर्मे झाली. त्या वेळी घ्यावयाच्या उपचारांच्या संदर्भात ते म्हणायचे, ‘‘डॉ. ज्योती काळे (पुणे येथील साधिका) यांना विचारून करूया. त्या सांगतील, तसेच करूया.’’
पू. पद्माकर होनप यांनी स्वतःच्या देहत्यागाविषयी केलेले सूतोवाच
१. ‘२६.१०.२०२२ या दिवशी पू. बाबा पू. जयराम जोशीआजोबा (सनातनचे ५१ वे संत, वय ८४ वर्षे) यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी पू. आजोबांची सून सौ. भाग्यश्री योगेश जोशी यांनी पू. बाबांना विचारले, ‘‘तुम्हाला एवढा त्रास होत असूनही तुम्ही एवढे आनंदी कसे ?’’ तेव्हा पू. बाबा म्हणाले, ‘‘हा परतीचा आनंद आहे !’’
२. पू. बाबांना पुष्कळ वेदना होत असल्याने ते कण्हत असत आणि मला अन् माझा भाऊ राम याला (श्री. राम होनप यांना) हाका मारून वेदना होत असल्याचे सांगत असत. २७.१०.२०२२ या दिवशी पू. बाबांनी रात्री आम्हाला हाक मारली आणि सांगितले, ‘‘केवळ आता उठा ! मी तुम्हाला परत कधीही त्रास देणार नाही.’’
पू. पद्माकर होनप यांचा देहत्याग
‘२९ आणि ३०.१०.२०२२ या दिवशी ते वेदनांमुळे सतत कण्हत होते. त्या दिवशी सकाळी ते केवळ १ – २ चमचे पाणी प्यायले. त्यानंतर त्यांना पाणी पाजल्यावर त्यांनी ते गिळले नाही. त्यानंतर त्यांच्या कण्हण्यात वाढ झाली होती. त्यामुळे दुपारी ४.२० वाजता आधुनिक वैद्यांनी त्यांना वेदनाशामक इंजेक्शन दिले. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण न्यून झाल्याने त्यांना यंत्राद्वारे ऑक्सिजन देण्याचे ठरले. आधुनिक वैद्यांनी त्यांना ऑक्सिजन दिला. त्या वेळी त्यांची दृष्टी ऊर्ध्वगामी होती. (२ दिवस त्यांनी डोळे उघडले नव्हते.) साधारण ३० सेकंदांनी त्यांनी डोळे मिटले. तेव्हा त्यांनी देहत्याग केल्याचे लक्षात आले. त्या वेळी त्यांचा चेहरा तेजस्वी दिसत होता. तेव्हा ‘देव पहावया गेलो आणि देवची होऊनी गेलो ।’, अशी पू. बाबांची उच्च स्थिती आहे’, असे मला जाणवले. ‘पू. बाबांनी ‘इंजेक्शन घेणे आणि ऑक्सिजनची नळी नाकपुड्यांत घालणे’, या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत प्रारब्ध भोगले अन् संपवले’, असे मला वाटले.’
– सुश्री (कु.) दीपाली होनप ((कै.) पू. पद्माकर होनप यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.११.२०२२)