केरळमध्ये एन्.आय.ए.च्या अधिकार्‍याला ठार मारण्याची धमकी

  • रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाच्या हत्येचे करत आहेत अन्वेषण

  • हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत पी.एफ्.आय.चे ३४ जण अटकेत

थिरूवनंतपूरम् (केरळ) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एस्.के. श्रीनिवासन् यांच्या हत्येचे अन्वेषण करणारे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी अनिल कुमार यांना अज्ञात व्यक्तीने हत्या करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पलक्कड पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलीस चौकशी करत आहेत. श्रीनिवासन् यांची हत्या १६ एप्रिल २०२२ या दिवशी करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची (‘पी.एफ्.आय.’ची) राजकीय शाखा असणार्‍या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या लोकांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत पी.एफ्.आय.च्या ३४ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

पी.एफ्.आय. वर बंदी घातली असतांनाही तिच्या कारवाया चालूच आहेत, हेच या धमकीतून लक्षात येते. याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहात पी.एफ्.आय.ची कीड मुळासकट नष्ट करण्यासाठी अजून कठोर व्हायला हवे !