‘कै. (कु.) अंकिता राजेंद्र वाघ हिने लहान वयातच किती जीवघेणे आयुष्य भोगले’, हे या लेखावरून लक्षात येईल. ‘तिने भोगलेले असह्य त्रास तिच्या कुटुंबियांनीही कसे सहन केले असतील’, याची कल्पनाही करता येत नाही. या दोन लेखांतून ‘जीवघेणे आयुष्य कसे भोगावे लागते’, हे वाचकांनी शिकून घ्यावे. तिसर्या महायुद्धाच्या काळात याचा उपयोग होईल !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (४.११.२०२२) |
श्री. राजेंद्र वाघ, त्यांच्या पत्नी सौ. रत्ना वाघ आणि त्यांची मुले अनुक्रमे सौ. ललिता विठ्ठल कदम, श्री. शुभम् वाघ अन् दिवंगत कु. अंकिता वाघ हे वापी (गुजरात) येथील साधक आहेत. मोठी मुलगी सौ. ललिता कदम आणि तिचे यजमान श्री. विठ्ठल कदम हे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. कु. अंकिता (वय २१ वर्षे) आई-वडिलांसह वापी येथे रहात होती.
वर्ष २०१८ पासून अंकिताला ‘सिस्टिमिक ल्यूपस एरिथमॅटोसिस’ (‘एस.एल.ई.’) (टीप) या दुर्धर व्याधीमुळे अनेक शारीरिक त्रास होऊ लागले. प्रती मास तिला उपचारांसाठी मुंबईतील ‘के.ई.एम्.’ या रुग्णालयात न्यावे लागायचे. नंतर कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दळणवळण बंदी लागू झाली आणि तिला रुग्णालयात नेणे अशक्य झाले. त्यामुळे तिच्या मूत्रपिंडावर (किडनीवर) परिणाम झाला. नंतर तिला कोरोनाचा संसर्गही झाला आणि तिची स्थिती पुष्कळ खालावली. २५.१०.२०२२ या दिवशी मुंबईतील ‘के.इ.एम्.’ रुग्णालयातच अंकिताचे निधन झाले. आज निधनानंतरचा १२ वा दिवस आहे.
अंकिताविषयी तिचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि ती रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
(भाग १)
(टीप : सिस्टिमिक ल्यूपस एरिथेमॅटोसिस (एस्.एल्.ई.) : या व्याधीत रुग्णाच्या शरिरातील पेशी रुग्णाच्याच शरिरातील अन्य काही पेशींना शत्रू समजून त्यांच्या विरुद्ध लढतात. त्यातून ही व्याधी उत्पन्न होते. या व्याधीमध्ये शरिरातील विविध संस्था आणि अवयव यांची कार्यक्षमता हळूहळू न्यून होत जाते.)
१. श्री. राजेंद्र आणि सौ. रत्ना वाघ (अंकिताचे वडील आणि आई), वापी, गुजरात.
१ अ. बालपणापासून स्वयंपाक आणि घरकामे करणे : ‘पहिली ते दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी अंकिता वर्हाड, जळगाव येथे तिच्या मावशीकडे (सौ. लता शिरसाळे यांच्याकडे) रहात होती. मावशीकडे रहात असतांना ती स्वयंपाक आणि घरकामे यांत मावशीला साहाय्य करून शाळेत जात असे. ती वापी येथे आमच्याकडे आल्यावरही मी (आई, सौ. रत्ना) नोकरी करत असल्याने ती स्वयंपाक आणि घरातील सर्व कामे करून आमच्या दुकानातही साहाय्य करण्यासाठी जात असे.
१ आ. व्यवस्थितपणा : अंकिताची प्रकृती बरी नसायची, तरी ती घर आणि दुकान यांची स्वच्छता करायची. तिने स्वच्छता केल्यावर ‘तिथे चैतन्य आले आहे’, असे आम्हाला जाणवायचे. ती सर्व स्वच्छ आणि नीटनेटकेपणाने करायची.
१ इ. अंकिताला तीव्र शारीरिक त्रास होणे आणि अनेक रुग्णालयांत दाखवूनही अंकिताच्या व्याधीचे निदान न होणे : वर्ष २०१८ मध्ये दुर्धर व्याधीमुळे अंकिता अनेक मास पुष्कळ रुग्णाईत होती. तिच्या या व्याधीचे निदान होत नव्हते. आम्ही जवळ जवळ ६ – ७ मास तिला अनेक रुग्णालयांत तपासणीसाठी घेऊन जात होतो. तिला तीव्र शारीरिक त्रास होत होते. तेव्हा ‘ती मरता मरता वाचली’, असेच म्हणावे लागेल. नंतरही तिची शारीरिक स्थिती काही वेळा चांगली, तर काही वेळा वाईट असायची. तिला तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे त्रास व्हायचे. त्यानंतर तिने सनातनच्या माध्यमातून साधना करायला आरंभ केला.
१ ई. संतांची अनुभवलेली कृपा !
१. वापी येथील संत पू. इंद्रवदन शुक्ल यांनी अंकितासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगितले.
२. परात्पर गुरु पांडे महाराज, सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. संदीप आळशी यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि औषधोपचार यांसाठी वेळोवेळी साहाय्य केले.’
२. सौ. लता शिरसाळे (कु. अंकिताची मावशी), वर्हाड, जळगाव.
२ अ. शिक्षण घेतांना घरातील सर्व कामे करून उत्तम प्रकारे अभ्यास करणारी अंकिता ! : ‘पहिली ते दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी अंकिता आमच्याकडे रहात होती. ती वयाने लहान असूनही मला घरातील सर्व कामांत साहाय्य करायची. तिची शाळा आमच्या जवळच्या गावात होती. त्यामुळे तिला बसने शाळेला जावे लागे. तिची शाळा सकाळी ७ वाजता असायची, तर ती शाळेत जाण्यापूर्वी कपडे धुऊन आणि पोळ्या करून नंतर शाळेला जायची. रात्री घरातील सर्व स्वयंपाक करून ती भांडीही घासायची. ही सर्व कामे करून आणि उत्तम प्रकारे अभ्यास करून तिने दहावीत चांगले गुण मिळवले.
२ आ. प्रेमळ स्वभावाने लहानथोरांना प्रिय झालेली अंकिता ! : अंकिताला लहान मुले पुष्कळ आवडत असत. ती मुलांना घरी घेऊन यायची आणि खाऊ द्यायची. मला मुलगी नाही. अंकिताच माझी मुलगी होती. माझ्या मुलांनाही ती सख्ख्या बहिणीसारखी प्रिय होती. ती आजारी पडली. तेव्हा गावातील जवळच्या लोकांपासून ते ५ वर्षांच्या लहान मुलानेही ‘ती बरी व्हावी’, यासाठी नवस केले होते. तिने सर्वांना पुष्कळ लळा लावला होता.’
३. श्री. शुभम् वाघ (अंकिताचा भाऊ), वापी, गुजरात.
३ अ. इतरांचा विचार करणे : ‘आमची आई सकाळी ८ वाजता कामावर जाते आणि रात्री १२ पर्यंत काम करते. शारीरिक त्रासांमुळे तिला सकाळी लवकर उठता येत नाही. अंकिताची शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही ती सकाळी उठून आईला जेवणाचा डबा करून द्यायची.’
४. सौ. अश्विनी शुभम् वाघ (अंकिताची वहिनी), वापी, गुजरात.
४ अ. प्रेमभाव : स्वतःला पुष्कळ शारीरिक त्रास होत असूनही अंकिताताई माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवायच्या आणि मला म्हणायच्या, ‘‘वहिनी, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या, विश्रांती घ्या.’’
५. सौ. ललिता कदम (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, अंकिताची मोठी बहीण) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५ अ. प्रेमळ स्वभाव : ‘अंकिता मुळातच पुष्कळ प्रेमळ होती. ती कधीच कुणाचे मन दुखावत नसे. त्यामुळे ती सर्वांना आवडायची.
५ आ. अंगी अनेक कलागुण असणे : अगदी १३ – १४ वर्षांची असल्यापासून अंकिता उत्तम स्वयंपाक करायची. तिला विविध पदार्थ बनवता येत. कुठलेही वर्ग न लावता ती लहानपणापासून सुंदर रांगोळी आणि हातावर मेहंदी काढत असे. ती शिवणकाम अन् वीणकामही उत्तम प्रकारे करत असे.
५ इ. समजूतदार : लहानपणापासूनच अंकिता पुष्कळ समजूतदारही होती. आमची वहिनी (सौ. अश्विनी शुभम् वाघ) लग्न करून घरी आली. तेव्हा अंकिताने वहिनीशी चांगली मैत्री केली. वहिनीला ती प्रत्येक प्रसंगात समजून घेत असे. वहिनी अंकिताशी मनमोकळेपणाने बोलत असे. कधी भाऊ आणि वहिनी यांच्यात मतभेद झाले, तर भाऊ अंकिताशी मोकळेपणाने बोलत असे.
५ ई. सहनशील
१. अंकिताला एकाच वेळी अनेक शारीरिक त्रास व्हायचे. तिच्या सर्वांगावर पुष्कळ सूज यायची. तिला पोटापासून खालपर्यंत नागीणही झाली होती. नंतर पोटाच्या खाली नागिणीचे रूपांतर व्रणात (जखमेत) झाले होते.
२. तिला सतत ‘खोकला येणे, जेवण न जाणे, उलटी आणि जुलाब होणे, आकडी (फीट) येणे’, असे त्रास होत होते.
३. तिचे पाय पुष्कळ दुखायचे; पण ती कधीच ‘माझे पाय दुखत आहेत, दाबून दे’, असे म्हणायची नाही.
इतके शारीरिक त्रास होत असूनही अंकिता शांत असायची.
५ उ. वडिलांना वाईट वाटू नये, याची काळजी घेणे : अंकिता रुग्णालयात असतांना तिचे त्रास पाहून वडिलांना पुष्कळ वाईट वाटायचे आणि त्यांना पुष्कळ ताण यायचा. वडिलांची ही स्थिती अंकिताच्या लक्षात यायची. ती रुग्णालयात असतांना वडिलांनी तिला घरून भ्रमणभाष केल्यास तिला बोलणे शक्य होत नसतांनाही ती त्यांच्याशी मोठ्या आवाजात बोलायची.
५ ऊ. नामजपादी उपायांचा जाणवलेला परिणाम
५ ऊ १. नामजपादी उपाय केल्यावर अंकिताचा तोंडवळा नितळ आणि तेजस्वी होणे : अंकिताला होणार्या शारीरिक त्रासांसाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय सांगितले होते. एकूण १० घंटे विविध नामजप करायचे होते. अंकिता हे सर्व नामजप १ मास करत होती. तेव्हा तिचा चेहरा नितळ आणि तेजस्वी झाला होता.
५ ऊ २. अन्य रुग्णांच्या नातेवाइकांना ‘अंकिता रुग्णाईत आहे’, असे न वाटणे : अंकिताला रुग्णालयात भरती केलेले पाहून अन्य रुग्णांच्या नातेवाइकांना नवल वाटायचे. ते म्हणायचे, ‘‘हिचा चेहरा किती तेजस्वी आणि सुंदर दिसतो. हिला अशा शारीरिक व्याधी आहेत’, असे वाटतच नाही.’’
५ ऊ ३. शारीरिक थकवा असूनही अंकिताने ८ घंटे नामजप करणे : काही दिवसांनी अंकिताची शारीरिक स्थिती खालावत गेली. तिच्या अवयवांची क्षमताही न्यून होत गेली. त्यानंतर तिचे जेवण न्यून झाल्यामुळे तिचा थकवा वाढला. त्यामुळे तिला शारीरिक हालचाली करणे कठीण झाले. अशा स्थितीतही ती तिला सांगितलेला नामजप करायची.
५ ऊ ४. अंकिताच्या चेहर्यात झालेला पालट पाहून वहिनीला साधनेचे महत्त्व समजणे : अंकिता पुष्कळ वेळ नामजप करत असल्यामुळे तिच्या चेहर्यात पालट झाला होता. तिच्या चेहर्याकडे पाहून माझी वहिनी म्हणायची, ‘‘तुम्ही एक मास रुग्णालयात आहात; पण तुमचा चेहरा पुष्कळ गोरा दिसत आहे.’’ तेव्हा ‘देवाचे केल्याने काही लाभ नाही’, अशी माझ्या वहिनीची धारणा होती. त्यामुळे ती साधना करत नव्हती. नंतर अंकिताची शारीरिक स्थिती आणि देवाने दिलेल्या अनुभूती यांतून तिलाही साधनेचे महत्त्व कळले.
५ ऊ ५. रुग्णालयात असतांना अंकिताला कोरोनाचा संसर्ग होणे आणि कोरोनाच्या मोठ्या ‘वॉर्ड’मध्ये अंकिता एकटीच असणे : नंतर रुग्णालयातच अंकिताला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. तिला कोरोना ‘वार्ड’मध्ये एकटीला रहावे लागले. नंतर तिला तिच्या काही औषधांचाही त्रास होऊ लागला. तिला जेवण जायचे नाही आणि पुष्कळ जुलाब व्हायचे. कोरोनाचा हा ‘वॉर्ड’ १०० जण रहातील, एवढा मोठा होता आणि नंतर अंकिता एकटीच त्या ‘वॉर्ड’मध्ये रुग्ण म्हणून राहिली होती. त्यामुळे तेथील आधुनिक वैद्य आम्हाला तिला घरी घेऊन जाण्यास सांगत होते. ‘अशा स्थितीत तिला घरी घेऊन गेलो आणि काही झाले, तर..’, असा विचार मनात येऊन आम्हाला ‘तिला घरी घेऊन जायला नको’, असे वाटायचे. त्या ‘वॉर्डचे’ दायित्व एका ज्येष्ठ आधुनिक वैद्यांकडे होते. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला अंकिताला जेवढे दिवस ठेवायचे आहे, तेवढे दिवस ठेवा.’’ तेव्हा ‘देवानेच तिची काळजी घेऊन साहाय्य केले’, असे आम्हाला वाटले.
(क्रमश: सोमवारच्या अंकात)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २९.१०.२०२२)