सद्गुरु डॉ. वसंत बाळाजी आठवले यांची (अप्पाकाकांची) आध्यात्मिक पातळी ६० टक्के झाल्यानंतर त्यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत

सद्गुरु डॉ. वसंत आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. २ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘ती. अप्पाकाकांच्या आध्यात्मिक प्रवासात त्यांच्या आई-वडिलांचा मोठा वाटा असणे’ हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

सद्गुरु (कै.) डॉ. वसंत बाळाजी आठवले

(ही मुलाखत सद्गुरु डॉ. वसंत आठवले आणि पू. शिवाजी वटकर संत होण्यापूर्वीची असल्याने या लेखमालेतील संतांच्या नावामध्ये पालट केलेला नाही. – संपादक)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/624673.html


४. रामनाथी आश्रमात वास्तव्य असतांना आलेले अनुभव

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

मी (सद्गुरु डॉ. वसंत आठवले) जानेवारी ते एप्रिल २००८, २३ नोव्हेंबर २००८ ते २० फेब्रुवारी २००९ आणि १० एप्रिल ते १५ मे २००९ या कालावधीत रामनाथी आश्रमात रहात होतो. त्या वेळी मला आश्रमातील साधक आणि परात्पर गुरु डॉक्टर यांचा सत्संग मिळाला अन् त्यांचे जीवन जवळून पहाण्याची संधी मिळाली. त्यांतील काही प्रसंग पुढे देत आहे.

४ आ. रामनाथी आश्रमातील उन्नत साधकांत आदर्श साधकाचे अनेक गुण आढळणे : उन्नत साधकांत आदर्श साधकाचे अनेक गुण आढळतात. आश्रमातील अशिक्षित साधकही सहज बोलतांना सत्संग, सेवा इत्यादी आध्यात्मिक भाषेतच बोलतात.

४ इ. अल्प शिक्षण झालेल्या साधकाने अध्यात्माचा विशेष अभ्यास केला नसूनही त्याचा साधनेमुळे मनोलय आणि बुद्धीलय होण्याची प्रक्रिया चालू झाली असून त्याची आकलनशक्ती वाढली असल्याचे लक्षात येणे : रामनाथी आश्रमात एका यंत्राद्वारे ‘मनात येणारे विविध विचार आणि होणार्‍या क्रिया यांचा मानवाच्या षट्चक्रांवर (मूलाधारचक्र, स्वाधिष्ठानचक्र, मणिपूरचक्र, अनाहतचक्र, विशुद्धचक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार यांवर) काय परिणाम होतो ?’, याचे संशोधन करणे चालू होते. त्या वेळी ‘साधकांनी त्याच्या आयुष्यातील व्यावहारिक अनुभव आणि आध्यात्मिक ज्ञान किंवा अनुभूती सांगतांना त्यांच्या षट्चक्रांतील आलेखात काही पालट होतो का ?’, याची चाचणी करणे चालू होते. खेडेगावात राहून ७ वीपर्यंत शिक्षण झालेला रामनाथी आश्रमातील एक साधक श्री. अनिल सोलयेकर याची चाचणी झाल्यानंतर तो मला भेटायला आला. तेव्हा आमच्यात पुढील संभाषण झाले.

मी : तू व्यवहार आणि अध्यात्म या विषयांवर काय बोललास ?

श्री. अनिल सोलयेकर : अप्पाकाका, अध्यात्मावर बोलणे अतिशय सोपे आहे; पण ‘व्यवहारातील काय बोलावे ?’, हे मला सुचत नव्हते.

मी : अध्यात्मातले काय बोललास ?

श्री. अनिल सोलयेकर : मनोलय, बुद्धीलय आणि अहंलय या विषयांवर बोललो.

मी : यांच्या व्याख्या काय ?

श्री. अनिल सोलयेकर : मनोलय म्हणजे सतत वर्तमानकाळात रहाणे. बुद्धीलय म्हणजे प्रसंगाचे संपूर्ण आकलन होणे आणि अहंलय म्हणजे स्वतःचे अस्तित्व विसरून परमेश्वराचे अस्तित्व जाणवणे.

त्याने दिलेले उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले. मला विचार करूनही अशी उत्तरे लगेच देता आली नसती. यावरून ‘अनिलने अध्यात्माचा विशेष अभ्यास केला नसूनही साधनेमुळे त्याची मनोलय आणि बुद्धीलय होण्याची प्रक्रिया चालू झाली असून त्याची आकलनशक्ती वाढली आहे’, हे माझ्या लक्षात आले.

पू. शिवाजी वटकर

४ ई. सूक्ष्म ज्ञान ग्रहण करणारे आणि त्या ज्ञानाचा अर्थ जाणणारे सनातनचे साधक : सनातनच्या अंदाजे ३० साधकांना सूक्ष्म ज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञान मिळत आहे. मिळालेल्या ज्ञानाचा अर्थ त्यांना पूर्णपणे कळलेला असतो. याचा अर्थ साधनेने मन आणि बुद्धी शुद्ध होऊन सात्त्विक झाली की, भगवंतच विविध माध्यमांतून आध्यात्मिक ज्ञान देतो.

भगवान श्रीकृष्णाने श्रीमद्भगवद्गीतेत सांगितले आहे,

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक १०

अर्थ : जे प्रेमाने मला सतत भजतात आणि माझी आराधना करतात, त्यांना मी तो बुद्धीयोग देतो की, ज्यायोगे ते मला येऊन पोचतील.

स्पष्टीकरण : माझ्या भक्तांना मीच बुद्धीयोग, म्हणजे ज्ञानयोग देतो.

४ ए. रामनाथी आश्रमातील ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकांमधील लक्षणे : ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या आश्रमातील उन्नत साधकांमध्ये पुढील लक्षणे आढळून येतात.

१. ‘त्यांच्या वस्तूंना दैवी सुगंध येतो’, हे अध्यात्मातील प्रगतीचे पहिले लक्षण आहे.

२. मुख आकर्षक आणि तेजस्वी दिसते.

३. आनंदी दिसतात.

४. स्वरात गोडवा असतो आणि त्यांचे सहज बोलणेही आपल्या अंतर्मनापर्यंत जाऊन भिडते.

५. साधनेची तळमळ, सर्वांना साहाय्य करण्याची वृत्ती आणि आपल्यासह इतरांची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रयत्न करणे, नम्रता इत्यादी अनेक दैवी गुण प्रकर्षाने दिसून येतात. (वर्ष  २०१०)

(क्रमशः उद्याच्या अंकात)


परात्पर गुरु डॉक्टरांनी रामनाथी आश्रमातील कार्याद्वारे ईश्वरी राज्याची छोटी प्रतिकृती असलेला आदर्श आश्रम दाखवून देणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भगवंताने सृष्टी निर्माण करून ती सुसूत्रपणे चालवण्याचे नियम घालून दिले. त्याचप्रमाणे प.पू. डॉक्टरांनी विविध ठिकाणी आश्रमांची निर्मिती केली आहे. रामनाथी आश्रमातील कार्य पाहिल्यावर ‘प्रत्येक आश्रम आदर्श कसा असावा ?’, याचे प.पू. डॉक्टरांनी सर्वांसमोर उदाहरण ठेवल्याचे लक्षात येते. ‘प्रत्येक आश्रम, म्हणजे ईश्वरी राज्याची छोटी प्रतिकृतीच आहे’, असे वाटते.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या सर्वांगाला आणि त्यांचा स्पर्श झालेल्या सर्व वस्तूंना दैवी सुगंध येणे

मे २००९ मध्ये मी (सद्गुरु डॉ. वसंत आठवले) रामनाथी आश्रमात असतांना प.पू. डॉक्टरांच्या केवळ अंगाला आणि मल-मूत्रालाच नव्हे, तर आश्रमातील त्यांनी वापरलेल्या वस्तूंना आणि ते रहात असलेल्या खोलीतील सर्व वस्तूंनाही दैवी सुगंध येतो.

(‘२८.७.२०२२ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या काही घंटे ठेवलेल्या मूत्राला कोणत्याही प्रकारचा गंध येत नव्हता. सर्वसाधारण व्यक्तीचे मूत्र साठवल्यास त्याला लगेच दुर्गंध येतो.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या सेवेतील एक साधक)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक