सद्गुरु डॉ. वसंत आठवले (ती. अप्पाकाका, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मोठे बंधू) यांची पू. शिवाजी वटकर यांनी घेतलेली मुलाखत येथे प्रसिद्ध करत आहोत. १ नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘ती. अप्पाकाकांच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ’ हा भाग पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
(ही मुलाखत सद्गुरु डॉ. वसंत आठवले आणि पू. शिवाजी वटकर संत होण्यापूर्वीची असल्याने या लेखमालेतील संतांच्या नावामध्ये पालट केलेला नाही. – संपादक)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/624372.html
३. ती. अप्पाकाकांच्या आध्यात्मिक प्रवासात त्यांच्या आई-वडिलांचा मोलाचा वाटा असणे
श्री. शिवाजी वटकर : आपल्या आध्यात्मिक प्रवासात आपल्या आई-वडिलांचा किती वाटा आहे ?
ती. अप्पाकाका : आमचे वडील (प.पू. बाळाजी आठवले (प.पू. दादा) शिक्षक होते. प्रापंचिक व्यय चालवण्यासाठी ते सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत शाळेत जायचे आणि सकाळी ७ ते १० आणि संध्याकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत शिकवण्या करायचे.
३ अ. फुप्फुसज्वराने अत्यवस्थ झालेल्या मुलासाठी वडिलांनी आयुष्यभर प्रतिदिन १० माळा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करण्याचा संकल्प करणे आणि तो ठीक झाल्यावरही त्यांनी तो जप त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत करणे : आमच्या घरी प्रतिवर्षी श्री गणेशचतुर्थीला गणपति यायचे. वर्ष १९३८ मध्ये माझा धाकटा भाऊ अनंत (आताचे पू. अनंत आठवले) हा ३ – ३.५ वर्षांचा असतांना फुप्फुसज्वराने (न्युमोनियाने) अत्यवस्थ झाला होता. त्या वेळी प्रतिजैविके (antibiotics) नव्हती. त्या वेळचे बालरोगतज्ञ डॉ. कोएल्हो यांनी ‘तो जगण्याची शक्यता ५० टक्के आहे’, असे सांगितले होते. त्या वेळी ती. दादा जवळच असलेल्या शंकराच्या देवळात जाऊन एक घंटा प्रार्थना आणि नामजप करत बसले. तेव्हा त्यांनी ‘मी आयुष्यभर प्रतिदिन १० माळा ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करीन’, असा संकल्प केला. श्री शंकराच्या कृपेने भाऊ १० दिवसांत चांगला झाला. दादांनी तो नामजप त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत केला.
३ आ. ‘म्हातारपणी शरीर आणि मन दुर्बल झाल्यामुळे अनेक दुःखे असतांनाही कोणतीही कुरकुर न करता नामामुळे आत्मानंदात रममाण होता येते’, हे ती. दादांच्या उदाहरणावरून शिकायला मिळणे : ती. दादा सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची नामजपाची संख्या वाढतच गेली आणि त्यांच्या वयाच्या ९१ व्या वर्षी, म्हणजे त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा नामजप सतत चालूच असायचा. मला नामजपाचे महत्त्व आतापर्यंत समजले नव्हते. दादांच्या हिरड्या सतत शिवशिवत असायच्या, त्यांची पाठही सतत दुखायची आणि त्यांना हृदयविकाराचे ४ – ५ झटके येऊन गेले, तरी त्यांचा चेहरा नेहमी शांत अन् आनंदी दिसायचा. ते गादीवर पहुडले की, नामजप करतांना हातातील जपमाळेचे मणी ओढणे सतत चालूच असायचे. ‘म्हातारपणी शरीर आणि मन दुर्बल झाल्यामुळे अनेक दुःखे असतांनाही कोणतीही कुरकुर न करता नामामुळे आत्मानंदात रममाण होता येते’, हे मला ती. दादांच्या उदाहरणावरून लक्षात आले. दादा शेवटच्या क्षणापर्यंत शुद्धीत होते.
३ इ. दादांची आध्यात्मिक प्रगती झाली असल्यामुळे प.पू. भक्तराज महाराज त्यांना स्वतःच्या शेजारी बसायला सांगायचे.
३ ई. ताईने (आईने) त्रास देण्यासाठी भुतांना काश्मीरमध्ये जायला सांगणे : जयंताला (परात्पर गुरु डॉक्टरांना) भुतांचे अस्तित्व जाणवायचे. त्या वेळी ताई (आई, पू. (कै.) श्रीमती नलिनी आठवले) त्याला म्हणायची, ‘‘भुतांना सांग, ‘इथे काय करता ? काश्मीरमध्ये त्रास द्यायला जा.’’
३ उ. हृदयविकारामुळे होणार्या वेदनांकडे साक्षीभावाने बघणे : हृदयविकारामुळे रात्री अतिशय अस्वस्थपणा वाढल्यावर ताई उभी रहायची, मग बसायची, परत उभी रहायची. दुसर्या दिवशी मी तिला भेटलो की ती मला सांगायची, ‘‘काल देहाचा थयथयाट चालू होता.’’ यामुळे ताई तिच्या देहाकडे साक्षीभावाने बघत असल्याचे माझ्या लक्षात आले.
३ ऊ. शेवटच्या श्वासापर्यंत नामजप करणे : ताईच्या शेवटच्या क्षणी माझा सर्वांत धाकटा भाऊ विलासने तिला विचारले, ‘‘तुझा नामजप चालू आहे ना ?’’ तिने ‘‘हो’’ म्हटले आणि शेवटचा श्वास घेतला.
३ ए. मातृ-पितृऋणाची परतफेड करणे अशक्य आहे !
४. देवद आणि रामनाथी आश्रम येथे वास्तव्य असतांना आलेले अनुभव
श्री. शिवाजी वटकर : आपण वर्ष २००४ मध्ये १५ दिवस पनवेल (जिल्हा रायगड) येथील देवद आश्रमात आणि वर्ष २००८ अन् २००९ या वर्षी ३ वेळा गोव्यातील रामनाथी आश्रमात अंदाजे ६ मास रहायला होता. त्या वेळचे तुमचे अनुभव सांगा.
ती. अप्पाकाका :
४ अ. देवद आश्रमात आलेल्या एका विद्वानांनी ‘भावजागृती’ या विषयावर प्रवचन करूनही उपस्थितांपैकी खरी भावजागृती कुणाचीच न होणे आणि त्यानंतर सनातनच्या साधिकेने ‘भाव’ या विषयावर अर्धा घंटा भावपूर्ण बोलल्यानंतर ५० टक्के साधकांची भावजागृती होणे : वर्ष २००४ मध्ये मी पनवेल येथील देवद आश्रमात वास्तव्यास असतांना एका विद्वानांचे ‘भावजागृती’ या विषयावर प्रवचन ठेवले होते. त्या प्रवचनाला जवळजवळ ८० साधक उपस्थित होते. प्रवचनानंतर तिथे उपस्थित असलेल्या साधकांपैकी केवळ ४ – ५ जणांना ‘भाव म्हणजे काय ?’, हे बुद्धीने कळले; पण खरी भावजागृती कुणाचीच झाली नव्हती. त्यानंतर सनातनच्या एका साधिकेला ‘भाव’ या विषयावर बोलण्यास सांगितले. तिच्या अर्धा घंटा भावपूर्ण बोलण्यानंतर ५० टक्के साधकांची भावजागृती झाली होती.
(वर्ष २०१०)
(क्रमशः उद्याच्या अंकात)