‘भक्तीसत्संगात निसर्गाचीही भावजागृती झाली’, हा मनातील विचार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापर्यंत पोचल्याने त्यांच्या त्रिकालज्ञानीपणाची एका बालसाधिकेला आलेली प्रचीती

‘भक्तीसत्संगात निसर्गाचीही भावजागृती झाली’, हा मनातील विचार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यापर्यंत पोचल्याने त्यांच्या त्रिकालज्ञानीपणाची कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे) हिला आलेली प्रचीती

कु. शर्वरी कानस्कर

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भक्तीसत्संग घेत असतांना पाऊस येणे 

१ अ. सत्संगात भक्तीगीत लावण्यापूर्वी पाऊस पडू लागणे आणि सत्संग संपल्यानंतर तो थांबणे : ‘एकदा भक्तीसत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ नारायणरूपी गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) वर्णन करत होत्या. नंतर सत्संगात भक्तीगीत लावण्यात आले. तेव्हा सर्व साधकांची भावजागृती झाली. भक्तीगीताला आरंभ होण्यापूर्वी पाऊस चालू झाला आणि भक्तीसत्संग संपल्यानंतर लगेच पाऊस थांबला.

१ आ. पाऊस पडत असतांना ‘हा पाऊस नसून जणू निसर्गदेवतेचे आनंद आणि भावस्थिती व्यक्त करणारे भावाश्रू आहेत’, असे साधिकेला वाटणे : ‘भक्तीसत्संग चालू असतांना वातावरण वेगळेच झाले आहे’, असे मला जाणवत होते. वातावरणातील हे परिवर्तन पाहून मला चांगले वाटत होते. निसर्गाकडे पाहिल्यावर मला असे वाटले, ‘सर्व साधकांच्या समवेत निसर्गदेवताही हा भक्तीसत्संग ऐकत आहे. तिलाही पुष्कळ आनंद झाला आहे. त्यामुळे ‘हा पाऊस नेहमीसारखा नसून आनंद आणि भावस्थिती व्यक्त करणारे साक्षात् निसर्गदेवतेचे हे भावाश्रू आहेत.’

२. परात्पर गुरु डॉक्टरांना भक्तीसत्संगातील सूत्र सांगण्यापूर्वीच त्यांनी ‘निसर्गाची भावजागृती झाली ना !’, असे म्हटल्यावर ‘ते त्रिकालज्ञानी आहेत’, याची प्रचीती येणे

त्यानंतर एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी घेतलेल्या भक्तीसत्संगातील निसर्गाविषयीचे सूत्र मी त्यांना सांगत होते. तेव्हा मी ते सूत्र सांगण्यापूर्वीच गुरुदेवांनी ‘‘निसर्गाची भावजागृती झाली ना !’’, असे म्हटले. यावरून ‘गुरुदेव ‘त्रिकालज्ञानी’ आहेत आणि ‘मला काय सांगायचे आहे’, ते त्यांनी आधीच जाणले होते’, असे माझ्या लक्षात आले.

‘हे गुरुदेवा, मी असमर्थ आहे. आपल्याच कृपेने मला हे सर्व अनुभवता आले’, याबद्दल आपल्या कोमल चरणी कृतज्ञता !’

गुरुदेवांची,

– कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.६.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक