सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून उपवडे येथील धोकादायक शाळेची पहाणी

  • शाळेत मुलांना न पाठवण्याच्या पालकांच्या निर्णयानंतर प्रशासनाला आली जाग !

  • ५ वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा पालकांचा आरोप

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांना निवेदन देतांना ग्रामस्थ आणि पालक
(चित्र सौजन्य : सकाळ)

कुडाळ – तालुक्यातील माणगाव खोर्‍यातील जिल्हा परिषद शाळा उपवडे क्रमांक १ या शाळेच्या इमारतीच्या दयनीय स्थितीकडे गेली ५ वर्षे येथील पालक आणि ग्रामस्थ प्रशासनाचे लक्ष वेधत होती; मात्र प्रशासनाकडून सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेले पालक आणि ग्रामस्थ यांनी, ‘शाळेची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही’, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या उपस्थितीत शाळेची पहाणी केली. (प्रशासनाला आंदोलनाची आणि बहिष्काराची भाषाच समजते, असे पुन्हा या घटनेतून लक्षात येते ! असे सुस्त प्रशासन काय कामाचे ? – संपादक) या वेळी नायर यांनी, ‘जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात शाळेच्या दुरुस्तीसाठी प्राधान्य दिले जाईल’, असे आश्वासन दिले.

जिल्हा परिषद शाळा उपवडे क्रमांक १ या शाळेचे ३ मासांपूर्वी छप्पर कोसळले होते. सुदैवाने त्या दिवशी शाळेत मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला होता. विशेष म्हणजे छप्पर कोसळल्यानंतर शिक्षण विभागाच्या एकाही अधिकार्‍याने शाळेला भेट देऊन वस्तूस्थितीची पहाणी केली नाही. संतप्त पालकांनी ११ नोव्हेंबरपासून शाळेत मुले न पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदन दिवाळीपूर्वीच तालुका आणि जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर प्रारंभी कुडाळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या पथकाने २२ ऑक्टोबर या दिवशी शाळेला भेट देऊन पहाणी केली अन् त्याचा अहवाल गटविकास अधिकार्‍यांना सादर केला. त्यानंतर गटविकास अधिकार्‍यांनी याविषयी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांना अवगत केले. त्यानंतर नायर यांनी २७ ऑक्टोबर या दिवशी शाळेला भेट देऊन पहाणी केली.