अमेरिकेत ६० हिंदू संघटनांच्या विरोधात प्रस्ताव संमत

  • डेमोक्रॅटिक पक्षाच्या टीनेक महापालिकेतील समितीकडून प्रस्ताव

  • आतंकवादाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप

  • संघटनांच्या अर्थपुरवठ्याचा स्रोत शोधणार !

  • हिंदू संघटनांकडून रस्त्यावर उतरून प्रस्तावाला विरोध

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेच्या न्यूजर्सीच्या टीनेक डेमोक्रॅटिक म्युनिसिपल कमिटीच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हिंदु संघटनांच्या विरोधात एक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे. यामध्ये विश्व हिंदु परिषद, सेवा इंटरनॅशनल, हिंदु स्वयंसेवक संघ आदी ६० संघटनांवर आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रस्तावाद्वारे या संघटनांना मिळणार्‍या अर्थपुरवठ्याची चौकशी करण्यास अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या दोघा खासदारांना सांगण्यात आले आहे. या प्रस्तावात ‘हिंदूंच्या संघटना भारत आणि अमेरिका येथील अल्पसंख्यांकांच्या विरोधात द्वेष पसरवण्याचे काम करत आहे’, असेही म्हटले आहे. ही समिती डेमोक्रॅटिक पक्षाशी संबंधित आहे. सध्या अमेरिकेत याच पक्षाचे सरकार आहे. हा प्रस्ताव संमत करण्यात आल्यानंतर त्यांच्याविरोधात अमेरिकेतील अनेक राज्यांत ६० हून अधिक हिंदु संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागल्या आहेत. विशेषतः कॅलिफोर्निया आणि न्यूजर्सी येथे डेमोक्रॅटिक पक्षाच्या सरकारांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत.

हिंदूंच्या संघटनांचा विरोध कशासाठी ?

गेल्या २ मासांत अमेरिकेतील हिंदूंच्या संघटनांकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले आहेत. यावर्षी १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अमेरिकेत अनेक ठिकाणी भारतीय हिंदूंनी फेर्‍या काढल्या होत्या. यात त्यांनी बुलडोझर दाखवले होते. उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलखोर आणि बलात्कारी मुसलमानांच्या विरोधात मोहीम उघडली आहे अन् त्यांची अवैध घरे बुलडोझरद्वारे पाडली जात आहेत. हिंदूंनी अमेरिकेत काढलेल्या फेर्‍यांमध्ये बुलडोझर दाखवून अमेरिकेतील मुसलमानांचा विरोध करण्यात येत असल्याचे सांगत अनेक संघटनांनी यावर टीका चालू केली.
दुसर्‍या घटनेत हिंदूंनी विश्व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी ऋतंभरा यांच्या कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले होते; मात्र त्याला विरोध होऊ लागल्याने हे कार्यक्रम रहित करण्यात आले.

आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही ! – हिंदूंचे मत

अमेरिकेतील हिंदूंच्या संघटनांनी या प्रस्तावावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, या प्रस्तावामध्ये हिंदूंच्या संघटनांच्या विषयी अत्यंत आक्षेपार्ह लिहिण्यात आले आहे. हा प्रस्ताव सादर करण्यापूर्वी आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीही दिली गेली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव एकतर्फी मांडून संमत करण्यात आला. हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. याद्वारे अमेरिकेत रहाणार्‍या हिंदूंची प्रतिमा बिघडवण्यात आली आहे. हे हिंदूंना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र आहे. कोणत्याही शांततावादी समाजावर अशा प्रकारचा वाईट आरोप लावण्यात आला, तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात.

डेमोक्रॅटिक पक्षाच्या राज्य शाखेचा प्रस्तावाला विरोध

न्यूजर्सीमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या राज्य शाखेने या प्रस्तावाला चुकीचे म्हटले आहे. या शाखेच्या प्रवक्त्याने म्हटले की, डेमोक्रॅटिक पक्षाचे मूलभूत लक्ष्य लोकांना एकत्र आणण्याचे आहे, त्यांच्यात फूट पाडण्याचे नाही. आम्ही हिंदूविरोधी प्रस्तावाच्या विरोधात आहोत. आम्ही कोणताही द्वेष आणि कट्टरता यांच्या विरोधात आहोत.

संपादकीय भूमिका

  • अमेरिकेतील मुसलमानांच्या दबावामुळे आणि भारतावर दबाव आणण्यासाठीच डेमोक्रॅटिक पक्षाकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्यात आला, हे स्पष्ट आहे. याचा भारत सरकारने विरोध केला पाहिजे !
  • जगभरातील जिहाद्यांना आणि आतंकवादी देश असलेल्या पाकिस्तानला सर्व प्रकारचे साहाय्य करणार्‍या अमेरिकेला हिंदूंच्या संघटनांनी आतंकवादाला प्रोत्साहन दिल्याचे म्हणण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ?