कोलकाता येथील दुर्गापूजा मंडपात म. गांधी यांना दाखवले राक्षसाच्या रूपात

कोलकाता (बंगाल) – येथील अखिल भारतीय हिंदु महासभेच्या दुर्गापूजा मंडपामध्ये राक्षस म्हणून मोहनदास गांधी यांच्यासारखा दिसणारा एक पुतळा ठेवण्यात आला असून श्री दुर्गादेवी त्याला ठार मारत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यावर राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, भाजप, माकप, काँग्रेससह सर्व पक्षांनी टीका केली. हा पुतळा धोतर नेसलेला हातात काठी असलेला हुबेहुब म. गांधी यांच्यासारखा बनवण्यात आला आहे. या पुतळ्याचे आणि म. गांधी यांच्यामधील साम्य योगायोग असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी स्वातंत्र्य चळवळीतील गांधी यांच्या भूमिकेवर टीका करणे आवश्यक असल्याचेही आयोजकांनी म्हटले आहे.

याविषयी स्पष्टीकरण देतांना अखिल भारतीय हिंदु महासभेच्या बंगालचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रचूर गोस्वामी म्हणाले की, टक्कल पडलेली आणि चष्मा घातलेली व्यक्ती म. गांधीच असण्याची आवश्यकता नाही. या देखाव्यातील राक्षसाजवळ ढाल आहे. गांधी यांच्याकडे ढाल कधीच नव्हती. आमच्या देखाव्यात श्री दुर्गादेवीने वध केलेला राक्षस गांधी यांच्यासारखा दिसणे, हा निवळ योगायोग आहे.

राजकीय पक्षांनी केलेली टीका

१. तृणमूल काँग्रेसचे प्रदेश महासचिव कुणाल घोष यांनी म्हटले की, हा भाजपचा खरा तोंडावळा आहे. म. गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत. जगाकडून गांधी आणि त्यांच्या विचारसरणीचा आदर केला जातो. गांधी यांचा अशाप्रकारे अपमान सहन केला जाऊ शकत नाही. याचा आम्ही जाहीर निषेध करतो.

२. माकपचे  केंद्रीय समितीचे सदस्य समिक लहिरी म्हणाले की, भाजप आणि रा.स्व. संघ यांना केवळ ‘भारताचे विभाजन कसे करायचे ?’ हेच कळते. ब्रिटीशविरोधी शक्तींना ते ‘असुर’ मानतात, तर श्री दुर्गामातेला ब्रिटीश.

३. काँग्रेसचे प्रवक्ते श्री. सौम्या रॉय यांनी म्हटले की, रवींद्रनाथ टागोर यांनी गांधी यांना ‘महात्मा’ असे संबोधले होते. अशा महान व्यक्तीचा अपमान केवळ भारतासाठीच नव्हे, तर जगासाठी ही लज्जास्पद आहे.

४. भाजपचे प्रवक्ते समीक भट्टाचार्य यांनी भाजपची बाजू स्पष्ट करतांना म्हटले की, अशा गोष्टींना आम्ही पाठिंबा देत नाही. हे संपूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. प्रशासनाने आयोजकांवर तात्काळ कारवाई करावी.