हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांच्या संघटित विरोधामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना पदावरून हटवले !

  • पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन-कीर्तनास बंदी केल्याचे प्रकरण

  • हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांचे यश !

  • मंदिरात परत एकदा दुमदुमला वारकर्‍यांच्या भजन-कीर्तनाचा आवाज !

पंढरपूर, २९ सप्टेंबर (वार्ता.) – येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी अचानक पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन-कीर्तन करण्यास बंदी केली होती. या निर्णयास हिंदु जनजागृती समिती, वारकरी पाईक संघ, राष्ट्रीय वारकरी परिषद यांनी तीव्र विरोध केला होता. हिंदु जनजागृती समितीने गुरव यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. यामुळे अंततः शासनाने अध्यादेश काढून ‘गजानन गुरव यांच्याकडील कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला असून हा कार्यभार आता सोलापूर येथील अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे’, असे पत्रकाद्वारे सूचित केले. यामुळे वारकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावण असून मंदिरात परत एकदा वारकर्‍यांच्या भजन-कीर्तनाचा आवाज दुमदुमत आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की,

१. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात १९ सप्टेंबर या दिवशी एका वारकरी संघटनेचा भजन-कीर्तन सप्ताह चालू असतांना अचानक त्यांना भजन-कीर्तन बंद करून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. यामुळे वारकरी संतप्त झाले.

२. यावर कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी ‘मंदिरात भजन-कीर्तनास बंदी नसून केवळ ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगितले होता’, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला; मात्र हिंदु जनजागृती समितीने याला विरोध करत ‘भजन-कीर्तनाचा त्रास होतो’, असे म्हणणार्‍या अधिकार्‍यांना मंदिर समितीतून हाकला’, अशी मागणी करत सोलापूर, सांगोला आणि अंबेजोगाई येथे निवेदने दिली. गुरव यांच्यावर तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याची चेतावणीही समितीने दिली होती.

३. या निर्णयास भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनीही विरोध दर्शवला होता.


शासनाने गजानन गुरव यांची हकालपट्टी केल्याबद्दल श्री विठुरायाच्या चरणी कृतज्ञता ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरातील भजन-कीर्तन बंदीचे प्रकरण !

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मनमानी कारभार करत भजन, कीर्तन आणि नामजप करण्यास बंदी घालणारे सरकारनियुक्त कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची महाराष्ट्र शासनाने उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करते. याचा हिंदु जनजागृती समिती आणि समस्त वारकरी संप्रदाय यांनी तीव्र निषेध केला होता. श्री विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन नाही करायचे तर कुठे करायचे ? असा प्रश्न करत ‘गजानन गुरव यांची मंदिर समितीतून हकालपट्टी करावी’, अशी मागणीही केली होती. ही मागणी मान्य करून शासनाने गुरव यांची या पदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे पुन्हा एकदा श्री विठ्ठल मंदिरात भजन-कीर्तन आणि विठुरायाचा गजर दुमदुमला आहे, याबद्दल आम्ही श्री विठुरायाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहोत, असे हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले,

१. मंदिरांच्या सरकारीकरणाचे आतापर्यंत अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. मंदिरांच्या देवनिधीमध्ये भ्रष्टाचार करणे, देवस्थानांच्या भूमी लाटणे, देवतांच्या दागिन्यांचा अपहार, मंदिराच्या प्रथा-परंपरा बदलणे अशा अनेक गोष्टी दिसून येतात.

२. सुव्यवस्थापनाच्या नावाखाली मंदिरांतील प्रथा-परंपरा सरकारी अधिकारी बदलणार असतील, तर अशा अधिकार्‍यांना यापुढेही आम्ही धडा शिकवू, तसेच सर्वार्थाने अयोग्य असलेले मंदिर सरकारीकरण रहित व्हावे. देवस्थान समितीमध्ये विठ्ठलाचे भक्त असलेले अधिकारी-कर्मचारी असावेत, यासाठी आमचा लढा अधिक तीव्र करू.

३. देशभरात एकाही मशिदीचे सरकारीकरण नाही, एकाही चर्चचे सरकारीकरण नाही; मग केवळ मंदिरांचे सरकारीकरण का ? हे धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या तत्त्वात बसते ? यासाठी मंदिरांचे सरकारीकरण रहित करायला हवे.