मनसेची चेतावणी !
नाशिक – शहरातील मशिदींवरील भोंगे येत्या ७ दिवसांत न उतरल्यास दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, अशी चेतावणी मनसेच्या वतीने पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. १४ सप्टेंबर या दिवशी मनसेच्या वतीने नाईकनवरे यांची भेट घेऊन हे निवेदन देण्यात आले.
४-५ मासांपूर्वी मनसेने भोंगेविरोधी आंदोलन चालू केल्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत मनसेने मशिदींवरील भोंगे हटवण्याची भूमिका घेत पोलिसांकडे सर्वाेच्च न्यायालयाचे निकाल आणि अन्य कायदेशीर कागदपत्रेही दिली होती. त्यानंतर राज्यात मनसेने आंदोलन चालू केले. त्यात बरेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची धरपकड करून जिल्हा बंदीही करण्यात आली होती. त्यानंतर मुसलमानांनी मशिदींवरील भोंग्यावरील अजान बंद केली होती; मात्र आता हिंदु धर्मियांच्या सणासुदीच्या कालावधीत भोंग्याच्या वाढलेल्या आवाजाचे सूत्र उपस्थित करत मनसेने वरील चेतावणी दिली आहे.
तक्रारीची पडताळणी करणार !पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे म्हणाले की, मनसे पदाधिकार्यांनी ७ ठिकाणी भोंग्यांचा आवाज वाढल्याची तक्रार केली आहे. त्याविषयी विशेष शाखेकडून अहवाल मागवला आहे. ७ दिवसांची समयमर्यादा वगैरे असा कोणताही दबाव घेणार नाही. तक्रारीची पडताळणी करणार आहे. |
नाशिक येथे राज्यातील सर्वांत मोठे आंदोलन !मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर म्हणाले की, सणासुदीच्या काळात कर्णकर्कश भोंगे वाजवले गेले, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. पोलिसांकडे त्याविरोधात तक्रार केली असून नोंद न घेतल्यास ७ दिवसानंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण केले जाईल. राज्यातील सर्वांत मोठे आंदोलन नाशिक येथे असेल. |