शहरांची बेसुमार वाढ आणि त्यासाठी होणारी झाडांची बेसुमार तोड, घरे-इमारती बांधतांना नैसर्गिक नाले-नद्या बंद करून त्यात भराव टाकणे, विविध कारणांमुळे भुयारी गटारे बंद असणे, काचांच्या चकाचक इमारती, मानवनिर्मित अनेकविध कारणांमुळे कधी विचारही करू शकत नाही अशी तपामानात वाढ जगभरात होणे आदी कारणांमुळे मोठे पर्यावरणीय पालट पहायला मिळत आहेत. ज्या बेंगळुरू शहराचा देशातील ‘सिलिकॉन सिटी’ म्हणून नेहमीच गौरव केला जातो, ते शहर २ दिवसांपूर्वी झालेल्या पावसात अक्षरश: बुडाले. जवळपास प्रत्येक घर, दुकान, इमारत हे पाण्याखाली गेले होते. ‘विप्रो’, ‘इन्फोसिस’ यांसारख्या अग्रगण्य आस्थापनांना याचा प्रंचड फटका बसला. गेल्या ९० वर्षांत पडला नाही, इतका पाऊस तिथे पडला आणि होत्याचे नव्हते झाले. याअगोदर मुंबई, चेन्नई, पाटणा, गुडगाव या शहरांची जी शोकांतिका होती, तीच आता बेंगळुरूची होत आहे.
आधुनिकीकरणाचा हव्यास !
मुंबई आणि चेन्नई यांसारख्या किनारपट्टीवरील शहरांना वादळामुळे पुराचा धोका आहे. अतीवृष्टीच्या वेळी शहरातील सर्व पाणी समुद्रात जाते आणि समुद्रातून पाणी परत भुयारी गटारांतून शहरात येते. असे होऊ लागले की, शहरात पाणी साठून मोठी अडचण येते. कोणत्याही शहराची भुयारी गटार क्षमता इतकी सक्षम नसते की, पावसाचे पाणी आणि समुद्राचे पाणी एकत्र आल्यास ते सामावून घेता येईल आणि त्याची गतीने विल्हेवाट लावली जाईल. त्यामुळे अशा प्रकारच्या शहरात बांधकाम करतांना भूमीचा पोत, भुयारी गटाराची क्षमता, तेथील पाऊस आदी गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते; मात्र तसे कधीच होत नाही. शहरांमधील बांधकामे करतांना बहुतांश नियम पायदळी तुडवले जातात. मुंबईसारख्या ठिकाणी तर समुद्रात भर टाकून बांधकामे केलेली आहेत. कोणत्याही प्रकारची आपत्ती ही अचानक येत नसून मनुष्य गतचुकांमधून काहीही शिकत नसून उलट आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण यांच्या हव्यासापोटी तो निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातून बेंगळुरूत घडल्या तशा घटना घडत आहेत.
बेंगळुरूत केवळ ३ टक्के भूमीवर वृक्ष !
बेंगळुरू शहराचा विचार केल्यास नुकत्याच झालेल्या पावसामुळे आलेल्या पुराने या शहराचा विकास आराखडा पूर्णत: अयशस्वी झाल्याचे समोर येत आहे. हे शहर एका उंच कड्यावर वसलेले असून आजूबाजूला दर्या आहेत. दोन नद्यांचे पाणलोट आहेत. ‘मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यास याचा शहरावर काय परिणाम होईल ?’, याचा कोणताच विचार विकास आराखड्यात झालेला नाही. शहरातील भुयारी गटार योजना कुचकामी असून अनेक ठिकाणी नियमबाह्य बांधकामेही झालेली आहेत. येथे वर्ष १९७३ मध्ये ६८ टक्के भूमीवर वृक्ष आणि झाडे होती, तर वर्ष २०२० मध्ये हे प्रमाण केवळ ३ टक्क्यांवर आले आहे. यावरून ‘शहरीकरणाचा विस्तार होतांना किती प्रचंड प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली ?’, याचा विचार आपण करू शकतो. शहरात सर्वत्र सिमेंटचे जंगल झाले असून वर्ष २०२० मध्ये ९४ टक्के भागावर पक्की घरे उभारण्यात आली आहेत. शहरात पूर्वी २०४ नाले-ओढे होते. यांतील १८० हून अधिक नाले-ओढे यांवर अतिक्रमण झाले आहे. ‘इतके प्रचंड बांधकाम होत असतांना नियमांची कशा प्रकारे पायमल्ली झाली असेल ?’, याचा आपण विचारच करू शकत नाही ! प्राथमिक अंदाजानुसार शहरातील ७५ टक्के भाग हा पाण्याखाली गेला आणि लोकांना ट्रॅक्टर, बुलडोझर यांचा वापर करून सुरक्षितस्थळी जावे लागले.
शहरात अनियंत्रित संख्येने असणारी आणि येणारी वाहने, इमारतींच्या झगमगाटासाठी काचेचा आणि दिव्यांचा अतीवापर, टिकाऊ म्हणून प्लास्टिकचा अमर्याद वापर यांसह अन्य गोष्टीही शहरातील वातावरण बिघडण्यास कारणीभूत आहेत. शहराच्या या गंभीर स्थितीविषयी ‘आउटर रिंग रोड कंपनीज् असोसिएशन’ यांनी वर्ष २०१७ मध्येच सरकारला पत्र लिहून नाल्यांची स्थिती, पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था यांसह अनेक गोष्टींकडे लक्ष वेधले होते; मात्र त्यावर पुढे काहीच झाले नाही. शहरीकरण करतांना नियमांना बगल दिली गेल्याचे प्रशासनालाही ठाऊक आहे; मात्र भ्रष्ट व्यवस्थेमुळे प्रशासन याविषयी आवाज उठवत नाही; कारण यातील बहुतांश अधिकारी-कर्मचारी यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत.
हिंदु राष्ट्र हेच सर्व समस्यांचे उत्तर !
जसजशी वैज्ञानिक प्रगती होत गेली, तसतसा समाज आणि राजा दोघेही धर्मपालनापासून दूर गेले. यामुळे मानवावर संकटे येण्याचे प्रमाण वाढले. धर्मशास्त्रानुसार वातावरणात वाढणारे रज-तम हे नैसर्गिक संकटांना कारणीभूत असते. वाढती वैज्ञानिक प्रगती ही संपूर्ण मनुष्य जातीच्या मुळावरच उठली आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्यानुसार, ‘सहस्रो वर्षे प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने केवळ १०० वर्षांत प्रदूषणग्रस्त करून प्राणीमात्रांचा विनाश जवळ आणला आहे.’ विज्ञानाच्या प्रगतीचे गुणगान गाणार्या विज्ञानवाद्यांनी याचे उत्तर देणे आवश्यक आहे. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान यांत वेगाने प्रगती होत असतांनाही मनुष्य नैसर्गिक आपत्ती का रोखू शकत नाही ?’, याचे उत्तर विज्ञानाकडे आहे का ?
महाराष्ट्रातील कोल्हापूरसारख्या शहरात केवळ ४ दिवसांच्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे पूर, दुष्काळ यांसह अनेक समस्यांची उत्तरे विज्ञानाकडे नसून धर्म आणि अध्यात्म यांत मात्र प्रत्येक समस्येचे उत्तर आहे. हिंदु धर्मातील बहुतांश कृती या निसर्गानुकुल आहेत; म्हणजेच मानव आणि निसर्ग हातात हात घालून जातील, अशाच आहेत. त्यामुळे जागतिक तापमानवाढीसह असलेल्या अन्य समस्यांच्या निराकरणासाठी हिंदु राष्ट्र केवळ भारतापुरते येऊन चालणार नाही, तर मानवजातीच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी ते अखिल विश्वातच येणे अत्यावश्यक आहे !
पूर, अतीवृष्टी यांसह अनेक समस्यांची उत्तरे विज्ञानाकडे नसून धर्म आणि अध्यात्म यांतच प्रत्येक समस्येचे उत्तर आहे ! |