मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघणार ! – न्यायालयाचा निकाल

पुणे – मानाच्या गणपति विसर्जन मिरवणुकीपूर्वी अन्य मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास अनुमती द्यावी, या मागणीसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे लक्ष्मी रस्ता येथून मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघेल, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून प्रथम मानाची ५ गणपति मंडळे जातील आणि त्यानंतर इतर मंडळांनी जावे असा रूढी, परंपरा आणि प्रथेचा भाग म्हणजे काही कायदा नाही. त्यामुळे इतर लहान गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रस्त्यावरून जाण्यास असणारी बंधने बेकायदेशीर आणि संविधानातील कलम १९ अन्वये असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे, असा दावा करून ‘बधाई ट्रस्ट’चे अध्यक्ष शैलेश बधाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ही याचिका निकाली काढत लक्ष्मी रस्त्यावरून चालू होणार्‍या मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीच्या विरोधात आदेश (निकाल) देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे, तसेच विसर्जन जवळ आले असतांना अशा पद्धतीची स्वैर याचिका दाखल करणे, हे चुकीचे असल्याचे राज्य सरकारने न्यायालयात म्हटले आहे.

मानाच्या ५ गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीसाठी २४ ते २८ घंटे लागतात. हे आताच गृहीत धरता येणार नाही, तसेच पोलीस त्यांचे काम नीट करतील, असा निष्कर्ष काढत मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली.