नागपूर शहर तलावात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध घातल्याने मूर्ती विसर्जनाविषयी गणेशोत्सव मंडळांसमोर पेच !

शहराबाहेरील तलावांत मूर्तींचे विसर्जन करण्यास सांगितल्यामुळे गणेशोत्सव मंडळांत अप्रसन्नता !

प्रतिकात्मक छायाचित्र

नागपूर – ९ सप्टेंबरला अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल. तथापि येथील महानगरपालिकेने शहरातील सर्वच तलावांमध्ये श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे या वर्षी मूर्तींचे विसर्जन करायचे कुठे ? असा मोठा प्रश्न गणेशोत्सव मंडळांसमोर निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाने शहराबाहेरील कोराडी येथील तलावाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे; मात्र कोराडीसह इतर तलाव आणि नदी यांचे अंतर अधिक असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये अप्रसन्नतेचा सूर उमटू लागला आहे. कोराडी तलाव शहरापासून १८ किलोमीटर दूर आहे. याशिवाय वाटेत खड्डे असल्याने भाविकांसमोर अडचण आहे.

महानगरपालिकेने दिलेल्या आदेशानुसार ज्या घरगुती श्री गणेशमूर्तींची उंची ही अधिकाधिक २ फूट आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीची उंची ४ फुटांपेक्षा अधिक नसावी. या निकषात न बसणार्‍या श्री गणेशमूर्तीचे दायित्व भाविकांनी स्वतः घ्यावे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले होते; मात्र या नियमाला बहुदा सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने आता विसर्जनाचा पेच निर्माण झाला आहे.

शहरातील कोणत्याही तलावात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनावर पूर्णपणे बंदी असल्याने मूर्तींचे विसर्जन कुठे करायचे ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तरी काही पर्यायही उपलब्ध झाले आहेत. त्यानुसार शहराबाहेरील कोराडी तलाव, कोलार नदी, कन्हान नदी, बिना नदी आणि मौदा नदी येथे विसर्जन करता येणार आहे; मात्र सर्व पर्याय हे शहरापासून १५ ते २५ किलोमीटर अंतर दूर आहेत. नागपूर शहरात एकूण ६४० गणेशोत्सव मंडळांमध्ये श्री गणेशमूर्तींची स्थापना झाली आहे, त्यापैकी अनुमाने ४४० गणेशोत्सव मंडळांनी नागपूर महानगरपालिकेची अनुमती घेतली आहे.