चीनने तैवानवर नियंत्रण मिळवल्यास त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश !

संरक्षणतज्ञ ब्रह्मा चेलानी यांची चेतावणी !

संरक्षण आणि परराष्ट्रतज्ञ ब्रह्मा चेलानी

नवी देहली – चीनच्या सैन्याने तैवानवर नियंत्रण मिळवले, तर त्याचे पुढील लक्ष्य अरुणाचल प्रदेश असेल, असे विधान संरक्षण आणि परराष्ट्रतज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी केले आहे.

१. चेलानी यांनी जपानचे दैनिक ‘निक्केई’मध्ये लिहिलेल्या लेखामध्ये म्हटले आहे की, जर तैवानवर चीनने नियंत्रण मिळवले, तर चीनचे पुढील लक्ष्य भारतातील अरुणाचल प्रदेश हे राज्य असू शकते. अरुणाचल प्रदेश तैवानपेक्षा तिप्पट आहे. चीनने यापूर्वीच त्याच्या मानचित्रावर (नकाशावर) अरुणाचल प्रदेशला दाखवून ‘तो चीनचा भाग आहे’, असे  म्हटले आहे. त्यामुळे भारताने तैवानच्या रक्षणासाठी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.

२. चेलानी यांनी पुढे म्हटले की, गेल्या २८ मासांमध्ये चीनचा लडाखच्या भूमीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. यानंतरही भारत चीनसमवेत शांघाय शिखर बैठकीमध्ये चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा घडवरून आणण्याची सिद्धता करत आहे.

३. अमेरिकेतील प्रसिद्ध नियतकालिक ‘फॉरेन पॉलिसी’मध्ये प्रकाशित एका लेखामध्ये म्हटले आहे की, हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्थिती पालटली आहे. भारताने तैवानच्या संदर्भात त्याचे राजकीय संबंध अधिक भक्कम करण्याची वेळ आता आली आहे.