अमेरिकेत ४ मुसलमानांच्या हत्येच्या प्रकरणी अफगाणी मुसलमानाला अटक

डावीकडे अफगाणी नागरिक महंमद सईद

न्यू मेक्सिको (अमेरिका) – येथील अल्बकरीक शहरात गेल्या काही दिवसांत ४ मुसलमानांच्या हत्या झाल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी अफगाणी नागरिक महंमद सईद याला अटक केली आहे. या हत्या इस्लामच्या द्वेषातून करण्यात आल्याचे सांगितले जात होते. याविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही या हत्यांना ‘मुसलमानांवरील आक्रमण’ असे म्हटले होते; मात्र प्रत्यक्षात एका मुसलमानाकडूनच या हत्या करण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. या हत्यांमुळे येथील मुसलमान घाबरले होते, काही जणांनी तेथून पलायन केले होते, तर अनेक जण घरातून बाहेर पडत नव्हते.

या ४ पैकी पहिल्याची हत्या नोव्हेंबर २०२१ मध्ये झाली होती, तर अन्य तिघांच्या हत्या गेल्या १५ दिवसांत झाल्या होत्या. मृत झालेले सर्व अफगाण आणि पाक वंशाचे होते. या हत्येचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ‘या हत्यांमागे मुसलमानांतील अंतर्गत धार्मिक वाद होण्याची शक्यता आहे’, असे पोलिसांचा संशय आहे.