सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (वय ८६ वर्षे) यांना साधिकेने विचारलेला प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर

अनंत आठवले

प्रश्न : मोक्षप्राप्ती किंवा ईश्वरप्राप्तीसाठी सर्व कामना, इच्छा मिटायला हव्यात, असे तुमच्या लेखांमध्ये असते पण मोक्षप्राप्तीची किंवा ईश्वरप्राप्तीची इच्छा ही सुद्धा एक इच्छाच आहे ना ?

उत्तर : ‘चांगला प्रश्न विचारलात. इतक्या लहान वयात सखोल विचार करता, हे पाहून आनंद झाला. मूळ स्वरूपात आपला आत्मा ईश्वराचा अंश आहे. भगवद्गीतेत भगवान् श्रीकृष्ण सांगतात

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २०

अर्थ : ‘अर्जुना, सर्व प्राण्यांमध्ये असलेला आत्मा मी आहे.’ म्हणजे आपण ईश्वराशी जुडलेलेच तर आहोत. मग प्राप्त काय करायचे आहे ? उलट जे प्राप्त केले, ते सोडायचे आहे ! देहाशी जुडून स्वतःचे वेगळे अस्तित्व मानणे (अहंकार), त्रिगुणांच्या प्रभावाखाली येऊन काम, क्रोधादींना अंगीकारून इंद्रियांनी मिळणार्‍या बाह्य सुखांमध्ये गुंतणे (चित्ताची अशुद्धी) ही आपल्याला चिकटलेली आणि आपणच स्वतः वर ओढून घेतलेली घाण आपण काढून टाकली तर काय उरेल ? ईश्वराचा अंश असलेल्या आपल्या आत्म्याचे भान ! निष्काम अवस्थेत आपल्या अशा आत्मस्वरूपाचे ज्ञान होते आणि प्राप्त होते स्वरूपस्थिती म्हणजे (सगुण-) ईश्वराशी अभिन्नता ही ईश्वरप्राप्ती किंवा (गुणातीत-) ब्रह्माशी अभिन्नता हा मोक्ष ! ईश्वर किंवा ब्रह्म वेगळे आहे आणि ते प्राप्त करायचे आहे, असे नसते. मोक्ष म्हणजे एकाद्या वेगळ्या ठिकाणी जायचे आहे, असे नसते. हे सर्व नित्य प्राप्त आहे. जे नित्य प्राप्त आहे त्याला प्राप्त करायची इच्छा कसली करता ! आपण मोक्षापासून, ईश्वरापासून का दुरावलो आहोत ह्याची जाणीव नसल्याने आधी ‘ईश्वरप्राप्तीची इच्छा’ वाटते. व्यवहारात तिला ‘ईश्वरप्राप्तीची इच्छा’ म्हटले तरी ती ईश्वरप्राप्तीत बाधक नाही.’

संकलक : कु. गायत्री बागल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.५.२०२२)

लेखक पू. अनंत आठवले हे संत असल्याने त्यांच्या लिखाणात चैतन्य आहे. ते चैतन्य न्यून होऊ नये; म्हणून त्यांच्या लिखाणाची पद्धत, भाषा आणि व्याकरण यांत पालट केलेले नाहीत. – संकलक