भारताचे महान राष्ट्रभक्त अंतराळ वैज्ञानिक नंबीनारायणन् यांच्या जीवनावर आधारित ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट १ जुलै या दिवशी भारतात प्रदर्शित झाला. तमिळ, मल्याळम्, तेलुगु इत्यादी विविध दाक्षिणात्य भाषांसह हिंदी आणि इंग्रजी या भाषांतही हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भारतात अनेकांना ‘नंबी नारायण कोण ?’ हेसुद्धा बहुधा ठाऊक नसावे. त्यांच्यावरील विविध खोट्यानाट्या आरोपांमुळे त्यांचे भारतीय अंतराळ संशोधनाला यशाच्या शिखराकडे नेणारे कर्तृत्व झाकोळले गेले असले, तरी त्यांना कमी लेखण्याचे सत्र मात्र थांबत नाही. त्यांच्यावरील या चित्रपटाची भित्तीपत्रके काही चित्रपटगृहांनी न लावणे किंवा दिसणार नाहीत, अशी लावणे, तसेच चित्रपटाच्या वितरकांनी चित्रपटगृहांना भित्तीपत्रके न पुरवणे इत्यादी प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. डाव्या विचारसरणीच्या चित्रपट समीक्षकांनी तर ‘चित्रपटात नंबी नारायणन् यांना हिंदुत्वनिष्ठ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे’, ‘अती हिंदु’ धार्मिक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे’, असे आरोप केले आहेत. डाव्या अथवा साम्यवादी विचारसरणीच्या लोकांना केवळ हिंदुत्व आले की, त्या व्यक्तीचे सर्व कर्तृत्व लाथाडण्याची सवय आहे. डाव्यांच्या समीक्षा काहीही असल्या, तरी लोकांना एका प्रखर देशप्रेमी; मात्र खोट्या आरोपांमुळे अनेक वर्षे ‘देशद्रोही’ असा ठपका लागलेल्या प्रज्ञावान वैज्ञानिकाचा जीवनपट जवळून पहायला मिळणार आहे.
नंबी नारायणन् अंतराळ संशोधनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ‘नासा’ येथे कार्यरत असतांना भारतीय अंतराळ क्षेत्रात स्वत:चे योगदान देण्यासाठी मायदेशी परतले. तेव्हा भारतात रॉकेटचे प्रक्षेपण करण्यासाठी लागणारे ‘क्रायोजेनिक’ (अतीशीत तापमानात कार्य करू शकणारे) इंजिन बनवण्याचे आव्हान देशासमोर होते. हे इंजिन बनवण्याचे तंत्रज्ञान केवळ अमेरिका, रशिया या काही मोजक्या देशांकडेच होते. अन्य देशांनी हे तंत्रज्ञान भारताला देण्यास नकार दिला. अमेरिकेने तर इंजिनाच्या मूळ किमतीपेक्षा दुप्पट रकमेची मागणी केली. ‘भारताने इंजिनसाठी स्वयंपूर्ण न होता इतरांवर अवलंबून रहावे’, असेच अमेरिकेला वाटत होते. तेव्हा भारताची प्रतिभा जागृत झाली, ती नंबी नारायणन् यांच्या रूपाने ! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये (‘इस्रो’मध्ये) कार्यरत असतांना त्यांनी त्यांच्या चमूसह अथक प्रयत्न आणि संशोधन करून क्रायोजेनिक इंजिन बनवण्याच्या अन् त्यामध्ये द्रवरूप इंधन बनवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरीच मजल मारली. भारताच्या अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमामध्ये अनेक पालट केले. नंबी नारायणन् यांच्यामुळे भारताची अंतराळ क्षेत्रात मोठी घोडदौड चालू होणार, याची कुणकुण अंतराळ क्षेत्रातील ‘दादा’ देशांना लागली. मोठे देश अन्य लहान अथवा विकसनशील देशांनी त्यांच्या पुढे जाऊ नये, यासाठी प्रयत्नरत असतातच. त्यासाठी त्यांचे कुरापती काढण्याचे, ज्या क्षेत्रातून संबंधित देश पुढे जाईल, ते क्षेत्रच नेस्तनाबूत करण्याचे, तसेच संबंधित तज्ञाला संपवण्याचेही प्रयत्न केले जातात. त्यांचा तो प्रयत्न यशस्वी झाला, असेच नंबी नारायणन् यांच्या आयुष्यात झालेल्या दुर्दैवी घटनांवरून लक्षात येते.
नंबी यांच्यावरील आघात
वर्ष १९९४ मध्ये भारतीय अंतराळ क्षेत्र गरुडभरारी घेत असतांनाच पाश्चात्त्य देशांच्या वक्रदृष्टीचा फटका नंबी नारायणन् यांना बसला ! नंबी यांच्यावर इस्रोमधील अंतराळ कार्यक्रमाची गुप्त माहिती फोडून अन्य देशांना विकण्याचा आरोप ठेवण्यात आला. ‘ते अंतराळ संस्थेत हेरगिरी करत आहेत’, असा आरोप ठेवण्यात आला. परिणामी नंबी यांना विविध अन्वेषण यंत्रणांच्या चौकशांना सामोरे जावे लागले. कारागृहात पोलिसांचा मार खाणे, अनेक दिवस उपाशी उभे रहाणे, मानसिक छळ इत्यादी त्यांच्या वाट्याला आले. त्यांना ५० दिवस कारावास पत्करावा लागला. उमद्या कारकीर्दीतील अनेक वर्षे त्यांना देशद्रोहाचा ठपका ठेवून काढावी लागली. वर्ष २०१८ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने त्यांना दोषमुक्त घोषित करून ५० लाख रुपये हानीभरपाई देण्याचे आदेश केरळ सरकारला दिले. नंबी नारायणन् यांना अटक करणारे केरळमधील तत्कालीन काँग्रेसचेच सरकार होते. तसेच काँग्रेस सरकारच्या ताटाखालचे मांजर बनलेल्या पोलीस अधिकार्यांनी संगनमताने नंबी यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवले. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे हे प्रकरण आल्यावर त्यांनी नंबी यांना अंतिमतः दोषमुक्त घोषित केले. त्यानंतर आत्मसन्मान मिळवण्यासाठी नंबी यांना २० वर्षांची प्रदीर्घ न्यायालयीन लढाई स्वत:लाच लढावी लागली होती. या काळात देशासाठी मोठे योगदान देण्याचे त्यांचे स्वप्न धुळीला मिळाले. क्रायोजेनिक इंजिनमध्ये द्रवरूप इंधन वापरण्याचा त्यांचा प्रयोग तेव्हाच पूर्ण झाला असता, तर आताची परिस्थिती वेगळी असती. आता सर्वच रॉकेट उड्डाणांमध्ये द्रवरूप इंधनच वापरले जाते. भारतात आणि सर्वच अंतराळ मोहिमांमध्ये तेव्हा घनरूप इंधन वापरले जात होते. भारताला हे यश पुष्कळ पूर्वीच मिळाले असते, तसेच अधिक कार्यक्षमपणे अंतराळ मोहिमा अल्प खर्चात पूर्ण झाल्या असत्या.
भारताला केवळ इंजिनच्याच संदर्भात नव्हे, तर अंतराळ संशोधनातील सर्वच गोष्टींमध्ये ‘आत्मनिर्भर’ बनवण्याचा संकल्प नंबी नारायणन् यांनी केला होता. ध्येयाप्रती एखाद्या झपाटलेल्या व्यक्तीप्रमाणे त्यांनी ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अशांनाच नेहमी भल्याभल्या अग्नीदिव्यांतून जावे लागते. ज्या देशासाठी सर्वाेत्तम कामगिरीचा संकल्प केला, त्याच देशात ‘देशद्रोही’ म्हणून खोटा ठपका लागणे किती वेदनादायी आणि दु:खदायी असेल, याची कल्पना करता येणार नाही. ‘केवळ काही चित्रे आणि कला वापरून इंजिन बनवता येत नाही’, हे नंबी यांनी तत्कालीन यंत्रणांना कितीही ओरडून सांगितले, तरी त्यांना ते पटले नाही. शेवटी परीक्षा ही प्रखर देश आणि धर्म प्रेमी यांनाच द्यावी लागते, हेच खरे !
नंबी नारायणन् यांच्यासारखे प्रखर राष्ट्रप्रेमी वैज्ञानिक ही भारताची शक्ती ! |