अंतिमत: विजय उद्धव ठाकरे यांचाच होईल ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

नवी देहली, २६ जून (वार्ता.) – आमचा उद्धव ठाकरे यांना पूर्ण पाठिंबा आहे. मला विश्वास आहे की, त्यांचे आसामला गेलेले काही आमदार जेव्हा परत येतील, तेव्हा त्यांच्यासमवेत बैठक होईल आणि त्यात उद्धव ठाकरे हे सरकार चालवू शकतात, हे स्पष्ट होईल. त्यामुळे अंतिमत: विजय हा उद्धव ठाकरे यांचाच होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देहली येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
पवार पुढे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांकडे बंडखोरांचे त्यागपत्र घेण्याचा अधिकार असून आज ना उद्या त्यांचे त्यागपत्र घेतले जाईल. शिवसैनिकांमध्ये प्रचंड शक्ती आहे. त्यामुळे कितीही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तरी शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही. मी देहलीत कुणालाही भेटणार नाही. आमची संसदेत एक बैठक आहे. बिगरभाजप पक्षांचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे उमेदवारी आवेदन भरण्याच्या निमित्ताने मी देहलीत आलो आहे. इतरही बिगरभाजप पक्षांचे नेतेही येथे येतील.’’