रामनाथी आश्रमातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या संदर्भात सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांनी केलेल्या प्रयोगाच्या वेळी त्यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व सर्वत्र आहे’, या संदर्भात आलेली अनुभूती
१ अ. ‘जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आणि स्वतःतही परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व आहे’, असे जाणवणे : रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरुदेवांच्या खोलीत जाऊन बसल्यावर त्यांच्या छायाचित्रातील डोळ्यांत पाहिल्यावर मला डोळ्यांत तेच दिसू लागले. त्यानंतर ‘माझ्या दृष्टीस जी वस्तू पडेल, त्या ठिकाणी मला त्यांचेच अस्तित्व आहे’, असे दिसू लागले. प्रत्येक वस्तू, लादी, भिंती, पंखा आणि झाडे या सर्वांमध्ये मला त्यांचाच तोंडवळा दिसू लागला. त्यानंतर ‘मी बोलू लागल्यावर माझे ओठ हलत नसून त्यांचेच ओठ हलत आहेत. माझ्या डोळ्यांची हालचाल झाल्यावर त्यांचेच डोळे हलत आहेत आणि हात हलवल्यावर त्यांचेच हात हलत आहेत’, असे मला जाणवले. नंतर सूत्र लिहिण्यासाठी मी वहीकडे पाहिल्यावर ‘मी पहात नसून परात्पर गुरुदेवच वहीकडे पहात आहेत आणि त्या वहीतही त्यांचाच तोंडवळा आहे’, असे मला दिसले. ‘मी जिथे कुठे पहात होते, त्या सर्वच ठिकाणी भगवंतच (परम पूज्य गुरुदेवच) आहे आणि माझ्यातही माझे अस्तित्व नसून केवळ भगवंताचेच (परम पूज्य गुरुदेवांचे) अस्तित्व आहे’, असे मला जाणवले.
१ आ. ठाणे सेवाकेंद्रात असतांना अनेक वेळा अशी अनुभूती येऊनही त्याविषयी लिहून न देणे; मात्र परात्पर गुरुदेवांच्या खोलीत गेल्यावर अशी अनुभूती आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच लिहू शकणे : मी ठाणे सेवाकेंद्रात असतांनाही अनेक वेळा मला ‘भगवंताचे अस्तित्व सर्वत्र आहे’, अशी अनुभूती येते. ही अनुमाने २ – ३ मिनिटांची अनुभूती मला दिवसभरात अनेक वेळा येते; पण तेव्हा ‘ती अनुभूती लिहून देऊया’, असे माझ्या लक्षात आले नाही. परात्पर गुरुदेवांच्या खोलीत गेल्यावर मला बराच वेळ तशी अनुभूती येत होती. तेव्हा देवाने माझ्या लक्षात आणून दिले, ‘अनेक वेळा ही अनुभूती घेतेस; पण नेहमी लिहून देण्यास विसरतेस.’ आज हे अनुभवल्यावर ‘परात्पर गुरुदेवांना ही अनुभूती माझ्याकडून लिहूनच घ्यायची होती; म्हणून ही अनुभूती पुन्हा आली’, असे मला वाटले.’
– (पू.) सौ. संगीता जाधव
भक्त आणि भगवंत यांच्यातील भावपूर्ण संभाषणभक्त हाच भगवंताचा आरसा असणेएकदा परात्पर गुरुदेवांशी आमचे पुढील संभाषण झाले. पू. (सौ.) संगीता जाधव : परात्पर गुरुदेव, मला प्रत्येक वस्तूत तुमचेच रूप दिसते. परात्पर गुरुदेव : मला स्वतःला पहायला आरसा लागतो. तुम्हाला हे सगळे किती छान छान दिसते ! मला तसे का दिसत नाही ? सद्गुरु अनुराधा वाडेकर : तुम्हीच हे सर्व निर्माण केले आहे ना ! तुम्ही निर्माण केले; म्हणून आम्हाला पहाता येते. परात्पर गुरुदेव : देवाकडे हे पहाण्यासाठी आरसा नसतो का ? सद्गुरु अनुराधा वाडेकर : देव जेव्हा भक्ताला दर्शन देतो, तेव्हा देवाच्या दर्शनाने भक्तांचा भाव जागृत होतो आणि भक्ताचा हा भाव भगवंत पहातो, म्हणजे भक्त हाच भगवंताचा आरसा असतो. परात्पर गुरुदेव : तुम्हा दोघींशी एकत्र बोलल्यावर हे सगळे अनुभवता आले. तुम्हा दोघींशी वेगवेगळे बोललो, तर असा भाव अनुभवता आला नसता. तुम्ही दोघी एकत्र असलात की, मगच पूर्णत्व येते. सद्गुरु अनुराधा वाडेकर : तुमचा सत्संग झाला. नंतर आम्ही ते बोलणे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितले. तेव्हा असे वाटले, ‘आम्हाला भगवान श्रीविष्णूचे दर्शन झाले आणि त्याच्याशी झालेले बोलणे आम्ही महालक्ष्मीदेवीला सांगितल्यावरच ते पूर्णत्वाला गेले.’ – सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव, दादर, मुंबई. |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |