कोरोनाच्या संभाव्य लाटेचा प्रतिकार करण्यासाठी आयुर्वेदानुसार आचरण करा !

१. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी नियमित प्रयत्न आवश्यक असणे

‘काही प्रसारमाध्यमांमधून जून २०२२ नंतर कोरोना महामारीची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व रोगांमध्ये विशेषतः साथीच्या रोगांमध्ये शरिराच्या रोगप्रतिकारक क्षमतेची भूमिका महत्त्वाची असते; पण ही रोगप्रतिकारक क्षमता एकाएकी वाढत नाही. त्यासाठी नियमित प्रयत्न करावे लागतात. आतापासूनच आपण आयुर्वेदामध्ये सांगितल्यानुसार दिनचर्या (प्रतिदिन करायच्या कृती) तसेच ऋतूचर्या (ऋतूंनुसार करायचे आचरण) यांचे पालन केले, तर केवळ कोरोनाची संभाव्य लाटच नाही, तर अन्य कोणत्याही रोगाचा प्रतिकार करण्यास आपल्याला साहाय्य होईल.

वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर

२. सर्वांनी नियमित पाळायची न्यूनतम पथ्ये

अ. रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठणे
आ. सकाळी नियमित व्यायाम आणि प्राणायाम करणे
इ. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आहार घेणे
ई. अधिक किंवा अल्प पाणी न पिता आवश्यकतेनुसार पाणी पिणे
उ. मलमूत्रांची प्रवृत्ती रोखून न धरणे, तसेच मलमूत्रांच्या प्रवृत्तीसाठी जोर न करणे
ऊ. मनाला सतत सकारात्मक, उत्साही आणि आनंदी ठेवणे

३. ऋतूंनुसार आहाराचे नियम

अ. हिवाळ्यात भूक अधिक वाढलेली असते. त्यामुळे या काळात दिवसातून ३ किंवा ४ वेळा आहार घेण्यास आडकाठी नाही.
आ. अन्य ऋतूंमध्ये दिवसातून केवळ दोनच वेळा आहार घेण्याची सवय लावावी. हे आरोग्यासाठी चांगले असते.

४. जास्त शारीरिक श्रम न करणाऱ्यांसाठी आहाराविषयी मार्गदर्शक सूत्रे

अ. हिवाळ्याव्यतिरिक्त अन्य ऋतूंमध्ये शक्यतो सकाळी अल्पाहार करू नये. अल्पाहाराच्या वेळेस सवयीनुसार भूक लागेल तेव्हा शारीरिक हालचाल होईल, अशी घरातील कामे करावीत किंवा व्यायाम करावा. असे केल्याने भूक निघून जाते; कारण ती भूक खोटी असते. काहींना नेहमीच्या सवयीमुळे सकाळी अल्पाहाराच्या वेळी भूक लागून ती सहन होत नाही. अशा व्यक्तींनी साळी (भात) किंवा ज्वारी यांच्या लाह्या; भाजलेले मूग, गहू किंवा नाचणी यांच्या पिठाचा किंवा राजगिऱ्याचा लाडू, अशा प्रकारचा पचण्यास हलका असा एखादा पदार्थ खावा किंवा चमचाभर गूळ तोंडात धरावा.
आ. दुपारी कडकडून भूक लागेल तेव्हा जेवावे. पोटभर न जेवता २ घास अल्प जेवावे.
इ. सकाळी साधारण ११ नंतर, तर रात्री साधारण ८ वाजण्यापूर्वी जेवावे.
ई. तहान लागेल तेव्हा आणि तहान भागेल एवढेच पाणी प्यावे. तहान नसतांना अनावश्यक पाणी पिऊ नये.’

– वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०२२)

(चित्रावर क्लिक करा)

(अधिक माहितीसाठी 👉 सनातनचा ग्रंथ ‘आयुर्वेदानुसार आचरण करून औषधांविना निरोगी रहा !’)