मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत राज्य मराठी विकास संस्था !

‘माझिया मराठीचे नगरी…’

‘माझिया मराठीचे नगरी…’ या मालिकेत आपण शासनाच्या अंतर्गत येणार्‍या मराठी भाषेसाठी काम करणार्‍या ‘राज्य मराठी विकास संस्थे’च्या कार्याची व्याप्ती पहात आहोत. मागील २ भागांत संस्थेच्या काही उपक्रमांविषयी जाणून घेतले. या भागात अन्य काही उपक्रमांची माहिती घेऊ.

शासकीय स्तरावर मराठी भाषेच्या दृष्टीने काय प्रयत्न होतात ?, हे आपल्याला ठाऊक नसते. शासकीय स्तरावरील मराठी भाषेच्या कामकाजाची तोंडओळख येथे देण्यामागचा उद्देश हा आहे की, या संदर्भात सर्वसामान्य जनता मराठीच्या वापरासाठी त्याचा लाभ कसा करून घेऊ शकते ? हे पाहू शकते, तसेच त्या उपक्रमांमध्ये वृद्धी किंवा सुधारणा करण्याच्या अनुषंगाने किंवा मराठीच्या संवर्धनासाठी तत्सम उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने शासनाला काही सुचवू शकते.                        (भाग ३)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/855448.html

‘राज्य मराठी विकास संस्थे’चे बोधचिन्ह

२०. वाचन प्रेरणा दिन

महाराष्ट्र शासनाची राज्य मराठी विकास संस्था ही १५ ऑक्टोबर या माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करते. त्या निमित्ताने अन्य संस्थांच्या साहाय्याने चर्चासत्रे, कविता वाचन स्पर्धा, ग्रंथप्रदर्शन, व्याख्याने, मराठी भाषेशी संबंधित खेळ असे उपक्रम आयोजित केले जातात.

२१. मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी केलेले प्रयत्न   

अ. दालने : अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने १६ विविध दालने उभारण्यात आली. त्यात प्रामुख्याने मराठीच्या प्राचीनत्वाची मांडणी करणारी उदाहरणे, मराठीचे भाषिक आणि कालिक भेद दर्शवणारा आढावा, मराठीतील उपलब्ध अन् अधिकृत शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठीच्या मध्ययुगीन वैभवाची मांडणी, बहमनीकाल ते शिवकालीन, तसेच पेशवेकालीन मराठी, १९व्या शतकातील मराठी, मराठी साहित्यपरंपरा, आधुनिकता आणि मराठी आदी विषयांचा समावेश होता. २ सहस्र वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेच्या प्रवासासंबंधी माहिती देणार्‍या विविध सबळ पुराव्यांचे आणि त्याच्याशी संबंधित शिलालेखांच्या प्रतिकृती, ताम्रपट, नाणी, भाषेचे टप्पे, विविध वाङ्मय प्रकार, काही निवडक गाथा, दुर्मिळ ग्रंथ, शिलालेख, साहित्य यांच्या प्रतिकृती आदी विषयांवरील दालनेही होती.

आ. लघुपट : ‘शांतता… मराठीचे कोर्ट चालू आहे’, या लघुपटाच्या माध्यमातून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी न्यायालयीन प्रसंगाची योजना करून वादविवाद आणि संवाद यांच्या माध्यमांतून सर्वसामान्य जनतेपर्यंत सुलभ सोप्या पद्धतीने मराठी भाषा विभागाचे म्हणणे पोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

इ. पत्रे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी विनंती करणारी १० सहस्रांहून अधिक पत्रे राष्ट्रपतींना पाठवण्यात आली.

२२. विविध विषयांवरील कार्यशाळा

मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विविध विषयांवरील कार्यशाळा घेण्यात येतात. अमराठी भाषिकांसाठी ‘मराठी’ या विषयावर मार्गदर्शन, पुस्तकनिर्मिती आणि प्रकाशनप्रक्रिया, मराठी पटकथा लेखन, मराठी संहिता लेखन, मराठी व्यावसायिक लेखन, मराठी अनुवाद लेखन, मराठी ‘विकिपीडिया’ परिचय सत्र अशा विषयांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या.

अ. मराठी ‘विकिपीडिया’ परिचय सत्र : यात ‘विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात नोंदी करतांना अथवा छायाचित्रे, चलचित्रे इत्यादी सामुग्री समाविष्ट करतांना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ?’ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ज्ञानकोशाचे स्वरूप आणि त्यात ‘संपादन (आधीच्या नोंदीत पालट, तसेच नवीन नोंद सिद्ध करणे) कसे करायचे ?’, याची तांत्रिक माहिती पुरवण्यात आली. ‘विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशाचा संदर्भ अनेक जण घेत असतात. त्या दृष्टीने राष्ट्र, धर्म, भाषा या अनुषंगाने योग्य ती माहिती यावर उपलब्ध करून देण्यासाठी हे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरते.

२३. अन्य संस्थांसमवेत उपक्रम 

‘राज्य मराठी विकास संस्था’ आणि ‘पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने २० मे ते ३ जून २०२४ या कालावधीत वैशिष्ट्यपूर्ण साहित्यिक कार्यक्रमांचा ‘वासंतिक उत्सव’ हा उपक्रम राबवण्यात आला.

२४. मोडी हस्तलिखितांचे मराठीकरण

अर्वाचीन काळात मराठा राज्यकर्त्यांच्या प्रशासनाची भाषा ही मराठी असून तिची लिपी ही ‘मोडी’ होती. या लिपीतील कागदपत्रांवरून त्या काळातील मराठी संस्कृती, इतिहास आदी सर्व माहिती मिळते. तमिळनाडू येथे वर्ष १६७६ ते वर्ष १८५५ या कालखंडापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे भोसले आणि त्यांचे वंशज यांचे राज्य होते. एवढ्या १८० वर्षांच्या कालखंडातील समाजजीवन, इतिहास, त्यांचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक धोरण, भाषा, साहित्य, संस्कृती, वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती यांसमवेतच तंजावर मराठा राजांची जीवनपद्धत अन् प्रशासन व्यवस्थेशी संबंधित धोरणे यांविषयी माहिती आदी विषयांची सर्व कागदपत्रे मोडी लिपीत उपलब्ध आहेत. ही कागदपत्रे तमिळ विद्यापीठ, तंजावर येथे आहेत.

या मोडी भाषेतील कागदपत्रांचे जतन, संवर्धन (प्रिझर्व्हेशन आणि कंझर्व्हेशन), संगणकीकरण (डिजिटायजेशन) आणि देवनागरी लिप्यंतर, भाषांतर, तसेच सूची करून ते प्रकाशित करण्याचे काम शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. ही ऐतिहासिक माहिती मराठी भाषिक, अभ्यासक, संशोधक, वाचक यांना उपलब्ध करण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. ३७ मोडी अभ्यासकांनी ५ लाख ८८ सहस्र ५०० एवढ्या मोडी कागदपत्रांचे जतन आणि संवर्धन करून आतापर्यंत ३ लाख ७६ सहस्र कागदपत्रांचे संगणकीकरण केले आहे. त्यांच्या ५ लाख डिजिटायिज प्रतिमा (इमेजेस/फ्रेम्स), तसेच २० हार्ड डिस्क सिद्ध झाल्या आहेत. उर्वरित २ लाख १२ सहस्र ५०० एवढ्या कागदपत्रांची सूची आणि मराठी (देवनागरी) मध्ये लिप्यांतर करण्याचे काम चालू आहे.

मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे संदर्भ लक्षात येण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे.

२५. प्रकाशनांचे ‘इ-बुक’मध्ये रूपांतर

सौ. रूपाली वर्तक

६७ प्रकाशनांचे ‘इ-बुक’ स्वरूपात रूपांतर करण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. संस्थेची ही प्रकाशने इ-पब, पीडीएफ् अशा स्वरूपात उपलब्ध होत आहेत. सध्या संस्थेची १६ प्रकाशने संस्थेच्या संकेतस्थळावर (https://rmvs.marathi.gov.in/category/publications) ‘डाऊनलोड’ करवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत.

२६. ‘गीतार्णव’ या गीतेवरील मराठी टीकेचा (भाष्यग्रंथाचा) शब्दार्थ संदर्भकोश

नाथपंचकातील एक महत्त्वाचे कवी दासोपंत यांनी लिहिलेली गीता टीका, म्हणजेच ‘गीतार्णव’ हा ग्रंथ होय. या ग्रंथाचे १८ अध्याय असून त्यामध्ये १ लाख २५ सहस्र ओव्या आहेत. या टीकेचे मुख्य वैशिष्ट्य, म्हणजे दासोपंतांनी या टीकेत मराठी शब्दांना संस्कृत शब्दांपेक्षा अधिक महत्त्व दिले. ही मराठी भाषेतील एकमेव विस्तृत गीता टीका असून ती साहित्य गुणांनीही संपन्न आहे. या साहित्य कृतीतील मराठी भाषेचे आणि मराठी साहित्याचे वैभव मराठी भाषिकांना कळावे अन् अभ्यासकांना त्याचा उपयोग व्हावा याकरता ‘गीतार्णव’चा शब्दार्थ संदर्भकोश हा प्रकल्प राज्य मराठी विकास संस्थेने हाती घेतला होता.

या महत्त्वपूर्ण ग्रंथातून आलेल्या तत्कालीन (मध्ययुगीन) मराठी भाषेचा शब्दार्थ संदर्भकोश सिद्ध करण्याचे काम चालू आहे. ‘गीतार्णव’ या साहित्य कृतीतील मराठी भाषेचे आणि मराठी साहित्याचे मध्ययुगीन कालखंडातील भाषिक वैभव मराठी भाषिकांना कळावे अन् अभ्यासकांना त्याचा उपयोग व्हावा, तसेच हा ग्रंथ साहित्य आणि तत्त्वज्ञान यांच्या दृष्टीकोनातून अभ्यासकांना समजून घेतांना अडचण येऊ नये, हा या प्रकल्पामागील हेतू आहे.

२७. ऑलिंपिक माहितीकोश 

‘ऑलिंपिक’ या स्पर्धेविषयी, त्यातील खेळांविषयीची समग्र माहिती उपलब्ध करून देणारा अद्ययावत् कोश मराठीत नाही. तसा माहितीकोश इ-बुक स्वरूपात सिद्ध करण्याचा प्रकल्प आकारास येत आहे. ‘राज्य मराठी विकास संस्था’ आणि ‘ज्ञानप्रबोधिनी केंद्र, निगडी’, या दोन संस्थांमध्ये ऑलिंपिक माहितीकोश प्रकल्पाचे चालू आहे. आतापर्यंत याचे ५ खंड पूर्ण झाले आहेत.

२८. भाषिक खेळांची निर्मिती

खेळांच्या माध्यमातून विषय सोपा करून शिकवला की, तो विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचतो, आकलनास सोपा होतो. ‘शब्दहौशी’ आणि ‘नाव गाव फळ फूल’ या खेळांची छपाई राज्य मराठी संस्थेकडून करण्यात आली आहे.  (क्रमशः पुढील रविवारी)

– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/859270.html