‘गुरुकृपायोग’ म्हणजे परात्पर गुरुदेवांच्या रूपातील ‘जगन्माते’च्या मातृवात्सल्य भावाने ओतप्रोत असलेली ‘मातृसंहिता’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले
(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

१. युग आणि काळ यांच्या आधारावर हिंदु धर्मशास्त्राचे केलेले विभाजन

‘ऑनलाईन’ सत्संग मालिकेत प्रस्तुत करण्यासाठी ‘वेद’ याविषयी सूत्रे लिहितांना ‘कलियुगात ‘मातृ संहिता’च वेदशास्त्राची नवीन मार्गदर्शक श्रेणी आहे’, असा विचार माझ्या मनात आला. युग आणि काळ यांच्या आधारावर हिंदु धर्मशास्त्राचे मुख्यतः पुढील तीन श्रेणींत विभाजन केले आहे.

अ. ‘प्रभु संहिता’, म्हणजे वेद / श्रुती (ईश्वरी आदेशाप्रमाणे मार्गदर्शन असणे)

आ. ‘सुहृत संहिता’, म्हणजे स्मृती (एखाद्या मित्राप्रमाणे मार्गदर्शन असणे)

इ. ‘कंठ संहिता’, म्हणजे पुराणोक्त इतिहास (अतिशय मधुर मोहक वाणीत मार्गदर्शन असणे)

२. सत्ययुगात परमात्म्याचे वचन वेदप्रमाण असल्यामुळे वेदांचे वर्गीकरण ‘प्रभु संहिता’, असे करण्यात येणे

सत्ययुगातील जीव सात्त्विक आणि आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होते. त्यांचे आचरण वेदांना अनुसरून होते. परमात्म्याचे वचन वेदप्रमाण असल्यामुळे त्या काळानुसार वेदांचे वर्गीकरण ‘प्रभु संहिता’ असे करण्यात आले. त्या काळी परमात्म्याच्या वेदवचनाचे पालन केले जात असे.

३. त्रेतायुगात जिवांचा आध्यात्मिक स्तर न्यून होणे आणि त्यांच्याकडून वेदशास्त्राचे पालन होण्यासाठी वेदांचे ‘सुहृत संहिता’, असे वर्गीकरण होणे

त्रेतायुगात वेदशास्त्रांचे मार्गदर्शन करतांना प्रभूच्या आदेशाचे रूपांतर मृदू होऊन मित्रवत् झाले. त्यामुळे त्याचे ‘सुहृत संहिता’ असे वर्गीकरण केले. त्या काळात जिवांचा आध्यात्मिक स्तर न्यून झाल्यामुळे वेदांचे श्रवण आणि आज्ञापालन करण्याची त्यांची सिद्धता नसे. त्यांनी वेदशास्त्रांचे पालन करावे; म्हणूनच मवाळपणे मित्रवत् उपदेश देण्यात आला.

४. द्वापरयुगात मानवात वेद संहितांचे श्रवण करण्याचीसुद्धा मानसिकता न उरल्याने मधुर वाणीत इतिहास आणि पुराण यांचे कंठोक्त वेदवर्णन करावे लागणे

द्वापरयुगात मानवाची मनोवृत्ती खालावल्याने तो प्रभु संहिता आणि सुहृत संहिता यांचे श्रवणसुद्धा करत नसे. त्यामुळे पुराण आणि इतिहास या स्वरूपात वेदवर्णन करावे लागत असे. ‘पतीच्या हितासाठी त्याच्या पत्नीने मधुर वाणीत संवाद साधावा’, असे वेदवर्णनाचे स्वरूप असल्याने त्याचे वर्गीकरण ‘कंठ संहिता’ असे करण्यात आले.

५. कलियुगात मानवाचा अहंकार वाढल्यामुळे त्याला इतिहास आणि पुराणे काल्पनिक वाटणे

सद्यःस्थितीत कलियुगांतर्गातील कलियुगात मानवाची सात्त्विकता २० टक्के असल्यामुळे त्याची प्रभु संहिता, सुहृत संहिता आणि कंठ संहिता यांचे श्रवण करण्याचीसुद्धा मानसिकता उरलेली नाही. अहंकारामुळे ‘इतिहास आणि पुराणे काल्पनिक आहेत’, असा मानवाचा अपसमज झाल्यामुळे त्यांवर विश्वास ठेवणे अशक्यप्राय झाले आहे.

६. ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग परात्पर गुरुदेवांच्या रूपातील ‘जगन्माते’च्या मातृवात्सल्य भावाने ओतप्रोत असल्यामुळे त्याचे वर्गीकरण ‘मातृसंहिता’ या श्रेणीत केलेले असणे

या घोर कलियुगात जिज्ञासू आणि साधक यांच्या उद्धारासाठी साक्षात् परमेश्वराने अवतार घेऊन ‘गुरुकृपायोग’ नावाचा पाचवा वेद स्थापित केला आहे. त्यातील मार्गदर्शन मातृवात्सल्य भावाने ओतप्रोत असल्यामुळे याचे वर्गीकरण ‘मातृसंहिता’ या श्रेणीत केले आहे. मातेचे बालकाप्रती असलेले उदात्त प्रेम कोणी नाकारू शकत नाही. सर्वसामान्य मातेच्या वात्सल्यात आदेश किंवा अपेक्षा नसून केवळ प्रेम आणि कृपा यांचा वर्षाव असतो, तर परात्पर गुरुदेवांच्या रूपातील ‘जगन्माते’चे वात्सल्य निश्चितच अवर्णनीय आहे. सच्चिदानंद परब्रह्म परात्पर गुरुदेवांच्या ‘मातृ संहिते’चे प्रकटीकरण त्यांचे सुवचन, कृती, लेखमाला, ग्रंथ, सत्संग, शिबिर, सभा, संकेतस्थळे आणि आध्यात्मिक संशोधन यांच्या माध्यमातून झाले आहे.

७. ‘गुरुकृपायोग’ हा कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग यांचा त्रिवेणी संगम असून कलियुगात तो सुलभ अन् विहंगम मार्गाने ईश्वरप्राप्ती करण्याचा मार्ग असणे

वेदशास्त्र यज्ञयागादी कर्मकांडांवर केंद्रित आहे. स्मृती आणि उपनिषदे यांत ज्ञानयोगाविषयी मार्गदर्शन असल्यामुळे त्यांस ‘ब्रह्मविद्या’, असे संबोधतात. इतिहास आणि पुराणे यांच्या माध्यमातून ईश्वरी अवताराच्या दैवी लीला वर्णिल्या गेल्याने त्यांच्या श्रवणातून भक्तीभाव निर्माण होतो. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग यांचा त्रिवेणी संगम होऊन कलियुगात ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती झाली. या मार्गाच्या रूपात चारही युगांमध्ये कठीण असलेल्या कलियुगात सुलभ आणि विहंगम मार्गाने ईश्वरप्राप्ती करण्यासाठी उत्तमोत्तम साधनामार्ग ईश्वराच्या करुणाकृपेने उपलब्ध झाला आहे.

कृतज्ञता

‘हे परमेश्वरा, हे भगवंता, हे प्रभो, मला वेद, उपनिषदे यांविषयीचे काहीच ज्ञान नाही, तरीही केवळ तुमच्या कृपेने मी ‘ऑनलाईन’ सत्संगमालिकांत ‘वेद’ हा विषय प्रस्तुत करू शकले. दुधात साखर विरघळावी, तसे तुम्ही माझ्या मनात विचारप्रक्रियेचे वहन केले. त्या विचारप्रक्रियेचे पुष्प मी तुमच्या चरणी अर्पण करते. आमच्यासाठी तुम्हीच वेद, उपनिषदे, इतिहास आणि पुराणे यांचे सगुण साकार रूप आहात. आम्हाला वेदांचे ज्ञान नाही; मात्र तुम्ही ठाऊक आहात. ‘आमची गुरुमाऊली आमच्या समवेत आहे’, याची निश्चिती असल्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत.

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२३.११.२०२०)