भारतात काँग्रेसचे राज्य जाऊन आणि भाजपचे राज्य येऊन आता ८ वर्षे झाली आहेत. हिंदूंना अपेक्षा होती की, भाजपचे राज्य आल्यावर हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्यावर जिहादी अन् आतंकवादी यांच्याकडून होणारी आक्रमणे रोखली जातील आणि त्यांना कठोर शिक्षा होईल. ही अपेक्षा काही प्रमाणात पूर्ण होत आहे; मात्र मोठा भाग आजही शिल्लक आहे, हे काश्मीरच्या घटनेतून लक्षात येते. काश्मीरमधील जिहादी मानसिकता नष्ट झाल्याविना आणि जिहादी काश्मिरींना सर्व प्रकारचे साहाय्य करणाऱ्या पाकला नष्ट केल्याविना ते अशक्य आहे, हे गेल्या ८ वर्षांत दिसून येत आहे. गेल्या ८ वर्षांनंतरही हिंदूंना तेथे मूठभर आतंकवाद्यांमुळे पलायन करण्यास भाग पडले आहे. त्यामुळे काश्मीर हिंदूंसाठी अजूनही दूरच आहे, असेच म्हणावे लागेल. काश्मीरच्या घटना चालू होण्यापूर्वी ज्ञानवापीचे प्रकरण समोर आले आणि तेथे प्राचीन काशी विश्वेश्वर मंदिरातील शिवलिंग सापडले होते. त्याला मुसलमानांनी ‘कारंजे’ सांगत ज्ञानवापीवरील त्यांचा दावा भक्कम करण्याचा प्रयत्न केला; मात्र वस्तूस्थिती जगासमोर आहे. आता न्यायालय यावर निर्णय देणार आहे, तेव्हा ते अधिक स्पष्ट होईल; मात्र शिवलिंगाला ‘कारंजे’ म्हटल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ लागल्या आहेत. इतकेच नव्हे, तर त्या शिवलिंगाला कारंजे दाखवण्यासाठी त्याला भोक पाडण्यात आले. त्याचा अवमान करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी हे शिवलिंग सापडले, ती जागा मुसलमानांनी वजू करण्यासाठी म्हणजे नमाजापूर्वी हात-पाय धुणे, इतकेच नव्हे, तर चूळ भरण्यासाठी निर्माण केली होती. हा हिंदूंचा किती मोठा अवमान आहे, हे कुणीच लक्षात घेत नाही.
उलट मुसलमानांकडून सतत ‘कारंजे’ ‘कारंजे’ म्हणत त्याचे समर्थन करण्यात येत आहे आणि हीच गोष्ट भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात बोलतांना खटकली अन् त्यांनी इस्लाममधील काही सूत्रे परखडपणे मांडली. यात महंमद पैगंबर यांच्याविषयी इतिहासात नोंद असलेले सूत्र मांडले गेले; मात्र तो त्यांचा अवमान असल्याचा कांगावा करत मुसलमानांनी त्यांच्या विरोधात काही ठिकाणी तक्रार प्रविष्ट केली, तर कानपूर येथे दंगल घडवली. याच प्रकरणावरून इस्लामी देश कतार, इराण, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि कुवैत यांनी तेथील भारतीय राजदूतांना बोलावून खडसावले. यामुळेच कि काय जागतिक स्तरावर देशाची ‘धर्मनिरपेक्ष प्रतिमा’ जपण्यासाठी भाजपकडून नूपुर शर्मा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. वरील इस्लामी देशांना स्पष्टीकरण देतांना ‘ते’ विधान म्हणजे भारत सरकारची भूमिका नसल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले. दुसरीकडे नूपुर शर्मा यांनी त्यांनी कोणत्या परिस्थितीत विधाने केली, हे सांगून कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेत असल्याचे सांगितले आहे; मात्र जेव्हा हा विषय पुढे आला होता, तेव्हाच नूपुर शर्मा यांनी, ‘माझ्या विधानांचा ‘व्हिडिओ’ जाणीवपूर्वक संकलित करून ‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक महंमद जुबैर याच्याकडून प्रसारित करण्यात आला आहे’, अशी पोलिसांकडे तक्रार केली होती. यावरून नूपुर शर्मा यांना लक्ष्य करण्यात आल्याचे लक्षात येते. त्याच वेळी पोलिसांनी महंमद जुबैर याच्यावर कारवाई करून प्रसारित होणारा व्हिडिओ रोखला असता, तर देशभरात जो काही तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो आधीच थांबवता आला असता. ‘आतातरी पोलीस ‘अल्ट न्यूज’चा महंमद जुबैर याच्यावर कारवाई करणार आहेत का ?’, हा प्रश्नच आहे. इतकेच नाही, तर या व्हिडिओनंतर नूपुर शर्मा यांच्यावर बलात्कार करण्याची, त्यांना ठार मारण्याची, त्याच्या कुटुंबियांना मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या, त्यावरही कोणतीही कारवाई झालेली नाही, याचे उत्तर कोण देणार आहे ?
कारवाई हिंदूंवर होते; मात्र मुसलमानांवर होत नाही !
नूपुर शर्मा यांच्यासारख्यांचे हात-पाय तोडण्याची, डोळे फोडण्याची भाषा करणाऱ्या मौलाना मुफ्ती नदीम अख्तर याच्या विरोधात राजस्थानच्या काँग्रेस सरकारने नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही कारवाई केलेली नाही; मात्र काही मासांपूर्वी उत्तराखंड येथील भाजपच्या सरकारने यति नरसिंहानंद, हिंदु धर्मात घर वापसी करणारे आताचे जितेंद्र त्यागी म्हणजे पूर्वीचे वसीम रिझवी आदींवर धर्मसंसदेत कथित प्रक्षोभक भाषण केल्यावरून गुन्हा नोंदवला. यात त्यागी यांना अटक केली आणि काही मास कारागृहात डांबले. यातून ‘काँग्रेस मुसलमानांना पाठीशी घालते, तर भाजप हिंदूंवर तात्काळ कारवाई करते’, असे चित्र दिसून येत आहे.
इस्लामी देशांना भारत कधी जाब विचारणार ?
कतार, कुवैत आणि इराण या देशांनी नूपुर शर्मा यांच्या विधानावरून भारताला जसा जाब विचारला, तर भारताने गेल्या ८ वर्षांत ज्या इस्लामी देशांत हिंदूंवर, हिंदूंच्या धर्मावर आघात झाले आणि होत आहेत, त्या देशांना किती वेळा जाब विचारला, याचाही विचार झाला पाहिजे. ‘इस्लामी देश त्यांच्या धार्मिक श्रद्धांविषयी जितके सतर्क आणि कठोर असतात’ तितके भारत सरकार बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांच्या अवमानाच्या संदर्भात किंवा हिंदूंवरील अत्याचारांच्या संदर्भात सतर्क आणि कठोर का होत नाही ?’, असा प्रश्न हिंदूंच्या अन् त्यांच्या संघटनांच्या मनात निर्माण होत आहे. पाक आणि बांगलादेश येथे सातत्याने हिंदू आणि हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा यांवर आघात होत आहेत. हे थांबवण्यासाठी भारताने काही केल्याचे दिसले नाही आणि यापुढे तरी भारत काही करील, याचीही शाश्वती हिंदूंना वाटत नाही, ही वस्तूस्थिती आहे ती नाकारता येत नाही. म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांचीच नव्हे, तर भारतामातेचेही अश्लील चित्र रेखाटले. त्यानंतर हिंदूच्या आंदोलनामुळे ते पळून कतारमध्ये गेले. कतारने त्यांना आश्रय दिला आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. त्या वेळी कतारने हिंदूंच्या धार्मिक भावनांचा विचार केला नाही कि त्या वेळच्या काँग्रेस सरकारने कतारच्या राजदूताला जाब विचारला नाही. नूपुर शर्मा प्रकरणावरून भारताची हिंदूंविषयीची अंतर्गत नीती आणि परराष्ट्र नीती यांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
म.फि. हुसेन यांना आश्रय देणाऱ्या कतारने हिंदूंच्या भावनांचा मान राखला नाही, हे लक्षात ठेवा ! |