पास्टर डॉम्निक याला जामीन संमत

डॉमनिक पती-पत्नी (डावीकडे) आणि इतर पदाधिकारी

पणजी, २७ मे (वार्ता.) – आजारातून बरे करण्याचे आमीष दाखवून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करण्याच्या आरोपाखाली शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स चर्च’चा पास्टर डॉम्निक याला २६ मे या दिवशी अटक करण्यात आली होती. (इतक्या वर्षांत जी कारवाई करणे शक्य झाले नाही, ती आता भाजप शासनाच्या काळात होणे, हे हिंदूंसाठी आशादायी आहे ! – संपादक) २७ मे या दिवशी म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने वैयक्तिक हमी म्हणून १० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर डॉम्निक त्याने ‘मी आजारी आहे’, असे सांगत आराडाओरडा केला. अटकेनंतर आजारी पडल्याने त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर त्याने २७ मे या दिवशी जामिनासाठी अर्ज प्रविष्ट केला.

डॉम्निकविरुद्ध दोन निरनिराळ्या तक्रारी प्रविष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.

  • कुचेली, म्हापसा येथील श्री. प्रकाश खोबरेकर यांनी २६ मे या दिवशी डॉम्निकच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. श्री. खोबरेकर यांनी तक्रारीत म्हटले होते की, माझी पत्नी मला घेऊन शिवोली येथील ‘फाइव्ह पिलर्स चर्च’मध्ये जात होती. डॉम्निक याने माझ्या पत्नीचे धर्मांतर केले होते. त्यामुळे तो माझ्यावर ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याचा दबाव आणत होता; मात्र मी हिंदु असल्याने धर्मांतर केले नाही. तेव्हा डॉम्निक याने मला ‘मी शिकवतो तोच धर्म स्वीकार’, अशी धमकी दिली.’’
  • दुसरी तक्रार निखिल शेट्ये यांनी २२ मे या दिवशी केली होती. या तक्रारीत, माझ्या वडिलांना बरे वाटत नसल्याने त्यांना मी शिवोली येथील ‘फाईव्ह पिलर्स चर्च’मध्ये नेले. तेथे पास्टर डॉम्निकने माझ्या वडिलांना लावण्यासाठी तेल दिले आणि हिंदु धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सांगितले. माझ्या वडिलांनी तसे करण्यास नकार दिल्याने पास्टर डॉम्निकने माझ्या वडिलांवर दबाव आणला.

या दोन्ही तक्रारींवरून म्हापसा पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम १५३ (अ), २९५ (अ), ५०६ (२) अ नुसार पास्टर डॉम्निक आणि त्याची पत्नी जोआना यांच्या विरोधात धर्मांतर करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा नोंदवला होता. पास्टर डॉम्निक याची पत्नी जोआना हिलाही अटक करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे तिने म्हापसा येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. तिला अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यता आहे.

संपादकीय भूमिका

  • राज्यात धर्मांतराच्या विरोधात कठोर कायदा नसल्यामुळेच पास्टर डॉम्निक याच्यासारख्यांचे फावते आहे ! अशांना आजन्म कारागृहात डांबण्यासाठी गोव्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारने कठोर कायदा करावा, असे हिंदूंना वाटते !
  • हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांच्या विरोधात काँग्रेसी, पुरोगामी, साम्यवादी, नास्तिकतावादी आदी कुणीही चकार शब्दही काढत नाही, हे लक्षात घ्या !
  • राज्यात हिंदूंचे अशा प्रकारे अजून कुठे कुठे धर्मांतर होते, याचा शोध घेऊन सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी हिंदूंची मागणी आहे !