‘अविस्मरणीय असा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा पहातांना सोलापूर जिल्ह्यातील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२.५.२०२१ या दिवशी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७९ वा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम सर्व ठिकाणच्या साधकांना पहाता यावा, यासाठी हा सोहळा ध्वनीचित्र-चकतीच्या माध्यमातून दाखवण्यात आला. हा कार्यक्रम पाहून सोलापूर जिल्ह्यातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर

पू. (कु.) दीपाली मतकर, सोलापूर

१३ मे या दिवशी आपण काही साधकांच्या अनुभूती पाहिल्या आज त्यापुढील भाग पाहूया. 

४. सौ. मनीषा पत्की, भारती विद्यापीठ 

अ. ‘सोहळ्याच्या २ दिवस आधीपासून ‘परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातून घरी आले आहेत’, असे मला जाणवत होते. तेव्हा ‘घरात चैतन्य आणि आनंद पसरला आहे’, असे मला जाणवले.

आ. परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा पाहून मी भावविभोर झाले. तेव्हा माझ्या डोळ्यांतील भावाश्रू थांबत नव्हते.’

५. सौ. स्वाती महामुनी, भारती विद्यापीठ

५ अ. फुले आणायला गेल्यावर फुलांनी ‘आम्हा सर्वांना गुरुचरणांवर वहाण्यासाठी घेऊन जा’, असे सांगितल्यावर भावजागृती होणे : ‘परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी पहाटे उठल्यापासून मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. मी फुले आणायला गेल्यावर झाडे आणि वेली यांना सांगितले, ‘आज गुरुमाऊलीचा जन्मोत्सव सोहळा आहे.’ फुले खुडण्यासाठी माझा हात फांदीकडे गेल्यावर सगळी फुले माझ्याशी बोलू लागली, ‘आम्हा सर्वांना गुरुचरणांवर वहाण्यासाठी घेऊन जा.’ तेव्हा माझी भावजागृती होत होती.

५ आ. ‘कुंडीतील निशिगंधाच्या फुलांनी गुरुमाऊलीचे शरणागतभावाने स्वागत केले’, असे दिसणे : एका कुंडीत निशिगंधाची फुले आली होती. मी ती खुडत असतांना फुले मला म्हणाली, ‘आम्हाला खुडू नकोस. गुरुदेव इथून जाणार आहेत. तेव्हा आम्हाला त्यांचे स्वागत करायचे आहे.’ सोहळा चालू झाल्यावर प.पू. गुरुमाऊली व्यासपिठाकडे येत असतांना ‘ती निशिगंधाची फुले त्यांचे स्वागत करत आहेत’, असे मला दिसले.’

६. सौ. सीमा व्हनकळस, बार्शी

६ अ. सोहळा पहातांना भावाश्रू येणे आणि ‘गुरुदेवांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य संपूर्ण देहात जात आहे’, असे जाणवणे : ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा पहातांना माझे मन स्थिर आणि आनंदी होते. माझी भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. तेव्हा मला वातावरणात गारवा जाणवत होता. प.पू. गुरुदेवांना सिंहासनावर श्रीरामरूपात पाहून मला कृतज्ञता वाटत होती. ‘गुरुदेवांच्या चरणांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य संपूर्ण देहात जात आहे’, असे मला जाणवले. ‘प्रत्यक्ष रामराज्यात सोहळा पहाण्याचे भाग्य मिळाले आहे’, असे मला वाटत होते.

६ आ. कु. प्रिशा सबरवाल नृत्य करत असतांना ‘देवलोकात आहे’, असे जाणवून आनंद वाटणे : कु. प्रिशा सबरवाल (आध्यात्मिक पातळी ५८ टक्के, वय १५ वर्षे) नृत्य करत असतांना तिच्या भावमुद्रांतून मला आनंद वाटत होता. त्या वेळी ‘मी देवलोकात आहे’, असे मला जाणवत होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना पाहून मला कृतज्ञता वाटली. संपूर्ण सोहळा पाहून आनंद जाणवत होता.’

७. सौ. दमयंती रोडे, बार्शी

७ अ. सोहळा प्रत्यक्ष पहात असल्याचे जाणवणे आणि सोहळ्यामध्ये अखंड भावजागृती होणे : ‘सोहळ्याच्या २ दिवस आधीपासूनच मला गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या सोहळ्याचे वेध लागले होते. जन्मोत्सवाच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच माझी पुष्कळ भावजागृती होत होती. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. ‘संपूर्ण सोहळा मी प्रत्यक्ष पहात आहे’, असे मला जाणवत होते.

७ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ गुरुदेवांचा झोपाळा हलवत असतांना ‘सगळ्या साधकांचे हात त्या झोपाळ्याला लागले आहेत’, असे जाणवून माझ्या शरिरावर रोमांच आले. संपूर्ण सोहळ्यात माझी अखंड भावजागृती होत होती.’

८. श्रीमती अनुपमा जेवळे, कुमठा नाका

८ अ. सोहळा पहातांना भावजागृती होऊन मन निर्विचार होणे : ‘प.पू. गुरुदेवांचा जन्मोत्सव सोहळा पहातांना माझ्या डोळ्यांतील भावाश्रू थांबत नव्हते. माझा कंठ कृतज्ञतेच्या भावाने दाटून आला होता. माझ्या मनाची निर्विचार स्थिती होती. गुरुदेवांचे दिव्य रूप पाहून माझे डोळे दिपले होते आणि मला हलकेपणा जाणवत होता.’

९. सौ. शकुंतला पाटील, भारती विद्यापीठ

९ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हृदयरूपी सिंहासनावर विराजमान आहेत’, असे जाणवणे : ‘मला जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळपासून आध्यात्मिक त्रास होत होता; म्हणून मी गुरुदेवांना सतत प्रार्थना करत होते. मी सूक्ष्मातून घराची शुद्धी करून पूजा आणि आरती केली. तेव्हा मी हृदयरूपी सिंहासनावर माझा भगवंत (परात्पर गुरु डॉ. आठवले) विराजमान असल्याचे अनुभवले. मी सूक्ष्मातून त्यांचे चरण धरून क्षमायाचना केली. मी गुरुदेवांना ‘आता तुम्ही हे सिंहासन सोडून जायचे नाही’, असे काकुळतीने म्हणाले. तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘मी सतत साधकांच्या मनमंदिरात असतो. तुम्हीच मला सतत पहात नाही.’

१०. श्री. दिलीप भाजीभाकरे, कुर्डूवाडी

१० अ. ‘अविस्मरणीय आणि ‘न भूतो न भविष्यति’ असा सोहळा : ‘गुरुदेवांचा जन्मोत्सव सोहळा ‘अविस्मरणीय आणि ‘न भूतो न भविष्यति’ असा होता. सोहळा पहातांना मला परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातून दर्शन झाले. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.

१० आ. ‘परात्पर गुरु डॉक्टर श्रीरामाच्या रूपात समोर उभे आहेत’, असे जाणवणे : ‘मी हा सोहळा प्रत्यक्ष रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात बसून पहात आहे’, असा भाव ठेवला. त्या वेळी ‘रामनाथी आश्रम हे भूतलावरील वैकुंठच आहे. परात्पर गुरु डॉक्टर श्रीरामाच्या रूपात माझ्यासमोर उभे आहेत’, असे मला जाणवत होते.’

(क्रमश:)

  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.