वैशाख शुक्ल दशमी (११.५.२०२२) या दिवशी मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा पाचवा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या आजीला आणि आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील संतत्वाची प्रचीती देणारी सूत्रे पुढे दिली आहेत.
पू. भार्गवराम प्रभु यांना पाचव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र भूमीवर पडल्याचे समजल्यावर वाईट शक्तींपासून गुरुदेवांचे रक्षण होण्यासाठी श्री दुर्गादेवीला प्रार्थना करणारे पू. भार्गवराम (वय ५ वर्षे) !१. ध्यानमंदिरात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे खाली पडलेले छायाचित्र पाहून वाईट शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काहीच करू न शकल्याने त्यांनी राग येऊन त्यांचे छायाचित्र खाली पाडल्याचे पू. भार्गवराम यांनी सांगणे‘७.४.२०२२ या दिवशी सकाळी ९.३० वाजता मी आणि पू. भार्गवराम रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आध्यात्मिक उपाय करण्यासाठी गेलो होतो. तेथे भूमीवर एक छायाचित्र पडलेले होते. एका साधिकेने सांगितले, ‘‘ते छायाचित्र परात्पर गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) आहे.’’ तेव्हा पू. भार्गवराम मला म्हणाले, ‘‘ते छायाचित्र उचलून पुसून स्वच्छ करूया. वाईट शक्तींना पुष्कळ राग येऊन त्यांनी ते छायाचित्र ढकलून खाली पाडले आहे. वाईट शक्ती परात्पर गुरुदेवांना काहीच करू शकल्या नाहीत; म्हणून त्यांनी त्यांचे छायाचित्र खाली पाडले आहे.’’ २. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्षण होण्यासाठी पू. भार्गवराम यांनी दुर्गादेवीला प्रार्थना करणेत्या वेळी पू. भार्गवराम ध्यानमंदिरात ठेवलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तीकडे एकटक पहात म्हणाले, ‘‘आपण परात्पर गुरुदेवांचे रक्षण करण्यासाठी श्री दुर्गादेवीला आवाहन करू या.’’ त्यानंतर त्यांनी हात जोडून मनातल्या मनात प्रार्थना केली.’ – सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम यांची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.४.२०२२) |
१. इतरांना साहाय्य करण्याची वृत्ती
‘एकदा अनंत चतुर्दशीच्या निमित्त मंगळुरू येथील साधकांनी वाहन स्वच्छतेचे नियोजन केले होते. आमच्या घरासमोर दोन दुचाकी वाहने होती. ती घेऊन जाण्यासाठी दोन साधक, तसेच पू. भार्गवराम यांचे मित्र कु. गुरुदास रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १३ वर्षे) आणि कु. चरणदास रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ५६ टक्के, वय ८ वर्षे) आले होते. तेव्हा पू. भार्गवराम तिथेच होते. दुचाकी घेऊन जात असतांना साधक गुरुदास आणि चरणदास यांना त्यावर बसवून सेवाकेंद्राच्या पुढच्या भागाकडे गेले. तेव्हा मी पू. भार्गवराम यांना म्हणाले, ‘‘तुम्हाला त्यांच्या समवेत जायचे आहे का ? मी तुम्हाला घेऊन जाते.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तसे नाही आजी, त्यांना जातांना ‘राईट-राईट’ (कर्नाटकात बसचे कंडक्टर ‘राईट-राईट’ म्हणतात, तेव्हा चालक बस सोडतो.) म्हणणारे कुणी नव्हते; म्हणून मी त्यांना दिशा दाखवण्यासाठी गेलो. मी ‘राईट-राईट’ म्हटल्यावर ते गेले, इतकेच.’’ त्या वेळी साधारण समवयस्क मुलांमध्ये ‘मित्रांच्या समवेत जाण्याची, त्यांच्या समवेत खेळण्याची किंवा इतरांना मिळालेले स्वतःलाही मिळावे’, अशी इच्छा असते; पण पू. भार्गवराम यांना त्यांना साहाय्य करायचे होते. हे पाहून मला यांच्याकडून ‘सकारात्मक विचार कसा करायचा आणि इतरांना सेवेत कसे साहाय्य करायचे ?’, हे शिकायला मिळाले. पू. भार्गवराम यांना ‘साधकांना केलेल्या साहाय्यामुळे अधिक आनंद झाला’, हे माझ्या लक्षात आले.
२. सात्त्विक रंगाची आवड
पू. भार्गवराम यांची शाळा ‘ऑनलाईन’ असतांना एक दिवस शिक्षिका ‘बलून’चे (फुग्याचे) गाणे शिकवत होती. ‘मुलांनो, तुम्हाला कोणत्या रंगाचा फुगा आवडतो ?’, असे शिक्षिकेने विचारताच बहुतांश मुलांनी लाल रंगाचा उल्लेख केला; मात्र पू. भार्गवराम यांनी ‘निळा रंग’, असे सांगितले. शिक्षिकेने त्यांना अनेक वेळा विचारूनही (शिक्षिकेला लाल रंगाविषयी शिकवायचे होते) ते ‘निळा रंग’, असेच सांगत होते. त्यांना निळा हा सात्त्विक रंग असल्याचे अंतर्मनात जाणवत होते. शिक्षिकेने शिकवल्यावरही ‘लाल’, असे न म्हणता ते ‘निळा’, असेच म्हणत होते. प्रत्यक्षात त्यांना रंगांची ओळख नाही आणि इंग्रजी भाषेत ‘त्याला काय म्हणतात ?’, याचीही नीट माहिती नाही.
३. सहनशील
३ अ. शरिराला जखम झाली, तरी इतरांना धीर देणे : पू. भार्गवराम खेळत असतांना काही वेळा ते सायकलवरून पडतात किंवा त्यांच्या पायाला दगड लागतो. त्या वेळी ते औषध लावायला देत नाहीत किंवा रडतही नाहीत. ‘काळजी नको. आता जखम भरून येईल’, असे सांगून ते आम्हालाच धीर देतात.
३ आ. वेदना सहन करण्याची क्षमता असणे आणि त्या स्थितीतही इतरांचा विचार करणे : एकदा सकाळी ते शाळेत जाण्याच्या आधी बैठकीच्या खोलीत खेळण्यांशी खेळत होते. ते खेळण्यातील गाडी पळवत होते. तेवढ्यात पू. भार्गवराम यांचे वडील तेथे आले अणि मोठे पातेले पिशवीत घालून ते जाऊ लागले. त्या वेळी गाडी घेऊन पू. भार्गवराम नेमके तेथे आले आणि त्यांच्या कपाळावर ते पिशवीतील पातेले जोरात आपटले. त्यांना पुष्कळ वेदना होत होत्या; परंतु ‘वडिलांकडून चुकून ही घटना घडली’, हे जाणून ते दुखणे सहन करत शांत राहिले. पू. राधा प्रभु यांनी (त्यांच्या पणजीने) पू. भार्गवराम यांच्या कपाळावर जोरात दाबून धरले. त्या वेळी मीही त्यांना किती लागले आहे, ते पहाण्यासाठी बोलावले; परंतु ते पणजीकडून उपाय करून नंतरच माझ्याकडे आले. ‘मध्येच उठून आल्यास पणजीला वाईट वाटेल’, असा त्यांचा विचार होता. त्यांची वेदना सहन करण्याची क्षमता आणि वेदना होत असतांनाही इतरांचा विचार करण्याची क्षमता पाहून मला पुष्कळ आश्चर्य वाटले.
४. पशू-पक्ष्यांवरील प्रेम
४ अ. ‘उन्हाच्या वेळी पक्ष्यांना पाणीच हवे असणार’, याची समज असणे : एकदा मी कपडे वाळत घालत असतांना एक कावळा आला. त्या वेळी मी पू. भार्गवराम यांना सांगितले, ‘‘त्याच्यासाठी काही तरी खाऊ घेऊन या.’’ त्यावर ते मला म्हणाले, ‘‘त्याचा खाऊ खाऊन झाला आहे. आता त्याला तहान लागली आहे; म्हणून आधी पाणी देऊया.’’ त्यानंतर त्यांनी मडक्यात पाणी भरून ठेवले.
४ आ. कावळ्याला पिण्यासाठी रांजणात पाणी भरणे : एक दिवस आम्ही घराची स्वच्छता करत असतांना पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असलेले एक रांजण मिळाले. ते थोडे मोठे आणि जड होते. ते वापरायला त्रास होतो; म्हणून आम्ही ते बाहेरच ठेवले होते. ते पाहून पू. भार्गवराम यांना कावळ्याने पाणी प्यायल्याची गोष्ट आठवली. त्यांनी ते जड रांजण उचलून कट्ट्यावर ठेवले. त्यांनी पहारीने भूमी खणून काही मोठे खडे आणून त्याच्याजवळ ठेवले आणि रांजणात थोडे पाणी घालून ते कावळा येण्याची वाट पाहू लागले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘रांजणात पाणी पूर्ण भरून ठेवले, तर कावळ्याला खडे उचलून टाकावे लागणार नाहीत ना ? कावळा थेट पाणी पिऊ शकेल ना ?’’ त्यावर ते मला म्हणाले, ‘‘हे ठीक आहे आजी; परंतु ‘पाणी अल्प असतांना कसे प्यायचे ?’, हे कावळ्याने शिकले पाहिजे; म्हणून मी पाणी अल्प प्रमाणात घातले आहे.’’ त्यांनी असे म्हणताच ‘ते शिकण्याच्या दृष्टीने कसा विचार करतात ?’, असे मला वाटले.
५. काही वेळा ते खेळत असतांना मोठ्याने ‘हनुमान कवच’ म्हणत असतात.
६. ‘देव हृदयातच आहे’, असे सांगणे
एकदा गणेशोत्सव असतांना गणेशमूर्ती विसर्जनाविषयी एक चलत्चित्र (‘व्हिडिओ’) दाखवत होते. त्यात अनेक लहान मुले ‘गणेशमूर्ती विसर्जन करू नका !’, असे म्हणून रडत होती. तेव्हा पू. भार्गवराम यांनी मला ‘‘मुले का रडत आहेत ?’’, असे विचारले. मी त्यांना सांगितले, ‘‘आता बाप्पा जात आहेत ना ? आता ते पुढच्या वर्षी येतील; म्हणून मुलांना वाईट वाटून ती रडत आहेत.’’ त्यावर ते मला म्हणाले, ‘‘त्यासाठी त्यांनी रडू नये; कारण त्या दिवशी त्यांना जायचेच असते. ते आपल्या हृदयात (छातीच्या ठिकाणी हात ठेवून) पाहिल्यावर हवे तेव्हा दिसू शकतात ना ?’’ त्यांचे बोलणे ऐकून मला पुष्कळ आश्चर्य वाटले.
७. प्रत्येक कृती करतांना ती कशीही न करता ‘त्यातून देवाचे चैतन्य मिळते’, या भावानेच करण्याकडे कल असणे
आम्ही प्रतिदिन स्वतःला अत्तर-कापूर लावल्यावर त्यांनाही लावतो. एक दिवस मी काहीतरी काम करत असल्यामुळे त्यांच्याशी खेळत नव्हते; म्हणून त्यांना थोडे वाईट वाटले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘आपण आधी अत्तर-कापूर लावूया, म्हणजे तुम्हाला बरे वाटेल. मग आपण खेळूया.’’ मी गडबडीने अत्तर लावले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘अत्तर नीट लावायचे. अत्तर लावतांना ॐ काढला, तरच देवमामांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) शक्ती मिळते. असे केले नाही, तर मिळत नाही.’’
८. पू. रमानंद गौडा यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना भेटण्याची तीव्र तळमळ असणे आणि संध्याकाळी पू. रमानंदअण्णा घरी येऊन पू. भार्गवराम यांच्याशी अर्धा घंटा बोलणे
एक दिवस पू. रमानंदअण्णांचा (सनातनचे ७५ वे समष्टी संत पू. रमानंद गौडा यांचा) वाढदिवस होता. मी पू. भार्गवराम यांना त्याविषयी सांगून ‘‘आपण इथूनच मानस नमस्कार करणार आहोत’’, असे सांगितले. त्या दिवशी मी कितीही सांगितले, तरी त्यांची ऐकायची सिद्धता नव्हती. पू. भार्गवराम मला ‘‘आपण एकदाच जाऊन येऊया. मला पू. अण्णांशी बोलायचे आहे’’, असे सतत सांगत होते. ‘त्यांची समजूत कशी काढायची ?’, हे मला समजत नव्हते. मी शेवटी त्यांना ‘‘नंतर जाऊया’’, असे सांगितले. बहुतेक त्यांच्या तळमळीची ईश्वराला जाणीव झाली असावी. संध्याकाळी पू. रमानंदअण्णा घरी येऊन पू. भार्गवराम यांच्याशी अर्धा घंटा बोलले.
९. श्रीकृष्ण आणि पू. भार्गवराम यांच्या कृतीतील साम्य
पू. भार्गवराम यांचे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाण्याविषयी बोलणे चालू होते. ‘तेव्हा ते आश्रमात गेले, तर परमात्मा कृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जात असतांना गोपी आणि राधा यांना आलेला अनुभव गुरुदेव आम्हाला देत आहेत’, असा विचार माझ्या मनात आला.
१०. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा आणि कृतज्ञताभाव
एक दिवस त्यांना कमरेला घट्ट बसणारी विजार (पँट) घातली होती. त्यांना शौचाला जायची घाई लागली. बाहेरील विजार काढायला त्यांना त्रास होत होता आणि थांबणे अशक्य झाले होते. त्यांनी मला साहाय्य करण्यास बोलावले. मी त्यांची विजार आणि चड्डी काढण्यासाठी साहाय्य केल्यावर त्यांचे कपडे किंवा शरीर यांना कुठेही घाण लागली नव्हती. तेव्हा ते लगेच म्हणाले, ‘‘आजी, गुरुदेवांची किती कृपा आहे ना ! त्यांची कृपा नसती, तर शौचालय आणि माझे कपडे घाण झाले असते.’’
११. कृतज्ञता
‘गुरुदेव, तुम्हीच आम्हाला तुमच्या बाललीला पू. भार्गवराम यांच्या माध्यमातून दाखवत आहात. त्याबद्दल तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– श्रीमती अश्विनी प्रभु (पू. भार्गवराम यांच्या आजी, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मंगळुरू, कर्नाटक. (१०.११.२०२१)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |