ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

न्यायालय आज नवीन दिनांक सांगणार

वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता. यातील शृंगारगौरी मंदिराचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले; मात्र ज्ञानवापी मशिदीच्या वेळी मुसलमानांनी विरोध केल्याने ते होऊ शकले नव्हते. याविषयी ९ मे या दिवशी न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालय आयुक्त आणि दोन्ही पक्षांचे अधिवक्ते यांनी माहिती दिल्यानंतर न्यायालयाने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचा पुनरूच्चार केला. तसेच पुन्हा सर्वेक्षण करण्याचा दिनांक १० मे या दिवशी सांगण्यात येईल, असे सांगितले.

या खटल्यातील हिंदु पक्षाकडून राखी सिंह यांनी माघार घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते; मात्र त्यांनी ९ मे या दिवशी स्पष्ट केले की, त्यांनी या खटल्यातून माघार घेतलेली नाही. राखी सिंह यांच्यासहित सीता साहू, मंजू व्यास, लक्ष्मी देवी आणि रेखा पाठक या पक्षकार आहेत.