पुणे – पुणे ते नाशिक ‘सेमी हायस्पीड’ (मध्यम गती) रेल्वेला नीती आयोगाने संमती दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून तो अंतिम संमतीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार आहे. या प्रकल्पाला राज्य सरकार आणि रेल्वे विभागाची यापूर्वीच संमती मिळाली असून भूसंपादन, तसेच अन्य प्रक्रियाही चालू झाल्याची माहिती, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
या प्रकल्पासाठी मार्गातील १०२ गावांतील १ सहस्र ४७० हेक्टर भूमी लागणार आहे. गावातील भूसंपादन आणि संरेखनासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण पूर्ण होत असून ५ गावांतील भूसंपादनही झाले असून त्याचा योग्य मोबदलाही भूमीमालकांना दिलेला आहे. या मार्गावरून प्रतिघंटा २०० किलोमीटर वेगाने गाडी धावेल. त्याचा वेग अधिकाधिक प्रतिघंटा २५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. या प्रकल्पाची एकूण किंमत १६ सहस्र ३९ कोटी रुपये एवढी असल्याचेही दानवे यांनी सांगितले.