१३ जुलै २०२२ या दिवशी असलेल्या गुरुपौर्णिमेपर्यंत ध्येय घेऊन प्रयत्न करा ! – पू. रमानंद गौडाया प्रसंगी साधकांना मार्गदर्शन करतांना पू. रमानंद गौडा म्हणाले, ‘‘आज ज्याप्रकारे साधकांची उन्नती झाली त्याचप्रकारे आपणही प्रयत्न करायला हवेत. साधकांनी गुरुपौर्णिमेपर्यंत ध्येय घेऊन प्रयत्न करायला हवेत. आपल्यातील ५ प्रबळ स्वभावदोष, ५ प्रबळ अहंचे पैलू यांची व्याप्ती काढून त्यांचे निर्मूलन केले पाहिजे आणि ५ गुण निवडून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोणतीही कृती विचारून घेऊन केली पाहिजे. ‘साधकांची झालेली प्रगती’ यातच गुरुदेवांना खरा आनंद आहे.’’ |
बेळगाव (कर्नाटक), २८ एप्रिल (वार्ता.) – सतत उत्साही, प्रेमभाव आणि श्रद्धा असलेल्या बेळगाव येथील श्रीमती सरस्वती शेट्टी (वय ८३ वर्षे) यांनी, तसेच स्वत:च्या सर्व मुलांना पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणारे, शेतीची कामे भाव ठेवून करणारे, तसेच प्रेमभाव, त्यागीवृत्ती, शांत स्वभाव आदी गुण असणारे अन् गुरूंप्रती अपार श्रद्धा यांमुळे नंदिहळ्ळी येथील श्री. उत्तम कल्लाप्पा गुरव (वय ६१ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे १९ एप्रिल २०२२ या दिवशी घोषित करण्यात आले. आधुनिक वैद्या (सौ.) नम्रता कुट्रे यांच्या घरी झालेल्या एका सत्संग सोहळ्यात सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी ही घोषणा केली. पू. रमानंद गौडा यांच्या हस्ते श्रीकृष्णाचे छायाचित्र देऊन दोघांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे बेळगाव येथील साधक आनंदात डुंबून गेले.
मी काहीच केले नसून सर्व काही देवानेच केले ! – श्रीमती सरस्वती शेट्टी
सत्कार झाल्यावर श्रीमती सरस्वती शेट्टीआजी म्हणाल्या, ‘‘सर्व काही देवच करून घेतो, त्यानेच लहानपणापासून गुण दिले. मी काहीच केले नाही.’’ यानंतर श्रीमती सरस्वती शेट्टीआजी यांचा भाव जागृत झाल्याने त्या अधिक बोलू शकल्या नाहीत.
श्रीमती सरस्वती शेट्टीआजी यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत
सर्वकाही देवाच्या कृपेने मिळते, अशी आईची श्रद्धा आहे ! – काशिनाथ शेट्टी (श्रीमती सरस्वती शेट्टीआजी यांचा मुलगा)
माझी आई सर्व कामे अतिशय व्यवस्थित आणि सातत्याने करते. काटकसर हा गुण तिच्या स्वभावातच आहे. ‘गिझर’ घरात असूनही अंगणात पडलेल्या झावळ्या जाळून ती बंबात पाणी तापवते. नित्यकर्मे झाल्यावर ती भावपूर्णरित्या अनेक स्तोत्रांचे पठण, गीता वाचन करते. सर्वकाही देवाच्या कृपेने मिळते, अशी तिची श्रद्धा आहे.
श्री. गणेश शेट्टी (श्रीमती सरस्वती शेट्टीआजी यांचा नातू)
आजीकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आजीने आमच्या लहानपणापासून आमच्यावर चांगले संस्कार केले.
आजी वात्सल्यरूप आईच आहेत ! – सौ. तारा शेट्टी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)
आम्ही ज्या सेवाकेंद्रात रहातो ते आजींच्या मुलाचे घर असून आजी नेहमी आम्हाला अल्पाहार, भोजन यांविषयी आपुलकीने विचारतात. त्यांच्यातील प्रेमभाव पाहून आम्हाला त्या वात्सल्यरूप आईच वाटतात.
सर्वकाही गुरुदेवांनीच करून घेतले ! – उत्तम गुरव
मनोगत व्यक्त करतांना श्री. उत्तम गुरव म्हणाले, ‘‘मी बोलू शकत नाही. सर्व काही गुरुदेवांनीच करून घेतले. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’’ यानंतर श्री. उत्तम गुरव यांचा भाव जागृत झाल्याने ते अधिक बोलू शकले नाहीत.
श्री. गुरव यांच्या नातेवाइकांचे मनोगत
साधनेनंतर श्री. गुरव यांच्यात पुष्कळ पालट झाला आहे ! – सौ. उज्ज्वला गुरव (श्री. उत्तम गुरव यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
त्यांच्यात आज्ञापालन, स्वीकारण्याची वृत्ती हे गुण आहेत, तसेच अहं अल्प आहे. आधी ते रागीट होते; परंतु साधनेनंतर त्यांच्यात पालट झाला आहे. ते मला पुष्कळ साहाय्य करतात.
बाबा आम्ही सांगितलेल्या चुका स्वीकारून लगेचच पालट करत असत ! – सुकेश गुरव (श्री. उत्तम गुरव यांचा मोठा मुलगा)
बाबा प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करतात. आम्ही ज्या ज्या चुका त्यांना सांगत असू त्या त्या स्वीकारून त्यात ते लगेच पालट करत असत. गेल्या २-३ मासांपासून त्यांची पातळी वाढली आहे, असे जाणवत होते.
संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून जोडलेल्या नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत
१. श्री. कुशल गुरव (श्री. उत्तम गुरव यांचा लहान मुलगा)
बाबांमध्ये पहिल्यापासूनच प्रेमभाव आहे. ते आम्हाला कधीही रागावले नाहीत. ते पुष्कळ काटकसरी आहेत. व्यवस्थितपणा हा त्यांचा गुण आहे.
२. सौ. रोहिणी वाल्मिक भुकन (श्री. उत्तम गुरव यांची मुलगी, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)
आश्रमात भाजी, फळे अथवा अन्य काहीही पाठवायचे असल्यास ते अत्यंत प्रेमाने आणि अतिशय व्यवस्थित बांधणी करून पाठवतात.
३. श्री. वाल्मिक भुकन (श्री. उत्तम गुरव यांचे जावई)
आमच्यात सासरे-जावई या नात्यापेक्षा वडील-मुलाचे नाते आहे. मुलगी देतांना त्यांनी गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून साधक म्हणून मुलगी दिली. असे सासरे मिळणे हे भाग्यच आहे. त्यांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग मिळाला आणि त्यातून त्यांना दिशा मिळाली.
अनुभूती
श्री. उत्तम गुरव यांच्याकडील परात्पर गुरु डॉक्टरांचे हरवलेले छायाचित्र ३ मासांनंतर शेणखळीत सापडूनही आहे तसेच रहाणे !
श्री. गुरव यांच्याजवळ परात्पर गुरु डॉक्टरांचे एक लहान आकाराचे भावमुद्रेतील छायाचित्र होते. शेतात काम करतांना ते हरवले. ३ मासांनंतर शेणखळी काढतांना त्यांना ते सापडले. ‘लॅमिनेशन’ केलेले नसतांनाही ते छायाचित्र ‘आहे तसेच’ होते. ‘छायाचित्राच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टर सतत माझ्यासमवेत आहेत आणि आताही ते आहेत’, हे सांगत असतांना काकांची भावजागृती झाली होती. – सौ. मिनाक्षी हर्षे