सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांचा आज १४.४.२०२२ या दिवशी ‘ऐंद्री शांतीविधी सोहळा’ आहे. त्या निमित्ताने …
१. पू. होनपकाकांच्या सेवेची संधी मिळणे आणि पू. संदीप आळशी यांनी ‘पू. काकांची सेवा केल्याने तुझा आध्यात्मिक त्रास दूर होईल’, असे उत्स्फूर्तपणे सांगणे
‘जानेवारी २०२२ मध्ये रामनाथी आश्रमातील सनातनचे संत पू. पद्माकर होनपकाका यांची कन्या सुश्री (कु.) दीपालीताई रुग्णाईत होती. तेव्हा मला पू. होनपकाकांची सेवा करण्यासाठी त्यांच्या खोलीत निवास करण्याची संधी मिळाली. त्याविषयी मी सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक पू. संदीप आळशी यांना सांगितल्यावर ते मला उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘पू. होनपकाकांची सेवा केल्याने तुझा आध्यात्मिक त्रास लवकर दूर होईल.’’ त्यांचे हे वाक्य ऐकताच कृतज्ञताभावाने माझ्या मनात विचार आला, ‘आता संतांचा, म्हणजे गुरूंचाच संकल्प झाल्याने या सेवेतून माझा आध्यात्मिक त्रास लवकर दूर होणार, हे १०० टक्के सत्य आहे.’ त्या रात्री तत्कालीन परिस्थितीनुसार पू. होनपकाकांच्या सेवेला जाण्याचा निरोप मला उशिरा मिळाला, तरी गुरुकृपेने मला एका साधिकेच्या चारचाकी गाडीने माझ्या निवासस्थानी जाता आले आणि लगेच वैयक्तिक साहित्य घेऊन आश्रमात पू. होनपकाकांच्या खोलीत अल्प वेळेत पोचता आले. त्या वेळी ‘संतांच्या संकल्पाने सर्व सुविधा उपलब्ध होऊन सेवेतील अडचणी आपोआप दूर होतात’, याची मला अनुभूती आली.
२. मी रात्री ११.१५ वाजता पू. होनपकाकांच्या खोलीत प्रवेश करताच मला त्यांच्या पलंगाभोवती चैतन्याचे मोठे संरक्षककवच असल्याचे सूक्ष्मातून दिसले.
३. पू. होनपकाकांचे कपडे धुतांना पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक लाभ होणे
अ. त्या रात्री मला पू. काकांचे दैनंदिन नियोजन कळले आणि दुसऱ्या दिवसापासून मी त्यांच्या खोलीचा केर काढणे, प्रसाद-महाप्रसादाची भांडी धुणे, त्यांचे कपडे धुणे इत्यादी सेवा चालू केल्या. मी संतांचे कपडे धुण्याची सेवा प्रथमच करत होतो. तेव्हा पू. काकांच्या कपड्यांतील चैतन्य मला त्रास देणाऱ्या वाईट शक्तींना सहन होत नव्हते आणि ‘जणूकाही कपडे पिळल्याप्रमाणे माझे संपूर्ण अंग सूक्ष्मातून पिळले जात आहे’, असे मला जाणवत होते. त्या प्रसंगी मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करत ती सेवा पूर्ण करू शकलो.
आ. दुसऱ्या दिवशी कपडे धुतांना मला सनातनच्या सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर यांचे स्मरण झाले. त्या साधकावस्थेत असतांना देवद (पनवेल) येथील सनातन आश्रमात परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज यांचे कपडे धूत असत. एकदा त्यांनी भावावस्थेत असतांना प.पू. महाराजांच्या कपड्यांद्वारे चैतन्यमय झालेले पाण्याचे काही थेंब ‘तीर्थ’ म्हणून ग्रहण केले होते. ती अनुभूती आठवल्यावर माझ्या मनात विचार आला, ‘पू. होनपकाकांच्या कपड्यांचे पाणीही चैतन्यमय आहे; पण सध्या कोरोना महामारी असल्याने ते पाणी ग्रहण करणे योग्य नाही. यातील थोडे पाणी ‘तीर्थ’ म्हणून स्वतःच्या डोक्यावर अवश्य घालू शकतो.’ लगेच मी तशी कृती केल्यावर मला नेहमीपेक्षा अधिक आध्यात्मिक लाभ झाले.
इ. तिसऱ्या दिवशी गुरुकृपेने माझ्या मनात विचार आला, ‘पू. होनपकाकांचे स्नान झाल्यावर प्रथम त्यांचे कपडे धुऊया आणि ते कपडे तिसऱ्यांदा पाण्यामध्ये खळबळवल्यावर (धुतल्यावर) त्या चैतन्यमय पाण्याद्वारे स्वतः स्नान करूया. त्यामुळे स्वतःच्या शरिरावरील त्रासदायक आवरण निघून जाईल. मग नेहमीप्रमाणे गरम पाण्याने स्नान करू.’ तिसऱ्या दिवशी मी वरीलप्रमाणे स्नान करत असतांना मला एकापाठोपाठ एक ढेकरा येऊन माझ्या शरिरातील बहुतांश त्रासदायक आवरण निघून गेले आणि मला अतिशय हलकेपणा जाणवला.
अशा प्रकारे प्रतिदिन पू. होनपकाकांचे कपडे धुतांना मला गुरूंच्या सगुण सेवेची पर्वणीच मिळाल्याचे वाटले. त्या दिवसांत मी प्रतिदिन सेवा करतांना माझा आध्यात्मिक त्रास न्यून होत असल्याचे जाणवत होते आणि माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टर, पू. संदीप आळशी अन् पू. होनपकाका यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत होती.
४. तिसऱ्या रात्री पू. होनपकाकांनी त्यांचे पाय चेपण्याची अनुमती देणे आणि ती सेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण होण्यासाठी गुरुकृपेने विचार सुचून तशी कृती करतांना अवर्णनीय आनंद मिळणे
तिसऱ्या रात्री मी झोपण्यापूर्वी नेहमीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण मानसरित्या चेपत होतो. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आज आपण पू. होनपकाकांना ‘तुमचे पाय चेपू का ?’, असे विचारूया.’ तेव्हा पू. होनपकाकांनी मला त्यांची चरण सेवा करण्याची अनुमती दिली. प्रथम मी त्यांचे चरण स्वतःच्या मांडीवर ठेवले आणि त्यांच्या पायाच्या खोटेपासून बोटांपर्यंत हळुवार चेपू लागलो. मला त्यांचे चरण कापसाच्या गादीप्रमाणे अतिशय मऊ असल्याचे जाणवत होते. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिष्यावस्थेत असतांना त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांची आणि प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या सद्गुरूंची सेवा न थकता अत्यंत भक्तीभावाने कशी केली होती’, याविषयी ग्रंथांत वाचलेले प्रसंग मला आठवले. तेव्हा गुरुकृपेने ‘पू. होनपकाकांच्या पायाचा तळवा चेप. मग पायांचे चवडे चेप’, असे विचार एकापाठोपाठ एक माझ्या मनात येत होते आणि मी तशी कृती केल्यावर पू. काकांकडून मला सकारात्मक प्रतिसादही मिळत होता. तेव्हा ‘गुरुदेवांनी माझ्याकडून कठपुतळी बाहुलीप्रमाणेच पू. काकांची सेवा करवून घेतली’, असे माझ्या लक्षात आले.
त्या दिवसांत साधकांनी प्रसाद (अल्पाहार) किंवा महाप्रसाद आणल्यावर पू. काका त्यातील डाळिंबाचे काही दाणे किंवा थोडा पदार्थ मला देण्यासाठी काढून ठेवत असत. तेव्हा ‘त्या माध्यमातून पू. काका मला सेवेसाठी एकप्रकारे चैतन्यच पुरवत होते’, असे मला वाटते.
५. कृतज्ञता
मला पू. होनपकाकांच्या खोलीत निवास करून त्यांची सेवा करण्याची अमूल्य संधी लाभली, यासाठी मी परात्पर गुरु डॉक्टर, पू. संदीप आळशी, पू. होनपकाका आणि साधक यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञ आहे.’
– श्री. गिरिधर भार्गव वझे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.४.२०२२)
|