अमेरिका युक्रेनला आणखी ५ सहस्र ७०० कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे पाठवणार !

‘रशियाने आक्रमण केल्यास अमेरिका साहाय्य करील’, असे सांगणार्‍या अमेरिकेने युद्ध चालू झाल्यावर युक्रेनला एकटे सोडले. त्यामुळे अमेरिकेने युक्रेनला कितीही साहाय्य केले, तरी ते वरवरचेच असणार आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियाविरुद्ध युद्ध करता येण्यासाठी अमेरिका लवकरच युक्रेनला आणखी ७५० दशलक्ष डॉलर्सची (५ सहस्र ७०० कोटींहून अधिक रुपयांची) शस्त्रास्त्रे पाठवणार आहे. यामुळे रशियाने युक्रेनवर आक्रमण चालू केल्यानंतर आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला केलेले साहाय्य हे २.४ अब्ज डॉलर्सचे (१८ सहस्र २७० कोटींहून अधिक रुपयांचे) होणार आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली.

अमेरिकेने ‘जॅवेलिन’ टँकविरोधी, तसेच ‘स्टिंगर’ नावाची घातक क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणात युक्रेनला देऊ केली आहेत. यांमध्ये ५ सहस्र जॅवेलिन्स आणि १ सहस्र ४०० स्टिंगर्सचा समावेश आहे. अमेरिकी सरकारच्या एका संघटनेने सांगितल्यानुसार अमेरिकेकडे असलेल्या एकूण जॅवेलिन क्षेपणास्त्रांपैकी तब्बल एक तृतीयांश, तर एकूण स्टिंगर क्षेपणास्त्रांपैकी एक चतुर्थांश एवढ्या संख्येने ही शस्त्रास्त्रे युक्रेनकडे देण्यात आली आहेत. अमेरिकेला वरील क्षेपणास्त्रे पुन्हा बनवण्यासाठी ४-५ वर्षे लागतील.