सध्या कर्नाटकमध्ये आर्थिक जिहादच्या सूत्रावरून वातावरण पेटले आहे. राज्यात युगादी (गुढीपाडवा) सण साजरा करण्यात येणार आहे. हिंदू ‘युगादी’च्या नंतर देवाला मांस अर्पण करतात. या दिवशी ‘हलाल’ मांसाच्या ऐवजी ‘झटका’ म्हणजेच हिंदूंमध्ये मान्यता असलेले मांस खरेदी करण्याचे आवाहन हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून केले जात आहे. यामुळे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आदींना पोटशूळ उठला आहे. हिजाब प्रकरणामुळे कर्नाटकात आधीच अशांती निर्माण झाल्यामुळे ‘हलाल’चा वाद उफाळून आल्यास तेथील सामाजिक शांती बिघडेल’, असे या टोळीचे मत आहे. याचा अर्थ पुन्हा एकदा राज्यातील अशांततेसाठी हिंदूंनाच उत्तरदायी ठरवले जात आहे. एक मात्र बरे झाले की, या प्रसंगात हिंदूंनी माघार घेतलेली नाही. स्वतःला हवे तसे वागायचे, त्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करायचा आणि हिंदूंना तुकवायचे, असा प्रकार धर्मांधांकडून भारतात वर्षानुवर्षे चालू आहे. हलाल मांसाचा विषय तापल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी ‘आर्थिक जिहाद’ या शब्दाचा वापर केला. त्यास विरोध होऊ लागल्यानंतरही त्यांनी फिरवाफिरवी करण्याऐवजी ते स्वतःच्या मतावर ठाम राहिले. रवि यांनी, ‘मुसलमान हिंदूंकडून मांस खरेदी करण्यास नकार देतात. त्यामुळे हिंदूंनी त्यांच्याकडून मांस खरेदी करण्याचा आग्रह का धरला जातो ?’, असा प्रश्न उपस्थित केला. यामुळे कर्नाटकातील जनता दल (निधर्मी) आणि काँग्रेस यांनी थयथयाट केला आहे.
जनता दल (निधर्मी)चे नेते आणि माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी यांनी ‘हिंदु युवकांनी राज्याला बिघडवू नये’, असे सांगितले आहे. हिंदू त्यांच्या हक्कांसाठी एकत्र आल्यावर अनेकांना सर्वधर्मसमभाव आठवतो. कर्नाटकात अनेक जिहादी संघटना कार्यरत आहेत. मागील १०-१५ वर्षांत हिंदुत्वनिष्ठांच्या झालेल्या हत्यांची संख्या पहाता राज्यातील धार्मिक सलोखा कधीच बिघडला असून तो धर्मांधांनी बिघडवला असल्याचे आपल्या सहज लक्षात येते. असे असूनही हिंदूंना मात्र उपदेशाचे डोस पाजले जात आहेत. हिंदू आता जागृत झाले आहेत. त्यामुळे आता ते कुठलीही गोष्ट सहन करत न बसता त्याचा प्रतिवाद करतात. स्वतःवर होत झालेल्या अन्यायाविषयी हिंदू आवाज उठवू लागले आहेत. आता कर्नाटक सरकारची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणार्यांवर कारवाई करू’, अशी भूमिका जरी गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी घेतली असली, तरी मुख्यमंत्री बोम्माई यांनी सावध भूमिका घेत, ‘आम्हाला संपूर्ण अभ्यास करावा लागेल’, असे म्हटले आहे. हलाल अर्थव्यवस्था राबवून भारतात समांतर अर्थव्यवस्था राबवण्याचा धर्मांधांचा डाव आहे. हिंदू याविषयी टोकाची भूमिका घेत असतांना त्यामागील त्यांचा शुद्ध हेतू समजून घ्यायला हवा. कर्नाटकात त्याला विरोध होऊ लागल्यामुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारने याची नोंद घेऊन हलाल अर्थव्यवस्थेवर चाप बसवण्यासाठी पावले उचलावीत !