सद्गुरु राजेंद्र शिंदे देवद आश्रमातील काही साधकांच्या व्यष्टी साधनेचा साप्ताहिक आढावा घेतात. या आढाव्यात ते प्रत्येक सप्ताहात काही गृहपाठ देतात. एका सप्ताहात त्यांनी ‘आपली प्रत्येक कृती आणि विचार यांकडे देवाचे लक्ष असते. देव त्याची नोंद करून त्याचे चित्रीकरण करत असतो’, याकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. साधकाने सतत ‘देव चित्रीकरण करत आहे’ याचे भान ठेवले, तर आपोआपच त्याला त्याचे चांगले आणि वाईट कर्म अन् विचार यांची जाणीव रहाते. परिणामी त्याच्याकडून नेहमी चांगलेच कर्म किंवा विचार होत रहातात आणि स्वभावदोष अन् अहं यांची जाणीव होऊन त्यांचे निर्मूलन व्हायला आरंभ होतो.’ देवद आश्रमातील काही साधिकांनी यानुसार प्रयत्न आरंभ केल्यावर त्यांना आलेले अनुभव, अनुभूती आणि झालेले लाभ पुढे दिले आहेत.
१. सौ. अक्षरा शिंदे
१ अ. सेवा उरकण्याचा विचार टाळता येऊ लागणे : अल्पाहार सेवा करतांना शेवटी दमायला झाले की, सेवा करतांना वेग अल्प होतो आणि माझ्याकडून सेवा उरकण्याचा विचार येतो; पण ‘देवाचे चित्रीकरण चालू आहे’, या विचाराने ती सेवा देवाला अपेक्षित अशी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न होऊ लागला.
१ आ. इतरांना चुका सांगण्याच्या प्रयत्नांना आरंभ होणे : इतरांना चूक सांगतांना ‘समोरच्या साधकाला काय वाटेल ? मी बरोबर आहे ना ? माझे चुकले तर !’, असे विचार मनात असायचे. त्यामुळे संबंधित साधकांना त्यांच्या चुका सांगणे टाळले जात होते. आता ‘देवाचे तर लक्ष आहे. माझे काही चुकले, तर देवच त्या साधकाच्या माध्यमातून मला सांगेल’, या विचाराने साधकांच्या चुका सांगण्याच्या प्रयत्नास आरंभ केला.
२. सौ. अंजली झरकर
२ अ. ‘देव आपल्या मनातील सर्व विचारांची नोंद करून ठेवतो’, याकडे अधिक लक्ष देऊन प्रयत्न करतांना घडलेला प्रसंग : ‘देव आपल्या मनातील सर्व विचारांची नोंद करून ठेवतो’, याकडे अधिक लक्ष देऊन प्रयत्न करत असतांना एकदा मला सहसाधकाविषयी प्रतिक्रिया येत होती. तेव्हा मी लगेच देवाला म्हटले, ‘देवा, हा विचार नोंद करू नकोस. मी स्वतःला सुधारते.’ त्यानंतर ‘मी देवाला थांबवले’, ही माझ्या मनातील चूक लक्षात आल्यावर मी त्वरित देवाची क्षमा मागितली आणि देवाने जाणीव करून दिल्याविषयी कृतज्ञताही व्यक्त केली.
हा प्रसंग व्यष्टी आढाव्याच्या वेळी सांगितल्यावर सदगुरु दादा म्हणाले, ‘‘देवाकडे प्रत्येक कृतीचा हिशोब असतो. असे काही नसते की, त्याला जेव्हा वाटेल, तेव्हा तो चित्रीकरण करील. देवाचे चित्रीकरण २४ घंटे चालूच असते. आपण सतत सतर्क राहून प्रयत्न करायला हवेत.’’
३. सौ. मीरा कुलकर्णी
३ अ. ‘समष्टीच्या दृष्टीने विचार करण्यापेक्षा स्वतःच्या सोयीचा विचार करणे, हा चुकीचा दृष्टीकोन आहे’, असे प्रत्यक्ष अनुभवता येणे : ‘पूर्वी माझी नकारात्मक विचार करण्याची वृत्ती होती. त्यामुळे सेवेत कुठलाही पालट झाल्यास मला ‘कसे जमणार ? माझ्याकडून होणारच नाही’, असे विचार असायचे. १९.७.२०१८ या दिवशी रात्री ८.३० वाजता मला एका सेवेचा निरोप मिळाला. तेव्हा मला लगेच परिस्थिती स्वीकारता आली नाही; पण पुढच्या क्षणी लक्षात आले, ‘देव बघत आहे. नियोजनातील पालट त्यानेच केला आहे. आता मला केवळ कृती करायची आहे.’ त्यानंतर सर्वांनी एकत्रित येऊन नियोजन केले आणि देवाला प्रार्थना करून सेवेला आरंभ केला.
देवानेच संघटितपणे आमच्याकडून सेवा करवून घेतली आणि सायंकाळी ५ पर्यंत सर्व सेवा पूर्ण झाली. प्रत्येक साधकाच्या मनात ‘देव बघत आहे’, याची जाणीव होती. त्यामुळे त्याच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य सर्वांना ग्रहण करता आले. सर्वांनी सकारात्मक राहून सेवा केली. या प्रसंगामुळे माझ्यात श्रद्धा आणि भाव वाढण्यास साहाय्य झाले.
३ आ. ‘देव बघत आहे’, या विचाराने अंतर्मुखता वाढणे : गुरुपौर्णिमेनिमित्त भेट देण्यासाठी काही ग्रंथांच्या मागण्या आल्या होत्या; परंतु जिल्ह्यांच्या मागण्या आणि उपलब्ध ग्रंथांचा साठा यांमध्ये भेद दिसत होता. ‘देव बघत आहे. मी अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक सेवा करत आहे का ?’, असा अंतर्मुख राहून विचार केला. त्यानंतर मी आणि सहसाधिकेने परिपूर्ण, भावपूर्ण आणि गुरुसेवा म्हणून सेवा करण्याचा प्रयत्न केला.
३ इ. चुकीविषयी खंत वाटू लागणे : एखाद्या वेळी ग्रंथ मांडणीतून काढतांना खाली पडतात. तेव्हा ‘देखल्या देवा दंडवत !’ करून ग्रंथ पुन्हा मांडणीत ठेवले जातात. आता ‘देव बघत आहे’, या विचाराने ग्रंथ खाली पडला, तर ‘प्रत्यक्ष देवाच्या निर्गुण रूपाची आपण अवहेलना करत आहोत’, याची खंत वाटायला लागते.
३ ई. ‘देव बघत आहे’, त्याचे ध्वनीचित्रीकरण चालू आहे’, या विचाराने मला माझ्यातील अनेक स्वभावदोष आणि अहंचे पैलू लक्षात आले अन् त्यांवर मात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालू झाले. त्यामुळे देवाकडून गुणांच्या वृद्धीसाठी साहाय्य मिळत आहे.
– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.७.२०१८)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |