आज २४ डिसेंबर या दिवशी पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांच्या देहत्यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…
१३.१२.२०२४ या दिवशी सनातनच्या ६४ व्या संत पू. (श्रीमती) शेऊबाई लोखंडे (वय १०० वर्षे) यांनी देहत्याग केला. २४.१२.२०२४ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या देहत्यागापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. २३.१२.२०२४ या दिवशी या लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
(भाग २)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/866275.html
६. सौ. सीमा संतोष अनारसे (पू. लोखंडेआजींची नात), जळगाव
६ अ. पू. आजींच्या देहत्यागानंतर त्यांनी जुन्या आठवणी काढून रडण्यापेक्षा श्रीकृष्णाचा श्लोक म्हणण्यास सूक्ष्मातून सांगणे : ‘पू. आजींनी देहत्याग केला, त्या वेळी मी अहिल्यानगर येथे होते. तेथून रामनाथी आश्रमात येण्यासाठी मी चारचाकीत गाडीत बसले. तेव्हा मला पू. आजींविषयीचे भूतकाळातील प्रसंग आठवले. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून पुष्कळ अश्रू येऊ लागले आणि मला त्रास होऊ लागला. तेव्हा पू. आजी मला सूक्ष्मातून म्हणाल्या, ‘माझ्या आठवणींमुळे तुला पुष्कळ त्रास होईल. त्याऐवजी तू ‘कृष्णाय वासुदेवाय…’ हा श्लोक म्हण.’ त्यानंतर मी सतत तो श्लोक म्हटला आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप केला.’
७. श्री. दामोदर गायकवाड (पू. लोखंडेआजींचे नातजावई), फोंडा, गोवा.
७ अ. गुणवैशिष्ट्ये
७ अ १. उत्तम स्मरणशक्ती : ‘एकदा एक साधक काही कालावधीनंतर रामनाथी आश्रमात सेवेसाठी आला होता. त्या वेळी पू. आजींनी त्या साधकाला बरोबर ओळखले आणि त्यांनी त्याच्या जवळ जाऊन पाठीवर हात फिरवून त्याची अन् त्याच्या कुटुंबियांची विचारपूस केली.
७ अ २. प्रेमभाव
अ. आम्ही सर्व कुटुंबीय जेवणासाठी एकत्र बसल्यावर पू. आजी ‘सर्वांना सर्व पदार्थ वाढले आहेत ना ?’, याची निश्चिती करायच्या.
आ. गावी असतांना आम्ही पहाटे ५ वाजता शेताची नांगरणी करण्यासाठी जात असू. तेव्हा त्या आमच्यासाठी चहा बनवून द्यायच्या.
इ. मी काही अडचणींमुळे त्यांच्याकडे गेलो नाही, तर त्यांना बोलता येत नसतांनाही त्या माझ्याविषयी मनीषाला (माझ्या पत्नीला) खुणेने विचारत असत.
७ आ. देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे
१. पू. आजींच्या देहत्यागानंतर सर्वांचा ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप चालू झाला आणि तो अखंड चालू राहिला.
२. पू. आजींना अग्नी दिल्यानंतर ‘त्यांच्या चितेतील ज्वाळांतून पुष्कळ तेज आणि प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला जाणवत होते.
३. पू. आजींच्या अस्थी नदीच्या पाण्यात विसर्जित केल्यानंतर त्या पुष्कळ चमकत होत्या. ‘अस्थींकडे पाहून पाण्यातील मासेही संतांचे चैतन्य ग्रहण करण्यासाठी अस्थींजवळ येत होते’, असे मला जाणवले; कारण नंतर आम्ही माशांसाठी पाण्यात पोळी टाकली, तेव्हा ‘पोळी खायची सोडून मासे पळून जात होते’, असे माझ्या लक्षात आले.’
८. सौ. मनीषा गायकवाड (पू. लोखंडेआजींची नात), सनातन आश्रम, फोंडा, गोवा.
८ अ. देहत्यागानंतर जाणवलेली सूत्रे
१. खोलीतील वातावरण प्रकाशमय, आनंदमय आणि आल्हाददायक झाले होते.
२. मला शांती, स्थिरता आणि चैतन्य यांची अनुभूती येत होती.
३. मी रात्रभर जागरण करूनही मला कसलाच त्रास झाला नाही.’
९. सौ. उर्मिला रामेश्वर भुकन (पू. लोखंडेआजींची नातसून), फोंडा, गोवा.
९ अ. पू. आजींना प्रार्थना केल्यावर आज्ञाचक्रातून चैतन्य आत जाऊन हलकेपणा जाणवणे : ‘पू. आजींनी देहत्याग केल्यावर काही वेळाने मी पू. आजींना प्रार्थना केली, ‘तुमच्या सेवेत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, तर मला क्षमा करा. तुम्ही देत असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ द्या.’ ही प्रार्थना केल्यावर माझ्या आज्ञाचक्रावर पुष्कळ संवेदना जाणवू लागल्या. ‘आज्ञाचक्रातून चैतन्य आत जाऊन माझा हलकेपणा वाढत आहे’, असे मला जाणवत होते. असे १ घंटा चालू होते.’
१०. सौ. रोहिणी वाल्मीक भुकन (पू. लोखंडेआजींची नातसून, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय २८ वर्षे), फोंडा, गोवा.
१० अ. पू. आजी निर्मळ असल्याने त्यांच्या खोलीची स्वच्छता न करताही ती निर्मळ वाटणे : ‘पू. आजींच्या देहत्यागानंतर दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे खोलीची स्वच्छता न करताही ‘खोली स्वच्छ आणि निर्मळ आहे’, असे मला वाटत होते. त्या वेळी मला हलके वाटत होते. पू. आजी मनाने पुष्कळ निर्मळ होत्या. त्यांना कधीच कुणाविषयी प्रतिक्रिया किंवा राग आलेला मी पाहिले नाही; म्हणून खोलीतही त्या निर्मळ देहाचे चैतन्य, शांती आणि पुष्कळ प्रेम जाणवत होते.
१० आ. आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीने पू. आजींची नखे आणि केस हवे होते. त्या संदर्भातील सेवा करत असतांना माझे मन निर्विचार झाले. त्या वेळी ‘पू. आजींकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवत होते.’
११. श्री. आशुतोष गायकवाड (पू. आजींचा पणतू), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘पू. आजींचा देहत्याग झाल्यावर ‘त्या शांतपणे झोपल्या असून त्यांचा श्वासोच्छ्वास चालू आहे’, असे मला जाणवत होते.
आ. पू. आजींच्या देहत्यागानंतर ‘तेथे उपस्थित असलेले सर्व जण हवेत तरंगत आहेत’, असे मला वाटत होते.’
१२. कु. वेदश्री रामेश्वर भुकन (पू. आजींची पणती, वय ११ वर्षे, आध्यत्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, फोंडा, गोवा.
१२ अ. पू. आजींच्या सेवेतून आनंद मिळणे : ‘मला पू. आजींच्या सेवेचा आळस कधीच येत नसे. उलट ‘त्यांची सेवा करावी’, असे मला वाटायचे. त्यांच्या सेवेतून मला आनंद मिळायचा.
१२ आ. पू. आजींचा देहत्याग झाल्यावर ‘त्यांना मुक्ती मिळणार आहे’, असे जाणवणे : जेव्हा पू. आजींचा देहत्याग झाला, तेव्हा मी त्यांच्या जवळच नामजप करत बसले होते. त्या वेळी ‘त्यांच्या देहातून एक ज्योत बाहेर पडून ती सप्तलोकांच्या दिशेने चालली आहे आणि तिथे पू. आजींना मुक्ती मिळणार आहे’, असे मला जाणवले अन् पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
१३. पू. लोखंडेआजींच्या देहत्यागानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सामायिक सूत्रे
अ. ‘पू. लोखंडेआजींनी देहत्याग केल्यानंतर आम्हाला पुढील सर्व विधी भावनिक स्तरावर न रहाता चैतन्याच्या स्तरावर स्थिर राहून करता आले.
आ. आम्हाला अंत्यविधीतून चैतन्य मिळाले आणि आमचे मन हलके झाले.
इ. पू. आजींच्या देहत्यागानंतर त्यांच्या तोंडात तुळशीपत्र ठेवले होते. पूर्ण रात्र उलटल्यानंतरही ते तुळशीपत्र टवटवीत आणि चैतन्यदायी वाटत होते.
ई. पू. आजींचा चेहरा पुष्कळ शांत वाटत होता.
उ. पू. आजींची खोली त्यांच्या देहत्यागानंतर पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ प्रकाशमान दिसत होती.
ऊ. वातावरणात एक वेगळीच शांतता पसरून हलकेपणा जाणवत होता. मन निर्विचार स्थितीला जाऊन शांतता अनुभवता येत होती.
ए. पू. आजींच्या चेहर्याकडे पाहून सहजपणे ध्यान लागत होते. ‘त्यांच्याकडे पहातच रहावे’, असे वाटत होते.
ऐ. देहत्यागानंतर त्यांच्या चेहर्यावरचे तेज वाढत गेले. अंत्यविधीच्या वेळी ते पुष्कळच वाढले होते.
ओ. ‘त्यांच्या देहाची हालचाल होत आहे’, असे उपस्थित साधकांना आणि आम्हाला जाणवले.
औ. त्यांचे पार्थिव कडक न होता ते दुसर्या दिवशीही लवचिक होते.
अं. पार्थिवाला स्नान घालतांना ‘ते पुष्कळ पिवळे आणि चैतन्यदायी झाले आहे’, असे जाणवत होते. त्यानंतर त्यांच्या देहाचा पिवळेपणा वाढतच गेला.’ (समाप्त)
(सर्व सूत्रांचा दिनांक : १८.१२.२०२४)
|